‘१०.१०.२०२३ या दिवशी मी पुणे येथील माझ्या नृत्यगुरु सुचेता जोशी यांच्याकडे नृत्य शिकायला गेले होते. तेव्हा माझ्या समवेत माझी आई (सौ. दीपा औंधकर) होती. त्या दिवशी आम्हाला (मला आणि आईला) नृत्यवर्गात पुष्कळ दैवी वातावरण जाणवत होते. त्या वेळी आम्हाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘पंतुवराळी’ या रागातील श्रीकृष्णावर आधारित ‘वर्णम्’ (टीप १) चा सराव करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. नृत्याभिनयाद्वारे सादर केलेले दृश्य : वर्णम्मध्ये नृत्याभिनयाद्वारे मी दाखवले, ‘श्रीकृष्ण बाल्यावस्थेत असतांना तो गायींना चारा घालतो. यशोदामाता गायीचे दूध काढतांना श्रीकृष्ण तिला दूरून पहातो आणि नंतर गायीजवळ जाऊन ‘मलाही दूध हवे’, असे सांगतो.’
१ आ. सौ. दीपा औंधकर यांना आलेल्या अनुभूती : असा प्रसंग मी नृत्याद्वारे सादर करतांना माझ्या आईला तोंडात दुधाची चव जाणवली आणि तिला ‘तो प्रसंग प्रत्यक्षच घडत आहे’, असे जाणवले.
१ इ. साधिकेला आलेली अनुभूती : मला नृत्य करतांना शरिराला हलकेपणा जाणवून कृष्णतत्त्व जाणवत होते.
टीप १ – वर्णम् : भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यशैलीत विशिष्ट क्रमाने नृत्यप्रकारांचे प्रस्तुतीकरण करण्याची पद्धत (मार्गम्) आहे. या क्रमानुसार ‘वर्णम्’ हा नृत्याचा प्रकार चौथ्या क्रमांकावर सादर केला जातो. नृत्य, संगीत आणि अभिनय यांचा त्रिवेणी संगम, म्हणजे ‘वर्णम्.’ वर्णम्ला अभिनयाचा मानबिंदू समजला जातो. यात नृत्य आणि अभिनय यांना समान महत्त्व असते. या प्रकारात प्रत्येक स्वरातील रचना भाव, राग आणि ताल यांना अनुरूप अशी असते; म्हणून वर्णम्चा समावेश अभिनयात करतात.
२. ‘रागमालिकेतील’ (टीप २) ‘वात्सल्य पदम्’ (टीप ३) चा सराव करतांना आलेल्या अनुभूती
अ. आईला संपूर्ण पदम् पहातांना पुष्कळ आनंद जाणवत होता आणि तो तिच्या आत आत पर्यंत जात होता.
आ. मी नृत्य करत असतांना माझी भावजागृती झाली. मला अंतर्मनापासून नृत्य करता येत होते. सुचेताताई मला नृत्यातील बारकावे सांगत असतांना ‘प्रत्यक्ष श्रीकृष्णच ते शिकवत आहे’, असे मला जाणवले.
टीप २ – रागमालिका : विविध रागांनी मिळून गायलेले एक गीत, बंदिश, स्वर, इत्यादि.
टीप ३ – पदम् : ‘भरतनाट्यम्’ या शास्त्रीय नृत्यशैलीत विशिष्ट क्रमाने नृत्यप्रकारांचे प्रस्तुतीकरण करण्याची पद्धत (मार्गम) आहे. या क्रमानुसार ‘पदम्’ हा नृत्याचा प्रकार पाचव्या क्रमांकावर सादर केला जातो. यात अभिनयाला सर्वाधिक महत्त्व आहे. यात हळूवार पदन्यास करत भाव व्यक्त केला जातो. देवतांच्या लीला किंवा एखादे नायक-नायिका यांच्या कार्याची महती सांगण्यासाठी ही पदे रचलेली असतात.
३. ‘नृत्यगुरु सुचेताताई गीत तालात म्हणायला शिकवत असतांना आलेल्या अनुभूती
यानंतर आम्ही नृत्यातील रचना हातावर ताल देऊन म्हणायला आरंभ केला. त्या ‘रचना तालात कशा लिहाव्यात ?’, याविषयी सुचेताताई आम्हाला शिकवत होत्या.
अ. मी सुचेताताईंकडे पाहिल्यावर मला त्यांच्या चेहर्यावर एक वेगळेच तेज दिसले.
आ. त्यांचे डोळे निळसर झाले होते.
इ. मला त्यांच्याकडे पाहून शीतलता आणि प्रसन्नता जाणवत होती.
ई. त्या शिकवत असलेले मला लगेच आकलन होत होते.
४. नृत्यवर्गात आलेल्या अनुभूतींविषयी बोलतांना ‘साक्षात् आदिगुरु भगवान शिव नृत्य शिकवत होते’, असा आवाज ऐकू येणे
४ अ. ‘मायेच्या आवरणामुळे ‘साक्षात् शिव नृत्य शिकवत आहे’, याची जाणीव नाही’, असा आवाज ऐकू येणे : नृत्यवर्ग आनंदात पार पडला. मी आणि आई रिक्शात बसून जात होतो. नृत्यवर्गात मला आलेल्या अनुभूतींविषयी मी आईला सांगत होते आणि आई तिला आलेल्या अनुभूती सांगत होती. तेव्हा मला आतून कोणाचा तरी आवाज आला, ‘तुला नृत्य शिकवणारे कोण आहेत ?’, असे वाटते ? साक्षात् आदिगुरु भगवान शिव ! मायेच्या आवरणामुळे ‘ते साक्षात् शिवच आहेत’, याविषयी तुला कळले नाही.’
४ आ. मला हा आवाज ऐकू आल्यावर माझ्या शरिरावर रोमांच आले.
४ इ. माझा भगवान शिव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रती अपार कृतज्ञताभाव दाटून आला.
४ ई. ‘तो आवाज जणू गुरुदेवांचाच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) होता’, असे मला जाणवले.
४ उ. त्यानंतर मला जाणीव झाली, ‘भगवान शिवाच्या मनात जर मला नृत्य शिकवायचे असे असेल, तर तो कुणाच्याही माध्यमातून शिकवू शकतो. मला केवळ माझे साधनेचे प्रयत्न वाढवून ते ग्रहण करायचे आहे !’
५. नृत्यवर्गातील शिकवणे आणि शिकणे हे भाव अन् आनंद यांच्या स्तरावर असणे
नृत्यवर्गात अन्य वेळी मला विशेष अनुभूती येत नाहीत. माझे केवळ नृत्य शिकणे, त्याचा सराव करणे आणि मधून मधून प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त करणे, एवढेच होते; मात्र हा नृत्यवर्ग मला पुष्कळ निराळा वाटला. नृत्यवर्गातील शिकवणे आणि शिकणे भाव अन् आनंद यांच्या स्तरावर होते. यानंतर मला जाणीव झाली, ‘प्रत्यक्ष आदिगुरु शिव नृत्य शिकवत असल्याने मला एवढा परमानंद मिळत होता.’
६. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे शिवस्वरूप गुरुमाऊली, आपल्यापासूनच सर्व कलांची निर्मिती झाली आहे. तुम्हीच मला नृत्यकला शिकवा. मला तुमच्या चरणांची शिष्या बनवा’, अशी आपल्या चरणी प्रार्थना. ही दैवी अनुभूती देऊन या अज्ञानी जिवाला परमानंद दिल्याबद्दल मी आपल्या चरणकमली कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२६.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |