अखेर दाऊद इब्राहिमलाही लक्ष्य करण्यात आले. गेल्या काही मासांपासून भारतविरोधी आतंकवाद्यांना पाकिस्तानमध्ये लक्ष्य करण्यात येत आहे. आतापर्यंत २२ हून अधिक आतंकवाद्यांना पाकिस्तानमध्ये अज्ञातांकडून ठार करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ब्रिटन, कॅनडा येथेही काही आतंकवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाकमधील दाऊद इब्राहिम, हाफिज सईद, सय्यद सल्लाउद्दीन आदी मोठ्या आतंकवाद्यांना पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.कडून संरक्षण पुरवण्यात आले आहे. दाऊदला तर वर्ष १९९३ पासूनच आय.एस्.आय.ने त्याच्या संरक्षणात ठेवलेले आहे. इतरांना आता घरातच रहाण्यास सांगण्यात आले आहे. असे असतांना दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेला अद्याप भारताच्या कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने अधिकृत दुजोरा दिलेला नसला, तरी पाकमधील प्रसारमाध्यमांनी याविषयीचे वृत्त प्रसारित केल्याने ते खरे असण्याची शक्यता अधिक आहे. दाऊद कराचीमध्ये रहात असून तेथीलच एका रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. दाऊदला ठार करण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी प्रयत्न केल्याचे दावे यापूर्वी करण्यात आले होते. आताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एक योजना आखली होती; मात्र ऐनवेळी त्यांना योजना कार्यान्वित न करण्यास ‘वरून’ सांगण्यात आल्याने दाऊदला मारता आले नव्हते. जे दाऊदला मारण्यासाठी मुंबईतून गेले होते, त्यांना नंतर दाऊद टोळीने ठार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. दाऊद मुंबईत वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटातील मुख्य सूत्रधार आहे. त्याला भारतातील काही राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याने त्याच्यावर कारवाई होत नाही, अशीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता दाऊदवर विषप्रयोग होणे, ही घटना अत्यंत गूढ असणार, यात शंका नाही. याची माहिती उघड झाल्यास भविष्यात यावर एखादा चित्रपट निघाल्यास आश्चर्य वाटू नये. दाऊदला भारताच्या कह्यात देण्याची मागणी भारताने अनेकदा पाककडे केली; मात्र ‘दाऊद इब्राहिम’ नावाची व्यक्ती पाकमध्ये रहात नाही’, असेच पाकिस्तान सांगत आला आहे. पाकवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. दाऊद कराचीत कुठे रहातो ? याची पूर्ण माहिती भारताकडे आहे. अमेरिका, ब्रिटन आदींच्या गुप्तचर यंत्रणांकडेही याची माहिती आहे. विदेशी यंत्रणा भारताला याविषयी उघडपणे कोणतेही साहाय्य करत नसल्याचेच आतापर्यंत दिसून आले आहे.
आता दाऊदला खरेच विष देण्यात आले आणि तो रुग्णालयात असेल, तर पाकला याची माहिती द्यावी लागणार आहे. यातून दाऊद पाकमध्ये होता, हे जगासमोर उघड होईल आणि पाकचा खोटारडेपणाही उघड होईल; मात्र तो अशी माहिती देण्याची शक्यता अल्पच आहे. सध्या तरी दाऊद मेला, तरी भारताला तसा त्याचा काही लाभ नाही. उलट तो भारताला मिळाला असता, तर अनेक राजकारण्यांचे खरे चेहरे उघड झाले असते !
भारतविरोधी कारवाया करणार्या आतंकवाद्यांवर पाकमध्ये घुसून कारवाई करण्याएवढी आक्रमकता भारतामध्ये कधी निर्माण होणार ? |