France : ३०३ भारतीय नागरिक अद्यापही फ्रान्सच्या कह्यात !

पॅरिस (फ्रान्स) – गेल्या २ दिवसांपासून फ्रान्सने संयुक्त अरब अमिरात येथून निकारागुआ येथे जाणारे विमान मानवी तस्करीच्या संशयावरून पॅरिस विमानतळावर रोखून धरले आहे. यातील ३०३ भारतियांना कह्यात ठेवण्यात आले आहे. यात ११ जण अल्पवयीन असून त्यांच्यासमवेत त्यांचे पालक नाहीत. बहुतांश नागरिक पंजाब आणि गुजरात या राज्यांतील आहेत. हे भारतीय अमेरिकेत घुसखोरी करण्यासाठी जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्वांना न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांच्या सुटकेविषयी निर्णय होणार आहे. फ्रान्समध्ये परदेशी नागरिकांना ४ दिवसांपेक्षा अधिक काळ कह्यात ठेवता येत नाही. यासाठी न्यायाधिशांची अनुमती घ्यावी लागते. या प्रकरणाविषयी फ्रान्सकडून भारताला अहवाल पाठवण्यात आला आहे.

फ्रान्सने विमानतळावरच सर्व लोकांची रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षक नेमण्यात आले आहेत. भारतीय अधिकारी त्यांना प्रतिदिन भेटत आहेत.