Ayodhya Mandir America : अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनप्रीत्यर्थ अमेरिकेतील हिंदूंकडून मेरीलँड राज्यात वाहनफेरी !

महिनाभर चालणार आनंदोत्सव !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अयोध्येत २२ जनवरी २०२४ या दिवशी भव्य श्रीराममंदिराचे ऐतिहासिक उद्घाटन होणार आहे. हिंदूंच्या ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर उभारल्या जात असलेल्या राममंदिरामुळे केवळ भारतातच नाही, तर विदेशातही पुष्कळ उत्साह आणि उल्हास पहायला मिळत आहे. अशातच अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळ असलेल्या मेरीलँड राज्यात हिंदूंनी चारचाकी वाहनांची भव्य फेरी काढली.

१. स्थानिक हिंदु कुटुंबे मेरीलँड राज्यात असलेल्या फ्रेडरिक शहरातील श्री भक्त अंजनेय मंदिरात एकत्रित आले आणि त्यांनी राममंदिराच्या उद्घाटनाच्या प्रीत्यर्थ भव्य फेरीचे आयोजन केले होते.

२. राममंदिराच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने पुढील महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


३. २० जानेवारीला राजधानी वॉशिंग्टनमध्ये साधारण १ सहस्र हिंदु कुटुंबांच्या उपस्थितीत ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

४. अमेरिकेतील विश्‍व हिंदु परिषदेचे अध्यक्ष महेंद्र सापा यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, या कार्यक्रमांमध्ये रामलीलेचे आयोजनही करण्यात येणार आहे. यासह प्रभु श्रीरामाच्या जीवनावर आधारित गोष्टींचे सादरीकरण, श्रीरामाची आरती आणि भजन यांचे कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत.