भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लग्न समारंभ आणि पर्यटन भारतातच करा !

(निवृत्त) बिग्रेडियर हेमंत महाजन

१. शेकडो भारतियांच्या विवाहांचे आयोजन !

‘भारतियांना विनंती आहे की, त्यांच्या कुटुंबात लग्नसमारंभ असतील, तर ते त्यांनी भारतातच करावे. याविषयी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हेही बोलले होते. यामागील कारण असे की, गरीब, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत असो, सर्वच जण लग्नसमारंभांवर प्रचंड व्यय करतात. सध्या श्रीमंत वर्गामध्ये ‘डेस्टिनेशन वेडिंग’ या प्रकारची एक नवीनच पद्धत चालू झालेली आहे. त्यानुसार भारतीय श्रीमंत लोक जगातील एखाद्या भागात जाऊन उदा. इटली, युरोप किंवा दुबई येथे जाऊन लग्न करतात. त्यासाठी ते प्रचंड व्यय करतात. महत्त्वाचे सूत्र असे की, लग्नावर खरच पैसे व्यय करायचे असतील, तर ते भारतातच करावे. आपल्याच देशात लग्न केल्याने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळते. हॉटेल, सभागृह, भोजन व्यवस्था, उपहार देणे, पाहुण्यांचा व्यय, टॅक्सी, वाहने आदी अनेक प्रकारचे व्यय भारतातच केले, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड चालना मिळेल.

भारतातच ‘डेस्टिनेशन वेडिंग’

असे मानले जाते की,  नोव्हेंबर आणि डिसेंबर या मासांमध्ये अनेक भारतीय लग्न करतात. ही लग्ने भारतातच झाली, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला केवढी चालना मिळेल ? अलीकडेच दसरा, दिवाळी असे काही सण साजरे झाले. त्यात भारतियांनी प्रचंड पैसा व्यय केला. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला फार मोठी चालना मिळाली. अशाच प्रकारे लग्नसमारंभातही फार मोठा व्यय केला जाणार आहे. यावर्षी भारतीय ४० लाख कोटी रुपये व्यय करणार आहेत, असा कयास आहे. हा सर्व व्यय येथेच झाला, तर केवढा परिणाम होऊ शकतो, याची आपण कल्पना करावी. त्यामुळे खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही अशी विनंती केली आहे की, भारतियांनी हा सर्व व्यय भारतातच करावा.

२. पर्यटनासाठी जागतिक स्तरावर भारत एक चांगला पर्याय !

एवढेच नाही, तर यात अजून एका घटनेची भर पडणार आहे. लवकरच इंग्रजी नवीन वर्ष चालू होईल. त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भारतीय बाहेर देशात पर्यटनाला जातात. हे पर्यटन भारतातच केले, तर त्याचा मोठा लाभ होईल. असे म्हटले जाते की, जगभरात पर्यटनासाठी फिरणार्‍यांमध्ये भारताचा ४ था क्रमांक लागतो. त्यांनी पर्यटनासाठी लागणारा हा सर्व पैसा भारतातच व्यय केला, तर फार चांगले होईल. भारतात अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. काश्मीर, हिमाचल प्रदेश, विविध वाळवंट, अतीथंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे, द्वीपसमूह आहेत. जगातील अशी कुठलीही गोष्ट नाही, जी भारतात नाही. भारतात पर्यटनासाठी सहस्रो स्थळे उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे, आता विमान आणि रेल्वे यांचा प्रवास पुष्कळ वाढलेला आहे. पर्यटनस्थळी चांगली हॉटेल्स आहेत. टॅक्सी सेवाही चांगल्या दर्जाच्या आहेत. थोडक्यात, जागतिक दर्जाच्या स्तरावरचे पर्यटन भारतातही आहे. आता उलट ‘ट्रेंड’ चालू झाला आहे. अनेक विदेशी पर्यटक भारतात येऊन पर्यटन करत आहेत. त्यामुळे भारतियांनी भारतातच पर्यटन केले, तर त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फार मोठी चालना मिळू शकेल.’

– ब्रिगेडियर हेेमंत महाजन (निवृत्त), पुणे.