आर्य-अनार्य यासंबंधीचे सिद्धांतच चुकीचे !

आज, २२ डिसेंबर या दिवशी वडाळामहादेव (जिल्हा अहिल्यानगर) येथील प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

आजपासून प्रत्येक शुक्रवारी वाचा नवीन सदर : प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे राष्ट्र-धर्माविषयीचे मौलिक विचारधन !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम !

‘प्रा. मॅक्सम्युलर आणि त्याचे अनुयायी हे युरोपियन पंडित ‘आर्य’ शब्दाचा अत्यंत विपरीत अर्थ करतात. त्यांच्या वसाहतवादाला अनुकूल असा अर्थ काढतात. ‘आर्य म्हणजे वंश’, असा ते अर्थ लावतात. वास्तविक ‘आर्य या शब्दाचा ‘वंश’, असा अर्थ अथांग वैदिक सारस्वत धुंडाळले, तरी अभावानेही आढळायचा नाही. ‘आर्य म्हणजे वंश’, अशी कल्पना लादून या कारस्थानी पंडितांनी आर्य आक्रमणाचा कपोलकल्पित सिद्धांत निर्माण केला. त्या घटनांच्या इत्थंभूत माहितीसाठी आपणाला १८ आणि १९ व्या शतकातील युरोप आपल्याला पहावा लागेल. विशेषत: जर्मनीचा राष्ट्रवाद पहावा लागेल. युरोपियन लोकांचा ‘सेमॅटिक विरोध’ (ख्रिस्ती आणि मुसलमानेतर धर्म), म्हणजे प्रामुख्याने हिंदु धर्म अन् संस्कृतीचा द्वेष आपणाला पहावा लागेल. त्यातूनच ‘आर्य म्हणजे वंश आणि आर्यांचे आक्रमण’, हे सिद्धांत निपजले आहेत.

१. आर्य आणि अनार्य यांविषयी केलेली व्याख्या चुकीची असल्याचे प्रा. मॅक्समुल्लरने सांगणे

‘आर्य ही एक जाती आहे. आर्य म्हणजे गोरे, आर्य म्हणजे द्विज म्हणजे सवर्ण हिंदू. अनार्य म्हणजे शूद्र, दलित’, असे मॅक्सम्युलरने प्रथम प्रतिपादन केले. त्याच्यावर टीकेची झोड उठली. तेव्हा त्याने ‘बायोग्राफी ऑफ वर्ड्स’ या ग्रंथात ‘तो प्रमाद (चूक) आहे’, असे मान्य केले. तो म्हणतो, ‘‘आमची सनातन हिंदु संस्कृतीच पंगू झाली. आर्य शब्द जेव्हा मी वापरतो, तेव्हा तो वंश वा जाती या अर्थाने नव्हे, तर तो गुणवाचक अर्थाने वापरतो, म्हणजे चारित्र्यवान, संयमी आणि सद्गुण संपन्न असा जो कुणी असेल, तो ‘आर्य’ आणि तसा नसेल तो ‘अनार्य.’’ मॅक्सम्युलरने तो प्रमाद घोषित केला; परंतु त्याची कुणीच नोंद घेतली नाही. ‘आर्य म्हणजे वरच्या वंशाचे आणि अनार्य म्हणजे शूद्र, दलित इत्यादी’, अशा अर्थाने आर्य-अनार्य हे सर्वच क्षेत्रांत धुडगूस घालू लागले.

२. आर्य विरुद्ध अनार्य या वादामुळे झालेला परिणाम !

त्या दृष्टीने वेदादी वाङ्मय, इतिहास, पुराणे, रामायण, महाभारत हे इतिहासप्रणित संस्कृत, प्राकृत नाटके, काव्य यांचे संशोधन चालू झाले. शाळा आणि विद्यापिठे यांतून तसा इतिहास लिहिला आणि शिकवला गेला. शेकडो नव्हे, सहस्रो प्रबंध ग्रंथ साहित्य निर्माण झाले. जगभर प्रसिद्ध झाले. सर्व प्रसारमाध्यमांनी हा आर्य-द्रविड (अनार्य) संघर्ष पेटवला, भडकवला. त्या आगीत आमचा ‘सनातन हिंदु धर्म’ आणि ‘संस्कृती’ विलक्षण होरपळली, विद्रूप झाली. अर्थाचे असे भयानक अनर्थ निर्माण केले गेले की, उत्तर हिंदुस्थान तो आर्यांचा देश आणि दक्षिण हिंदुस्थान द्रविडांचा, म्हणजे अनार्यांचा देश. ‘श्रीराम’ हा उत्तरेतील आर्य, तर ‘रावण’ हा दक्षिणेतील अनार्य. तो द्रविड म्हणजे अनार्य ! उत्तर हिंदुस्थानाने दक्षिण हिंदुस्थान, म्हणजे अनार्यांवर आक्रमण केले इत्यादी. याचा इतका भयंकर विषाक्त परिणाम झाला की, ‘उत्तर हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण हिंदुस्थान’, असे युद्ध पेटले.

३. आर्य-अनार्य सूत्र मुडदे उकरून काढण्यासारखेच !

आर्यांचे आक्रमण, आर्य-अनार्य, हे सिद्धांत केव्हाच जगाने गाडले; परंतु भारतात ते मुडदे उकरून त्यांची हाडे चघळण्याची स्पर्धा अजूनही चालूच आहे. कलात्मक अभिरुची व्यक्त करणारा सुंदर असा ‘कला-तत्त्वकोशाचा महाभूतां’विषयीचा खंड पहाण्यात आला. प्रस्तावनेत संपादिका लिहिते, ‘भारतीय कला या भारतियांच्या विश्वोत्पत्ती आणि विश्वसंरचना (Cosmology अन् Cosmogony) यांविषयीच्या संकल्पनावर आधारलेल्या आहेत. भारतीय कलांचे विविध प्रकार त्यांच्या सौंदर्यविषयक संकल्पनांनी आंतरिकदृष्ट्या परस्परांशी निगडित आहेत.’

पुढे ती संपादिका लिहिते, ‘ही वस्तूस्थिती लक्षात न घेता युरोपियन पद्धतीप्रमाणे कालानुक्रमे (Chronological) पाश्चात्त्य दृष्टीकोनातून सौंदर्यविश्लेषण किंवा चर्चा करणारे भारतीय कलांचे इतिहास लिहिले जातात. ही त्रुटी लक्षात घेऊन भारतीय संस्कृतीचे आकलन होण्याकरता आम्ही ही ‘कला-तत्त्व’कोशाची योजना हाती घेतली; परंतु इथेही आर्य आक्रमणाचे थोतांड लेखकाच्या मनावर दृढ कोरले गेले आहे, कसे ते पहा…

‘अग्नी’चे विवरण करतांना हा स्टाल लेखक लिहितो, ‘‘Agni was obviously an agent, of deforestation, in the Aryan expansion from West to East, (Which at first, stayed north of Ganga page 205) (पश्चिमेकडून पूर्वेकडे आर्यांचा विस्तार करण्यामध्ये अग्नी हा जंगलतोड करण्यामध्ये दलाल आहे. (जे आधी गंगेच्या उत्तरेला राहिले आहे. पृष्ठ क्र. २०५)) आर्यांचे आक्रमण हे मत अद्ययावत् संशोधनाने इतिहासजमा ठरवले आहे, याची या लेखकाला जाणीव नाही.’

 ४. ‘आर्यांनी भारतावर आक्रमण केले’, ही लोणकढी थाप !

आर्यांचे आद्य मूलस्थान अफगाणिस्तान, इराण किंवा मध्य आशिया यांपैकी कुठलेच नाही. पुरातत्त्वीय सामुग्री जी मोहेंजोदाडो, हडप्पा येथे विविध प्रकारे सापडली आहे, त्यावरून निरपवाद सिद्ध आहे की, ती वैदिक संस्कृती आहे. ते सर्व लोक भारताचेच निवासी असून हा भरत खंड त्यांचीच भूमी आहे. ‘भारतावर आर्यांनी आक्रमण केले’, ही अत्यंत लोणकढी थाप पाश्चात्त्य संशोधकांनी ठोकून दिली आहे. ही रहस्यमय थाप मॉर्टिमर व्हीलर, स्टूअर्ट पिगॉट, डायजेस्ट इत्यादी पाश्चात्त्य विद्वानांची आहे. आजही पश्चिमेत अनेक विद्वान आहेत की, जे ‘आर्य आक्रमणावरचा सिद्धांत हा निखालस खोटा आहे’, असे सांगतात आणि या विद्वानांचे समूळ खंडण करतात. ‘टी बरो’ नावाचा एक जाडा पंडित लिहितो, ‘भारतावर आर्यांच्या आक्रमणाचा कुठलाही लिखित पुरावा मिळत नाही आणि पुरातत्त्वीय सामुग्रीने या सिद्धांतास कुठलेही बळ मिळत नाही.’

टी बरो त्याच्या ग्रंथात ‘ओरिजनल संस्कृत टेक्स्ट’मध्ये  लिहितो, ‘मला प्रारंभापासूनच असे लक्षात आले की, संस्कृतच्या कुठल्याही प्राचीन ग्रंथात आर्यांचे मूळस्थान भारताच्या बाहेर असल्याचा उल्लेख नाही. उलट प्रत्यक्ष ऋग्वेदाच्या अनेक ऋचात ‘आमचे पितर येथेच, आमच्या पितरांनी येथेच’, असे स्पष्ट उल्लेख येतात. ऋग्वेदात प्रयुक्त केलेले शब्द दास, दस्यु, असुर इत्यादीवरून असे कुठलेही प्रमाण मुळीच मिळत नाही की, हे शब्द अनार्यांविषयी किंवा भारत मूलनिवासाविषयी वापरले असतील.’ ‘एलिफिस्टन’ हा थोर इतिहासकार ‘हिस्ट्री ऑफ इंडिया’ या ग्रंथात लिहितो, ‘भारताच्या कुठल्याही प्राचीन ग्रंथात, मनुस्मृतीत किंवा प्रत्यक्ष वेदवाङ्मयात ‘आर्य भारताबाहेरचे आहेत’, असा कुठलाही प्रसंग कुठेही वर्णित किंवा चित्रित केलेला नाही.’

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२०)

संपादकीय भूमिका

‘भारतावर आर्यांनी आक्रमण केले’, ही लोणकढी थाप कथित पाश्चात्त्य संशोधकांनी ठोकून दिली आहे, हे जाणून घ्या !