वेळवंड (तालुका भोर, जिल्हा पुणे) येथील रावजी अर्जुना पांगुळ (वय ७७ वर्षे) यांचे ७.१२.२०२३ या दिवशी वारजे (पुणे) येथे कर्करोगाने निधन झाले. १९.१२.२०२३ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्त देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे त्यांचे पुतणे श्री. रामचंद्र दगडू पांगुळ यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. पुतण्याला वडिलांप्रमाणे प्रेम देणे आणि स्वतःसहित चुलत भावाची शेती अनघर यांचे दायित्व सांभाळणे
‘रावजी अर्जुना पांगुळ (अण्णा) हे माझे चुलत काका असले, तरी मला माझ्या वडिलांप्रमाणेच होते. माझे वडील आणि अण्णा यांची कुटुंबे मागील अनेक वर्षांपासून गावी एकत्रितपणे रहात आहेत. माझे वडील मुंबई येथे नोकरीला असतांना अण्णांनी गावाकडील शेती आणि आमच्या घरातील सर्व कामे दायित्व घेऊन पूर्ण केली. वडिलांनीही कधी दुजाभाव केला नाही. त्यामुळे ‘ते दोघे जण सख्खे भाऊच आहेत’, असे वाटायचे. अण्णा माझ्या वडिलांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पालन करत असत.
२. त्यांच्यात ‘नम्रता, इतरांना सामावून घेणे, इतरांचे ऐकणे, आज्ञापालन, निरपेक्ष प्रेम आणि निःस्वार्थीपणा’, हे गुण होते.
३. सनातनच्या मार्गदर्शनानुसार केलेली साधना
३ अ. वारकरी संप्रदायाचे असूनही पुतण्याने सांगितल्याप्रमाणे सनातनच्या मार्गदर्शनानुसार नामजपादी साधना करणे : अण्णांनी काही वर्षांपासून वारकरी संप्रदायानुसार एका संतांकडून जप घेतला होता. त्याप्रमाणे ते तो जप करत होते. मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर अण्णांना त्याविषयी सांगितले. मी त्यांना साधनेच्या दृष्टीने ईश्वरी पाठबळ मिळण्यासाठी जप किंवा मंत्र म्हणायला सांगितल्यास त्याप्रमाणे करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.
३ आ. सनातनचे ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमितपणे वाचणे : त्यांना आध्यात्मिक ग्रंथ वाचण्याची आवड होती. त्यांनी शेतीची कामे सांभाळत सनातनचे अनेक ग्रंथ वाचले. त्यांनी शेवटपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन केले.
३ इ. अण्णांच्या समवेतचा संवाद, म्हणजे एक प्रकारचा सत्संगच असणे : अण्णा साधना करत असल्याने त्यांना आध्यात्मिक क्षेत्रातील बरीच माहिती होती. ते मला आध्यात्मिक मित्राप्रमाणे वाटायचे. त्यामुळे मी त्यांच्याशी व्यवहार आणि साधना यांविषयी बोलायचो. आमच्यातील संवाद, म्हणजे एक प्रकारचा सत्संगच असायचा. माझे विचार आध्यात्मिक असल्याने त्यांनाही ते आवडायचे. परम पूज्यांच्या कृपेने ते विचार अण्णा लगेच स्वीकारायचे आणि त्याप्रमाणे त्वरित कृतीही करायचे.
३ ई. सनातनने सांगितल्याप्रमाणे धार्मिक कृती शास्त्रानुसार करण्याचा त्यांच्या प्रयत्न असायचा.
४. पुतण्याला पूर्णवेळ साधना करण्यासाठी अनुमती देणे
मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मी याविषयी सर्वप्रथम अण्णांना सांगितले. त्या वेळी त्यांनी त्याला लगेच होकार दर्शवला.
५. परात्पर गुरु पांडे महाराज यांचा सत्संग लाभणे आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे वाचन करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करणे
त्यांना परात्पर गुरु पांडे महाराज (बाबा) यांचा ४ वेळा सत्संग लाभला. त्या वेळी परात्पर गुरु बाबांनी त्यांना ‘तीर्थयात्रा कशी करावी ?’, याविषयी सांगितले होते, तसेच ‘पंढरीचा खरा वारकरी कोण आहे ?’, याविषयी त्यांना अवगत केले होते. परात्पर गुरु बाबांनी लिहिलेला ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’, हा ग्रंथ अण्णांनी पूर्ण वाचला आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्नही केला.
६. अण्णांच्या समवेत तीर्थयात्रा करतांना जाणवलेली सूत्रे
६ अ. तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर मांसाहार सोडणे : वर्ष २००७ मध्ये मी आणि अण्णा काशी आणि उत्तर भारतातील काही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गेलो होतो. त्याआधी ते मांसाहार करत होते; परंतु ‘काशीक्षेत्री जाऊन आल्याने आता आपण मांसाहार करायला नको’, असे वाटून त्यांनी घरी जात असतांनाच आळंदी येथे जाऊन गळ्यात तुळशीची माळ घातली आणि मांसाहार सोडला.
६ आ. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे आज्ञापालन म्हणून थंडीतही धोतर आणि सदरा, अशी सात्त्विक वेशभूषा करणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांनी अण्णांना तीर्थक्षेत्री गेल्यावर धोतर आणि सदरा, असा सात्त्विक पोषाख परिधान करून देवदर्शन करण्यास सांगितले होते. आम्ही तीर्थक्षेत्री गेलो असतांना त्या भागात पुष्कळ थंडी होती, तरीही केवळ परात्पर गुरु महाराजांचे आज्ञापालन म्हणून त्यांनी धोतर आणि सदरा, असा सात्त्विक पोषाख परिधान करून देवदर्शन केले. आम्ही तेथे जवळजवळ २२ दिवस होतो. त्या सर्व कालावधीत त्यांनी पुष्कळ नामजप केला.
६ इ. तीर्थयात्रेच्या वेळी सनातनच्या सेवाकेंद्रांत निवासाचे नियोजन असणे आणि साधकांचे आदरातिथ्य पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा वाढणे : तीर्थयात्रेच्या वेळी आमचे रहाण्याचे नियोजन सनातनच्या वेगवेगळ्या सेवाकेंद्रांमध्ये आणि साधकांकडे करण्यात आले होते. साधकांचे नियोजन आणि प्रेम पाहून अण्णांची पुष्कळ भावजागृती व्हायची. ते म्हणायचे, ‘‘हे साधक आपल्या ओळखीचे नाहीत, तरी ते इतके आपुलकीने आदरातिथ्य कसे करू शकतात ?’’ त्यांना त्याचे पुष्कळ आश्चर्य वाटले होते. त्यानंतर त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा दृढ झाली. तेव्हापासून त्यांनी सनातनला जेवढे शक्य आहे, तेवढे साहाय्य करण्यास आरंभ केला.
७. सनातनचे साधक आणि आश्रम यांना केलेले साहाय्य !
७ अ. शेतातील धान्य आणि फळे आश्रमात पाठवणे : त्यांनी अनेक वेळा स्वतःच्या शेतात पिकलेले धान्य आश्रमात दिले आहे. ते उन्हाळ्यात जांभळे, करवंदेे इत्यादी फळे आवर्जून वेळ काढून जंगलातून गोळा करत असत आणि आश्रमात पाठवत असत.
७ आ. दुर्मिळ आयुर्वेदीय औषधी वनस्पती शोधण्यासाठी साहाय्य करणे : ५ वर्षांपूर्वी आयुर्वेदीय औषधांच्या निर्मितीच्या दृष्टीने गावाकडील काही जंगलांमधील दुर्मिळ वनस्पती शोधायच्या होत्या. त्यानुसार आमच्या भागात (पुणे जिल्ह्यातील मावळ भागात) अशा अनेक आयुर्वेदीय वनस्पती आहेत की, ज्यांचे लोकांना महत्त्व नाही आणि ज्या जंगलात दूरवर आहेत. ‘औषधी वनस्पती शोधायच्या आहेत’, असे अण्णांना सांगितल्यावर ते आम्हा काही साधकांच्या समवेत जंगलात आले आणि वयाच्या ७३ व्या वर्षी ८० ते ९० कि.मी. अंतर चालले.
७ इ. ‘अधिकाधिक साधक राहू शकतील’, अशा प्रकारे वास्तूचे बांधकाम करणे :
अण्णांना त्यांच्या वडिलांच्या अंतिम इच्छेप्रमाणे नवीन वास्तू बांधायची होती. ‘आवश्यकता लागल्यास सनातनच्या कार्याला साहाय्य होण्यासाठी घरात अधिकाधिक साधकांच्या निवासाची व्यवस्था करता यावी’, अशा प्रकारे घराचे बांधकाम करण्यास त्यांनी अनुमती दर्शवली. अनेक अडचणी येऊनही ही वास्तूनिर्मिती केवळ अण्णांची तळमळ आणि देवाचा आशीर्वाद यांमुळे पूर्ण होऊ शकली.
८. शेवटचे आजारपण
८ अ. कर्करोगाचे निदान झाल्यावर ते सहजतेने स्वीकारणे : ३ मासांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. ‘हे वृत्त त्यांना कसे आणि कुणी सांगायचे ?’, असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘ते पूर्ण आयुष्य आध्यात्मिक स्तरावर जगले. त्यामुळे त्यांना मृत्यूसारखी गंभीर आणि अंतिम सत्य असलेली गोष्ट स्वीकारणे सहज शक्य आहे.’
मी देवाला प्रार्थना करून त्यांना त्यांच्या स्थितीविषयी सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे. त्यामुळे त्याला घाबरायची काही आवश्यकता नाही. देवाने माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. आता मला मृत्यूची भीती मुळीच वाटत नाही. त्यामुळे त्याला केव्हा यायचे, ते येऊ दे.’’
८ आ. शारीरिक त्रासातही इतरांचा विचार करणे : त्यानंतर एक मासाने त्यांची स्थिती खालावत जाऊन त्यांना शारीरिक त्रास होऊ लागला. तेव्हा ते सतत आध्यात्मिक स्तरावर बोलायचे. त्या वेळीही ते इतरांचा विचार करत होते.
८ इ. शेवटपर्यंत सनातनचे ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचणे : अण्णांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना पुणे येथील ज्या रुग्णालयात भरती केले होते, तेथे देवाच्या कृपेने आध्यात्मिक वातावरण होतेे. तेथे त्यांनी ‘वाल्मीकि रामायण’ हा ग्रंथ शेवटच्या क्षणापर्यंत वाचला. त्यांनी शेवटपर्यंत ग्रंथवाचन, नामजप आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन केले. त्यामुळे ते शेवटच्या श्वासापर्यंत सत्मध्ये राहिले.
९. निधन
त्यांचा मृत्यू चांगल्या दिवशी आणि फार शारीरिक त्रास न होता शांतपणे झाला.
१०. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१० अ. अण्णांचा मृत्यू झाल्यावर दुःख न होणे आणि त्यांच्या अंत्यविधीच्या सेवेत सेवाभावाने सहभागी होणे : परम पूज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची काळजी घेतली. त्यांचा मृत्यू झाल्यावर मायेतील एखादी व्यक्ती गेल्यावर जसे दुःख होते, तसे दुःख मला झाले नाही. मी अत्यंत सेवाभावाने त्यांच्या अंत्यविधीच्या सिद्धतेच्या सेवेत सहभागी झालो होतो.
१० आ. ‘त्यांच्या पूर्वपुण्याईमुळे ते या जन्मी परम पूज्यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे कल्याण झाले’, असे मला जाणवले.
‘देवाच्या इच्छेने सर्व घडत असते; परंतु ते प्रत्यक्ष स्वीकारण्याच्या वेळी पुष्कळ संघर्ष होत असतो. त्या वेळी योग्य दृष्टिकोन मिळाले, तर आपल्याला योग्य दिशा मिळते’, हे मला अण्णांकडून शिकायला मिळाले.
‘परम पूज्यांनी अण्णांना त्यांच्या चरणी जागा द्यावी’, अशी मी परम पूज्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. रामचंद्र दगडू पांगुळ ((कै.) रावजी पांगुळ यांचा पुतण्या), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१२.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |