‘आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहात असतांना एका व्यक्तीने पू. सौरभ जोशी यांना श्री स्वामी समर्थांचे स्थान असलेल्या अक्कलकोट येथील पादुका दिल्या होत्या. अनेक संत आणि साधक यांना या पादुकांविषयी विविध अनुभूती आल्या आहेत. आम्ही रामनाथी येथून पिंगुळी (कुडाळ) येथे येण्यासाठी निघतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा हस्तस्पर्शही या पादुकांना झाला आहे. वर्ष २०२२ पासून आम्ही पिंगुळी, कुडाळ येथील आमच्या ‘श्री गुरुकृपा’ या निवासस्थानी वास्तव्याला आहोत. आम्ही या पादुका देवघरात ठेवल्या असून त्यांची नित्य पूजा करतो. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, हे श्री स्वामी समर्थांचे भक्तांसाठी आश्वासक बोल आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही आम्हाला या पादुकांच्या माध्यमातून तशीच अनुभूती दिली. यासाठी आम्ही अनन्य शरणागतभावाने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांनी दिलेल्या अनुभूती त्यांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो.
१. पू. सौरभदादा रुग्णालयात भरती असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून मार्गदर्शन केल्यावर पू. सौरभदादांची प्रकृती सुधारणे
आम्ही मुंंबई येथे रहात असतांना एकदा पू. सौरभदादा पुष्कळ रुग्णाईत होते. त्यांची प्रकृती एकदम नाजूक झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते. आधुनिक वैद्यांनी त्यांची जगण्याची आशा सोडली होती. तेव्हा आमची ओळख नसतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून पू. सौरभदादा यांच्या आईला (सौ. प्राजक्ता यांना) ‘पू. सौरभदादा यांची सेवा कशी करायची ?’, याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर पू. सौरभदादांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. सौरभदादांविषयी केलेले वक्तव्य आणि त्याविषयी जाणवलेली सूत्रे
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. सौरभदादांची काळजी न करण्यास आणि ‘त्यांची महती जगभर करायची आहे’, असे सांगणे : सौ. प्राजक्ता यांनी सनातन-निर्मित ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’, या ग्रंथात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहिले होते. त्यावरून त्यांना ‘पू. सौरभदादांची सेवा करण्याविषयी सूक्ष्मातून मार्गदर्शन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, हे कळले; म्हणून पू. सौरभदादांची प्रकृती बरी झाल्यानंतर आम्ही पू. सौरभदादांना घेऊन परात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेल्या मुंबई येथील सेवाकेंद्रात गेलो. तिथे आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रथम दर्शन झाले. आम्ही त्यांच्या खोलीत प्रवेश करताच ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही याची (पू. सौरभदादा यांची) काळजी करू नका. आपल्याला त्याला सर्व जगभर न्यायचे आहे.’’ तेव्हा मला त्यांच्या सांगण्याचा अर्थ कळला नाही.
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात येणार्या सर्वांना पू. सौरभदादांना भेटायला सांगून आणि त्यांच्याविषयी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकात कौतुकाचे लेख छापून त्यांची जगभर कीर्ती करणे : कालांतराने परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. सौरभदादा यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात बोलावून घेतले. रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांनी पू. सौरभदादांची टप्प्याटप्प्याने प्रगती करून घेऊन त्यांना संतपदी विराजमान केले. त्यानंतर परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे रामनाथी आश्रमात येणारे देश-विदेशांतील संत, साधक, अध्यात्माचे अभ्यासक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि जिज्ञासू यांची पू. सौरभदादांशी भेट होत असे. तेव्हा अनेकांना पू. सौरभदादा यांच्यातील संतत्वाची अनुभूती येत असे. परात्पर गुरु डॉक्टरांनी नियतकालिक ‘सनातन प्रभात’मधून पू. सौरभदादांविषयी पुष्कळ कौतुकपर लिखाण प्रसिद्ध करून त्यांना खर्या अर्थाने जगभर पोचवले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. सौरभदादांचे नेहमी कौतुक करणे
गुरुदेवांनी स्वतः अनेक संतांना पू. सौरभदादांविषयी सांगितले आहे. रामनाथी आश्रमात काही कार्यक्रम असतांना गुरुदेव पू. सौरभदादांना अकस्मात् भेटायला येत असत. ते पू. दादांचे नेहमी कौतुक करत असत आणि आताही करत आहेत.
४. पू. सौरभदादांना अक्कलकोट येथून आणलेल्या पादुका मिळणे आणि त्या पादुकांविषयी सद्गुरु आणि साधक यांना अनेक अनुभूती येणे
आम्ही रामनाथी आश्रमातून कुडाळला येण्याच्या साधारण एक वर्ष आधी पू. सौरभदादांना भेटायला आलेल्या एका व्यक्तीने त्यांना अक्कलकोट येथून आणलेल्या पादुका दिल्या. त्या पादुका मी एका चांगल्या खोक्यात घालून पू. सौरभदादांच्या खोलीतील देवघरात ठेवल्या. पू. सौरभदादांना भेटायला आलेल्या अनेकांना हा खोका उघडण्यापूर्वीच वेगवेगळ्या अनुभूती यायच्या.
४ अ. पादुकांविषयी संतांना आलेल्या अनुभूती
१. पादुकांचा खोका हातात घेतल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना आज्ञाचक्र आणि सहस्रारचक्र यांवर संवेदना जाणवल्या.
२. खोका हातात घेतल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे ध्यान लागून त्यांना त्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवले.
४ आ. साधकांना आलेल्या अनुभूती
४ आ १. अक्कलकोट येथे न जाताही साधिकेला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची अनुभूती येणे : एकदा रामनाथी आश्रमातील एक साधिका तिचा वाढदिवस असल्यामुळे पू. सौरभदादांना भेटायला आली होती. तेव्हा मी पादुकांचा खोका तिच्या हातात देऊन तिला विचारले, ‘‘काय जाणवते ?’’ खोका हातात घेतल्यावर तिला पुष्कळ भरून आले. तिचे मन शांत झाले आणि तिला मंदिरात गेल्यासारखे वाटले. मी तिला खोका उघडून त्यातील पादुका दाखवल्या आणि ‘त्या अक्कलकोट येथील आहेत’, असे सांगितले. ते ऐकून ती म्हणाली, ‘‘माझे कुटुंबीय आता अक्कलकोट येथेच आहेत. ते मला बोलावत होते; पण मी गेले नाही; मात्र परम पूज्यांनी तिकडे न जाताच श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची माझी इच्छा पूर्ण केली. पू. दादांच्या कृपेने हे सर्व झाले.’’ हे सांगतांना तिचा भाव पुष्कळ जागृत झाला होता.
४ आ २. अक्कलकोट येथे न जाताही साधकाला पादुकांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे दर्शन होणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक साधक सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्यांची सेवा झाल्यावर घरी जाण्यापूर्वी ते पू. सौरभदादांना भेटायला आले होते. मी पादुकांचा खोका त्यांच्या हातात दिल्यावर ते मला म्हणाले, ‘‘यात पुष्कळ चैतन्य आहे.’’ मी त्यांना खोका उघडून त्यातील पादुका दाखवून म्हणालो, ‘‘या पादुका अक्कलकोट येथील आहेत.’’ तेव्हा त्यांचा भाव जागृत झाला. ते मला म्हणाले, ‘‘मी प्रतिवर्षी मित्रांसह एका तीर्थक्षेत्री जातो. या वर्षी (वर्ष २०२२ मध्ये) आमचे अक्कलकोट येथे जाण्याचे ठरले होते; मात्र मी सेवेसाठी रामनाथी आश्रमात आलो आणि माझे मित्र अक्कलकोटला गेले. असे असले, तरी गुरुदेवांनी पादुकांच्या माध्यमातून मला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडवले. मी तिकडे जाऊ शकलो नाही, तरी गुरुदेवांनी पादुकांचे दर्शन देऊन ती न्यूनता भरून काढली.’’
४ इ. साधिकेने गुरुपादुकांवर भावार्चना सांगणे आणि त्यानंतर तिला पादुकांचे दर्शन होणे : एकदा मी एका साधिकेला पू. सौरभदादांच्या समवेत बसवून सेवा करायला गेलो होतो. सेवा करून २ घंट्यांनी खोलीत परत आल्यावर मी साधिकेच्या हातात पादुकांचा खोका दिला. तो खोका हातात घेतल्यावर त्यांना सूक्ष्मातून गुरुपादुकांचे दर्शन होऊन त्यांचा भाव जागृत झाला. मी त्यांना खोका उघडून ‘‘या पादुका अक्कलकोट येथील आहेत’’, असे सांगितले. पादुका पाहून आणि त्यातून दरवळणारा सुगंध घेऊन त्या म्हणाल्या, ‘‘श्री गुरूंनी मला छान अनुभूती दिली. आज मी येथे बसून ‘ऑनलाईन’ सत्संगात गुरुपादुकांवरच भावार्चना घेतली आणि गुरुदेवांनी मला पादुकांचेच दर्शन घडवले.’’
(क्रमशः)
– श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ, सिंधुदुर्ग. (७.११.२०२३)
|