१. आईला झालेल्या त्रासाचे स्वरूप
‘माझ्या आईला (सौ. जयश्री बक्षी यांना) झालेल्या एका आजारामुळे तिच्या शरिरातील पाणी न्यून झाले होते. ती ४ वर्षांपासून या आजाराने त्रस्त आहे. या आजारामुळे तिच्या डोळ्यांत पाणी येत नाही आणि तोंडामध्ये ओलसरपणा रहात नाही. डोळ्यांतील कोरडेपणामुळे तिला दिसायला अडचण येणे आणि दिव्याचा प्रकाश सहन न होणे, यांसारखे त्रास होत होते. आईला होणारा हा त्रास असह्य होता. बरेच औषधोपचार होऊनही तिला बरे वाटले नाही. त्यासाठी तिच्या विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यांचे अहवाल सामान्य आले.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करू लागल्यापासून आईच्या डोळ्यांत पाणी येऊ लागणे आणि तोंडातील कोरडेपणाही न्यून होणे
मार्च २०२२ मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी माझ्या आईला होणारा त्रास दूर होण्यासाठी नामजपादी उपाय सांगितले. आई नामजपादी उपाय करू लागल्यापासून तिच्या डोळ्यांत काही प्रमाणात पाणी येऊ लागले आणि तिच्या तोंडातील कोरडेपणाही न्यून झाला.
३. सनातनच्या संतांचे दर्शन झाल्यापासून आईच्या डोळ्यांत भावाश्रू येऊ लागणे आणि तिच्या तोंडातील कोरडेपणाही अल्प होणे
२.९.२०२२ या दिवशी आई गोवा येथे आमच्या घरी आली होती. त्या दिवशी गौरी-गणपतिनिमित्त घरी सनातनचे काही संत आले होते. संतांचे दर्शन झाल्यापासून त्यांच्या सत्संगात आईच्या डोळ्यांत भावाश्रू येऊ लागले. तिच्या डोळ्यांतून सतत पाणी वहात होते, तसेच तिच्या तोंडातील कोरडेपणाही अल्प झाला. किती ही गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा ! अशक्य ते शक्य झाले.
४. एका संतांच्या सत्संगात आई बराच वेळ बसूनही तेथील प्रकाशाचा तिला त्रास न होणे आणि सूक्ष्मातील प्रयोगांच्या वेळी अंधारातील प्रकाशाच्या कडा स्पष्ट दिसणे
एका सत्संगासाठी आई चित्रीकरण कक्षात बराच वेळ बसूनही तिला तिथे असलेल्या प्रकाशाचा (दिव्यांचा) त्रास झाला नाही. अन्य वेळी तिला जराही दिव्याचा उजेड सहन होत नाही. एका संतांच्या सत्संगात घेण्यात आलेल्या सूक्ष्मातील प्रयोगांच्या वेळी आईला डोळ्यांना त्रास न होता अंधारातील प्रकाशाच्या कडा स्पष्ट दिसल्या. एरव्ही तिला दिसायला अडचण असूनही गुरुदेवांच्या कृपेने सत्संगात सर्वकाही सहजतेने दिसत होते.
५. आईला होणारा असह्य त्रास गुरुकृपेने न्यून होणे आणि साधना अन् संत यांच्या सत्संगाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येणे
आईला होणार्या प्रचंड वेदना आणि गंभीर आजार केवळ गुरुकृपेने न्यून झाला. तिला भूवैकुंठातील (रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील) आनंद आणि चैतन्य अनुभवता आले. साधना आणि संतांचा सत्संग यांचे अनन्यसाधारण महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ‘साधनेमुळे प्रारब्ध सुसह्य होते’, याची अनुभूती घेता आली. श्री गुरुचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’
– सौ. मानसी राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे), फोंडा, गोवा. (१५.९.२०२२)
|