संपादकीय : सागरी सामर्थ्य !

उत्तर हिंदी महासागर ते लाल समुद्रापर्यंत पसरलेल्या सागरी क्षेत्रांमध्ये भारताच्या नौकांवर झालेल्या आक्रमणांमुळे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारताच्या दिशेने निघालेल्या ‘एम्.व्ही. चेम प्लुटो’वर आक्रमण करण्यात आले. त्यात २१ सदस्य होते. त्यानंतर काही घंट्यांतच दक्षिण लाल समुद्रात २५ भारतियांना घेऊन जाणार्‍या ‘साईबाबा’ या कच्च्या तेलाच्या टँकरवर ‘ड्रोन हल्ला’ करण्यात आला. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा वणवा आता भारतापर्यंत पोचला आहे. त्यातूनच हुती आतंकवादी भारताच्या नौकांना लक्ष्य करत आहेत. कोणत्याही देशासाठी सागरी सीमा आणि सागरी मार्गाची सुरक्षा महत्त्वाची असते. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील ७० टक्के व्यापार हा सागरी मार्गाने चालतो. त्यामुळे सागरी सुरक्षा हा भारताच्या धोरणातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यादृष्टीने भारताने आता आपले सागरी सामर्थ्य वाढवणे अत्यावश्यक आहे !

चीन आणि इराण यांचा वाढता धोका ! 

‘काही दिवसांपूर्वी भारताच्या किनार्‍याजवळ जपानी मालकीच्या नौकेवर जे आक्रमण करण्यात आले, ते इराणी बनावटीच्या ‘ड्रोन’ने केले होते’, असे अमेरिकेतील ‘पेंटागॉन’ने सांगितले. इराणचे हे आक्रमण म्हणजे भारताच्या व्यावसायिक नौकांसाठी उद्भवलेला नवीन धोका आहे. ‘इराण’ हा हमासच्या बाजूने असल्याने तो ‘चीन आणि पाकिस्तान यांच्या साहाय्याने समुद्रमार्गे ‘ड्रोन’सारखी आक्रमणे करून भारताला कशा प्रकारे सातत्याने त्रास देता येईल’, याचा विचार करत आहे. गेल्या काही दशकांमध्ये चीनने त्याच्या नौदलाच्या क्षमतेचे झपाट्याने आधुनिकीकरण केले आहे. चिनी नौदलाने त्याच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात विमानवाहू नौका, युद्धनौका आणि लढाऊ पाणबुड्या यांचा समावेश केला आहे. याच समवेत भारताच्या सीमेजवळ चीनने विकसित केलेल्या बंदरांमुळे अनेक वेळा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात भारताला मुक्त जलवाहतूक आव्हानात्मक बनू शकते. चीनने भारताभोवती बंदरांचा केलेला विकास, ही भारताला जलमार्गावर घेरण्यासाठी सिद्ध केलेली एक व्यापक कूटनीती आहे.

‘हुती’चा बंदोबस्त अत्यावश्यक !

यापूर्वी अरबी समुद्रात भारतीय व्यापारी नौकांना सोमालियन चाच्यांपासून नेहमीच धोका असायचा. सोमालियन चाच्यांचा भारतीय नौदलाने अनेक वेळा बंदोबस्त केला असून आता ‘हुती’च्या रूपाने नवीन सागरी संकट भारतासह अनेक राष्ट्रांसमोर उभे राहिले आहे. ‘पेंटागॉन’च्या म्हणण्यानुसार ‘हुती’ बंडखोरांनी १०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र आक्रमणे केली आहेत, ज्यात ३५ पेक्षा अधिक देशांच्या ३५ व्यापारी नौकांना लक्ष्य केले आहे. जी राष्ट्रे इस्रायलला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्यापारी आणि संरक्षण दृष्टीने साहाय्य करतात, त्या राष्ट्रांची सूची देऊन त्यांच्या नौकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्या नौकांची हानी करण्यात येत आहे. ‘हुती’च्या लाल समुद्रातील वाढत्या कारवाया पहाता आणि ‘अशा प्रकारची आक्रमणे कुठून होतील ?’, याची शाश्वती नसल्याने अनेक देशांच्या आस्थापनांनी त्यांचे समुद्रातील मार्ग पालटले आहेत. भारताच्या दृष्टीनेही ‘हुती’चा बंदोबस्त करण्याची वेळ आली असून यासाठी तात्काळ आणि जलद गतीने पावले उचलणे आवश्यक आहे.

उत्तम दर्जाच्या यंत्रणांची आवश्यकता !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

आशिया आणि आफ्रिका खंडांतील सागरी देशांमध्ये सागरी कायद्याची कार्यवाही करण्याची क्षमता समान नाही आणि त्यांच्यातील परस्पर सहकार्याच्या अभावामुळे भारताला सागरी धोक्यांना सामोरे जाणे कठीण होत आहे. काही देशांचे सागरी प्राधान्यक्रम वेगळे असून ते इतर देशांना सागरी चाचेगिरी आणि सागरी आतंकवाद यांच्या विरोधात साहाय्य करण्यास सिद्ध नसतात. काही देश त्यांच्याकडील सागरी परिसरातील माहितीही इतरांना देण्यास सिद्ध नसतात. या सर्वांचा भारताच्या सागरी पायाभूत सुविधांच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास त्याला दक्ष रहाण्यासाठी उत्तम दर्जाच्या यंत्रणांची आवश्यकता आहे.

मुंबई येथे २६/११ चे झालेले आक्रमण हे सागरी मार्गानेच झाले होते. हेच कशाला ? त्याही आधी कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याने मुंबई येथे घडवलेल्या साखळी बाँबस्फोटांसाठी लागलेले आर्.डी.एक्स. समुद्रमार्गे भारतात पोचले होते. या दोन्ही घटनांमुळे आपल्या सागरी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यापुढील काळात भारताची आर्थिक शक्ती जसजशी वाढत जाईल, तस-तसे आपले शत्रूही वाढत जातील. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुंबईत ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ युद्धनौकेच्या लोकार्पणप्रसंगी ‘नौकांवर आक्रमण करणार्‍यांना पाताळातून शोधून काढू’, अशी चेतावणी दिली आहे. पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैनिकांना मारल्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यासह ‘आक्रमण होऊच नये’, यासाठी सतर्कता आणि अगोदरच तसा धाक निर्माण करणे अत्यावश्यक आहे. कुणी तसे आक्रमण केले, तर इस्रायल ज्याप्रकारे ‘हमास’ची पाळेमुळे खणून काढेपर्यंत आक्रमण करत आहे, तशी आक्रमणे करून शत्रूला नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे.

चीन, इराण आणि पाकिस्तान या देशांनी आता भारताला सागरी मार्गात लक्ष्य करणे वाढवले असून भारतालाही संभाव्य धोका ओळखून ‘आक्रमणकर्त्यांचे धाडस होणार नाही,’ असा दरारा निर्माण करणे आवश्यक आहे. ‘पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्यासाठी आम्हाला २४ घंटे पुरेसे आहेत’, असे भारतीय सैन्याने वेळोवेळी सांगितले आहे. त्यामुळे आपल्या सैन्याची सिद्धता आहेच, आता वेळ आली आहे ती भारतीय शासनकर्त्यांनी ठाम आणि ठोस भूमिका घेण्याची !

समुद्रमार्गे होणारी वाढती आक्रमणे रोखण्यासाठी भारताने सागरी सामर्थ्य वाढवणे अत्यावश्यक !