Hindu Woman Pakistan Election : पाकिस्तानच्या संसदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच हिंदु महिला निवडणूक लढणार !

डॉ. सवीरा प्रकाश यांनी भरला उमेदवारी अर्ज

डॉ. सवीरा प्रकाश

पेशावर (पाकिस्तान) : पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये पहिल्यांदाच एका हिंदु महिलेने संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमदेवारी अर्ज भरला आहे. येथील बुनेर जिल्ह्यात डॉ. सवीरा प्रकाश नावाच्या महिलेने पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून हा अर्ज भरला आहे. तिचे वडील डॉ. ओम प्रकाश हे गेली ३५ वर्षे या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. डॉ. सवीरा येथील महिला शाखेच्या सरचिटणीसही आहेत. येथे पुढील वर्षी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

डॉ. सवीरा यांचे म्हणणे आहे की, त्या जर निवडणूक जिंकल्या, तर त्या गरीब आणि वंचित लोकांसाठी काम करतील. ‘सरकारी रुग्णालयातील दुरवस्था पाहून त्यात सुधारणा करण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला’, असे त्यांनी सांगितले.