किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांचा २२.१२.२०२३ (मार्गशीर्ष शुक्ल दशमी) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त प.पू. देवबाबा यांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
प.पू. देवबाबा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘१८.९.२०२३ ते २५.९.२०२३ या कालावधीत मला किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात साधनेसाठी रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मी प.पू. देवबाबा यांना विविध विषयांवर प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
१. ध्यानसाधना, तसेच गाय आणि साप यांचे अस्तित्व यांमुळे आश्रमात दैवी ऊर्जा निर्माण झालेली असणे
श्री. राम होनप : आपल्या आश्रमात प्रवेश करताच मला वातावरणात सूक्ष्मातून निळ्या रंगाची दैवी ऊर्जा दिसली.
प.पू. देवबाबा : आश्रमात माझ्यासह काही साधकांची ध्यानसाधना चालू असते, तसेच येथे गाय आणि सापही आहेत. त्याचा हा परिणाम आहे.
२. ‘ध्यान करतांना साधकाला सूक्ष्मातून दिसणारा सोनेरी साप’, हे त्याच्या कुंडलिनीचे रूप असणे
श्री. राम होनप : ध्यान करतांना एकदा मला सूक्ष्मातून सोनेरी रंगाचा साप दिसला. त्याचा अर्थ काय ?
प.पू. देवबाबा : ती तुमची कुंडलिनीशक्ती आहे.
३. साधकाला ध्यानामध्ये सूक्ष्मातून दिसत असलेला पांढरा प्रकाश हा निर्गुण ईश्वर असणे
श्री. राम होनप : बीजमंत्रांचा उच्चार करतांना मला सूक्ष्मातून २ – ३ सेकंद ब्रह्मांडाचे दर्शन झाले. त्यानंतर मला सूक्ष्मातून एक मार्ग दिसला आणि त्याच्या शेवटी पांढरा प्रकाश होता; परंतु मला तेथे जाता आले नाही. तो पांढरा प्रकाश, म्हणजे निर्गुण ईश्वर का ?
प.पू. देवबाबा : हो.
४. ध्यान करतांना कुंडलिनी स्वाधिष्ठानचक्रापर्यंत आल्याने साधकाला सूक्ष्मातून ब्रह्मांड गुलाबी रंगाचे दिसणे
श्री. राम होनप : एकदा मला ध्यानात संपूर्ण ब्रह्मांड गुलाबी रंगाचे दिसले. त्यामागील कारण काय ?
प.पू. देवबाबा : गुलाबी रंग स्वाधिष्ठानचक्राशी संबंधित आहे.
श्री. राम होनप : याचा अर्थ त्या वेळी माझी कुंडलिनी स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोचली होती का ?
प.पू. देवबाबा : हो.
५. साधकाला बीजमंत्रांचा सराव करतांना ‘त्या गतीनुसार सरस्वतीदेवी वीणावादन करत आहे’, असे दृश्य दिसणे आणि त्याचा प.पू. देवबाबा यांनी सांगितलेला अर्थ !
श्री. राम होनप : तुम्ही शिकवल्याप्रमाणे मी कुंडलिनीचक्रांशी संबंधित बीजमंत्रांचा विशिष्ट गतीने उच्चार करत होतो. त्या गतीने ‘सरस्वतीदेवी वीणावादन करत आहे’, असे दृश्य सूक्ष्मातून मला दिसले. त्यामागील कारण काय ?
प.पू. देवबाबा : तुमची प्रकृती संगीताशी संबंधित आहे. त्यामुळे तुम्हाला असा अनुभव आला.
६. प.पू. देवबाबा यांनी योगवर्गात संस्कृत भाषा शिकवण्याच्या माध्यमातून साधकाची सूक्ष्मातून संस्कृत भाषा समजण्याची क्षमता जागृत होण्यास साहाय्य करणे
श्री. राम होनप : ध्यान करतांना मला सूक्ष्मातून संस्कृत भाषेतील काही श्लोक ऐकू आले; परंतु त्यांतील शब्द मला नीट समजले नाहीत.
प.पू. देवबाबा : काल योगवर्गामध्ये मी तुम्हाला थोडा वेळ संस्कृत भाषा शिकवली. त्या वेळी मी तुमच्या बुद्धीतील संस्कृत भाषा जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ध्यान करत असतांना तुमच्या बुद्धीतील काही संस्कृत शब्द जागृत अवस्थेत आले; म्हणून तुम्हाला वरील अनुभूती आली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.९.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |