Drone Attack : गुजरातच्या समुद्रात विदेशी व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण : जीवितहानी नाही

इराणकडून आक्रमण झाल्याचा अमेरिकेचा दावा !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – गुजरातच्या किनारपट्टीजवळ ‘एमव्ही केम प्लूटो’ या व्यापारी नौकेवर २३ डिसेंबर या दिवशी ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आल्याने नौकेवर काही ठिकाणी आग लागली. या आक्रमणात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तर नौकेची मोठी हानी झाली आहे. या नौकेवर २० भारतीय कर्मचारी असल्याने भारतीय नौदलाने त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतःची नौका पाठवली. दुसरीकडे हे आक्रमण इराणने केल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षणदलाने केला आहे. या नौकेवर लायबेरियाचा ध्वज होता आणि ही नौका इस्रायलशी संबंधित आहे.

आक्रमण झालेली नौका ९ डिसेंबर या दिवशी कच्चे तेल घेऊन सौदी अरेबियातून कर्नाटकमधील मंगळुरू बंदराच्या दिशेने निघाली होती. २५ डिसेंबरपर्यंत ही नौका मंगळुरू येथे पोचणे अपेक्षित होते; परंतु गुजरातमधील पोरबंदर किनार्‍यापासून २१७ सागरी मैल अंतरावर समुद्रात तिच्यावर आक्रमण झाले.