२७ डिसेंबर २०२३ या दिवशीच्या अंकात पू. सौरभ जोशी यांना अक्कलकोट येथील मिळालेल्या पादुकांविषयी संत आणि साधक यांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आता पू. सौरभदादांचे वडील श्री. संजय जोशी यांना या पादुकांविषयी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
या लेखाचा पूर्वाध वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/749413.html
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पिंगुळी येथील भूमीवर ‘सौरभ आश्रम’ होणार आहे’, असे सांगणे
‘काही वर्षांपूर्वी गुरुदेवांच्या कृपेने मला पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे भूमी घेणे शक्य झाले होते. त्या भूमीचे छायाचित्र पाहिल्यावर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘येथे ‘सौरभ आश्रम’ होणार !’’ त्याला वर्ष २०२२ मध्ये मूर्तस्वरूप आले.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठोपाठ ३ वेळा स्वप्नात दिलेली अनुभूती
त्यानंतर ३.५.२०२२ या दिवशी आम्ही रामनाथी, गोवा येथून पिंगुळी, कुडाळ येथील आमच्या ‘श्री गुरुकृपा’ या निवासस्थानी (‘सौरभ आश्रमात’) आलो. येथे आल्यावरही आम्ही पू. सौरभदादांना मिळालेल्या पादुका देवघरात ठेवून त्यांची नित्य पूजा करत आहोत. वर्ष २०२२ च्या डिसेंबर मासात दत्तजयंतीपूर्वी मला पाठोपाठ ३ वेळा स्वप्न पडले. पहिल्या स्वप्नात गुरुदेव त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्यासह पिंगुळी येथील ‘सौरभ आश्रमात’ (घरी) आले. आमच्याशी थोडा वेळ बोलणे झाल्यानंतर गुरुदेव पू. सौरभदादांपाशी थोडा वेळ झोपले. त्यानंतर उठून ते चालत देवघरातील पादुकांकडे गेले आणि त्या पादुकांमध्ये अंतर्धान पावले. दुसर्या दिवशी पडलेल्या स्वप्नात गुरुदेव सर्व संत आणि साधक यांना घेऊन आले. आमच्याशी थोडा वेळ बोलल्यानंतर गुरुदेव पू. सौरभदादांपाशी थोडा वेळ झोपले. थोड्या वेळाने उठून ते देवघरातील पादुकांकडे गेले आणि त्या पादुकांमध्ये अंतर्धान पावले. तिसर्या दिवशी स्वप्नात गुरुदेव एकटेच आले. या वेळीही ते पू. सौरभदादांपाशी थोडा वेळ झोपले. आम्हा सर्वांशी बोलले आणि नंतर देवघरातील पादुकांकडे गेले अन् त्या पादुकांमध्ये अंतर्धान पावले.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या वरील अनुभूतींमुळे गुरुचरित्र आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे पारायण करणे आणि ते करतांना आलेल्या अनुभूती
दत्तजयंती पूर्वी मला वरील स्वप्न पाठोपाठ ३ वेळा पडण्याची अनुभूती आल्याने माझ्या मनात ‘गुरुचरित्र आणि गुरुदेवांचे चरित्र (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन या ग्रंथाचे) यांचे पारायण करूया’, असा विचार आला. त्यानुसार दत्तजयंतीपूर्वी मी पारायणाला प्रारंभ करून दत्तजयंतीच्या दिवशी सांगता केली.
७ अ. गुरुचरित्रात ‘दुपारी १२ ते १२.३० या वेळेत पारायण करू नये’, असे असणे आणि पारायणाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी दुपारी १२ वाजता घरी कुणीतरी आल्यामुळे त्या वेळी पारायण न होणे : ‘दुपारी १२ ते १२.३० या वेळेत पारायण करू नये; कारण या वेळेत दत्तमहाराज भिक्षा मागण्यासाठी जातात’, असा गुरुचरित्रात उल्लेख आहे. त्यानुसार संपूर्ण पारायणाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी दुपारी १२ वाजता घरी कुणीतरी यायचे. गुरुदेवांनी त्या व्यक्तीचे आमच्याकडून यथाशक्ती आदरातिथ्य करून घेतले. त्यामुळे १२ ते १२.३० या वेळी गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे पारायण झाले नाही.
७ आ. पारायण सांगतेच्या दिवशी एका व्यक्तीने पूजेसाठी शेवंतीची फुले देणे आणि त्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘मी तुमच्या समवेत आहे’, असे आश्वस्त केल्याचे जाणवणे : दत्तजयंतीच्या दिवशी पारायणाची सांगता झाली. त्याच वेळी अकस्मात् एक ओळखीची व्यक्ती दुपारी १२ वाजता घरी आली. येतांना तिने पूजेसाठी शेवंतीची ५ फुले आणली होती. मी आमच्या वाटिकेत असलेली फुले देवाला वाहून नित्य पूजा करत होतो. पारायणाच्या संपूर्ण सप्ताहात पूजेत शेवंतीची फुले नव्हती. शेवंतीची फुले वहातांना मला गुरुचरित्रातील एक प्रसंग मला आठवला, ‘श्री नृसिंहसरस्वती स्वामी जेव्हा श्रीशैल्यपर्वत गमनाकरता निघाले, तेव्हा त्यांनी भक्तांना वचन दिले होते, ‘‘मी येथेच आहे, तुम्ही केवळ माझे स्मरण करा. मी पैलतीरी पोचल्यावर तुमच्यासाठी प्रसादपुष्पे पाठवीन. ती तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. त्या माध्यमातून मी तुमच्या समवेत सतत असणार आहे.’’ शेवंतीची फुले पाहिल्यावर गुरुदेवांनी त्या व्यक्तीच्या माध्यमातून फुले पाठवून, ‘मी स्थूलदेहाने दूर असलो, तरी तुमच्या समवेत आहे’, असे आम्हाला आश्वस्त केले’, असे मला जाणवले.
७ इ. पारायण सांगतेच्या दिवशी अकस्मात् एक श्वान घरी येणे : यापूर्वी कधीही घरी न आलेला एक श्वान (कुत्रा) पारायण सांगतेच्या दिवशी (दत्तजयंतीच्या दिवशी) दुपारी १२ वाजता अकस्मात् दारात येऊन उभा राहिला. तो घराच्या पायर्यांजवळ बसला. मी बाहेर आल्यावर तो उभा राहून माझ्याकडे बघू लागला. मी त्याला खाऊ दिला. मला तो श्वान सात्त्विक वाटला. या श्वानाचे छायाचित्र मी सद्गुरु गाडगीळकाकांना पाठवल्यावर ते म्हणाले, ‘‘छानच आहे. याच्या डोळ्यांमध्ये भाव जाणवतो. पुष्कळ चांगली अनुभूती आहे.’’ त्यानंतर तो श्वान दारात थोडा वेळ थांबून निघाला. घरापासून थोड्या अंतरावर गेल्यावर त्याने मागे वळून पाहिले. मी त्याला नमस्कार केल्यावर तो निघून गेला.
गुरुदेवांनी मला या अनुभूती देऊन त्या माझ्याकडून लिहूनही घेतल्या. त्या मी त्यांच्या सुकोमल चरणी अर्पण करत आहे.’
(समाप्त.)
– श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ, सिंधुदुर्ग (७.११.२०२३)
‘पू. सौरभदादा यांना अक्कलकोट येथील मिळालेल्या पादुकांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण घालत आहे’, असा भाव ठेवल्यामुळे त्यांचे नित्य चरणदर्शन होणे
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून कुडाळला येण्यासाठी निघण्यापूर्वी गुरुमाऊली पू. सौरभदादांना आणि आम्हाला (मी आणि पत्नीला) भेटायला आमच्या खोलीत आली होती. ते खोलीतून निघतांना त्यांचे चरण त्यांच्या पादुकांमध्ये (स्लिपरमध्ये) घालण्याचा आणि त्या निमित्ताने गुरुमाऊलींच्या चरणांना स्पर्श करून त्यांना वंदन करण्याचा सुवर्णयोग जुळून आला. आता मी पिंगुळी, कुडाळ येथे घरातील देवघरात पू. सौरभदादांना अक्कलकोट येथून मिळालेल्या पादुकांची नित्यपूजा आणि आरती करतो. त्या पादुकांची पूजा करतांना मला प्रतिदिन रामनाथी आश्रमात गुरुमाऊलींचे चरण त्यांच्या पादुकांमध्ये (स्लिपरमध्ये) घालतांनाचा प्रसंग आठवतो. ‘मी त्या पादुकांमध्ये गुरुमाऊलीचे चरण घालत आहे’, असा नित्य भाव ठेवतो. त्यामुळे आजही मला गुरुमाऊलींच्या चरणांचे नित्यदर्शन होते. ही केवळ गुरुमाऊली आणि पू. सौरभदादा यांचीच कृपा आहे.’ – श्री. संजय जोशी (७.११.२०२३)
गुरुतत्त्व एकच असल्याची आलेली अनुभूती१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्री स्वामी समर्थांच्या मठात प्रथम दर्शन होऊन साधना चालू होणे‘शिवाजी पार्क (दादर, मुंबई) येथे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. मी या मठात नेहमी दर्शनाला जात असे. एकदा तिथे गुरुमाऊलींच्या प्रवचनाचा फलक लागला होता. ‘तो फलक पाहून मला त्या प्रवचनाला जावे’, असे वाटले. मठात दर्शन घेतल्यानंतर मी त्या प्रवचनाला गेलो. तिथे मला गुरुमाऊलींचे प्रथम दर्शन झाले. ‘त्यांना मला त्यांच्या समवेत घ्यायचे होते; म्हणूनच त्यांनी मला मठात पाठवून प्रवचनाला जाण्याची बुद्धी दिली होती’, याची मला जाणीव झाली; कारण तेव्हापासूनच माझा साधना प्रवास चालू झाला. २. स्वामी समर्थांप्रमाणेच पादुकांच्या माध्यमातून अनुभूती देऊन ‘ते समवेत आहेत’, याची प्रचीती देणेत्यानंतर काही वर्षे आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहिलो. वर्ष २०२२ मध्ये आम्ही रामनाथी येथून पिंगुळी, कुडाळ येथे ‘श्री गुरुकृपा’ या आमच्या निवासस्थानी (‘सौरभ आश्रमात’) रहायला आलो. त्यापूर्वी अनुमाने एक ते दीड वर्ष अगोदर एका व्यक्तीने पू. सौरभदादांना अक्कलकोट येथून पादुका आणून दिल्या होत्या. या पादुका गुरुपादुका असल्याची अनुभूती माझ्यासह अनेकांना आली. त्यातून ‘मी तुमच्या समवेत आहे’, याची प्रचीतीच गुरुमाऊलींनी आम्हाला दिली.’ – श्री. संजय जोशी (७.११.२०२३) |
|