रामसेतूचे महत्त्व अबाधित रहाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

‘२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्या हे जसे श्रीरामाचे जन्मस्थान आणि राज्य करण्याचे स्थान आहे. अशाच प्रकारे दक्षिणेत प्रभु श्रीरामाच्या पराक्रमाचे एक स्थान आहे, ते म्हणजे रामेश्वरम् अन् तेथील रामसेतू ! रामसेतूविषयी अनेकांना कुतूहल असते आणि आहे, तसेच ते प्रत्येक हिंदूला असलेच पाहिजे. लाखो वर्षांपूर्वी प्रभु श्रीरामाने केलेल्या पराक्रमाची आणि त्याची पावले ज्यावर पडली, ते प्रत्येक स्थानच हिंदूंसाठी परम पवित्र अन् ऊर्जादायी आहे. अशा या रामसेतूविषयीची काही माहिती जाणून घेणार आहोत.

१. धनुषकोडी ते तलैरमन्नारमधील समुद्रातील भाग !

भारताच्या दक्षिणेस रामेश्वरम् येथे गेल्यावर तेथून २४ किलोमीटर अंतरावर धनुषकोडी हे गाव आहे. धनुषकोडी, म्हणजे धनुष्याला लावलेला बाण जसा दिसेल, तसा धनुषकोडीपर्यंत रस्ता निमुळता होत जातो आणि एका टप्प्याला रस्ता संपतो अन् त्यापुढे समुद्र चालू होतो. येथे भारतीय महासागर आणि बंगालचा उपसागर एकत्र येतात, असे ठिकाण आहे. सध्या येथील पाण्यात कुणाला उतरू देत नाहीत; कारण दोन्ही बाजूचे समुद्र येथे एकमेकांवर आदळत असल्याने तेथील क्षेत्र सध्या धोकादायक आहे.

धनुषकोडी ते श्रीलंकेतील तलैरमन्नार हे बेट यांना जोडणारा सेतू हा रामभक्त वानरांनी बनवलेला ५० किलोमीटर लांबीचा आहे. रामेश्वरम् मंदिरातील माहिती संग्रहानुसार वर्ष १४८० पर्यंत रामसेतू दिसू शकायचा आणि रामसेतूवरून काही अंतर समुद्रात चालत जाऊ शकायचो, असे त्याचे स्वरूप होते; मात्र एक मोठे चक्रीवादळ आले आणि तो पाण्याखाली गेला. वर्ष

१९६४ मध्ये आणखी एक प्रचंड शक्तीशाली चक्रीवादळ रामेश्वरम्वर आदळले. परिणामी तो आणखी पाण्याखाली गेला. या चक्रीवादळामुळे धनुषकोडी येथे पुष्कळ जीवित आणि वित्त यांची हानी झाली आणि ते गाव निर्मनुष्य करण्यात आले. अनुमाने १ सहस्र ८०० हून अधिक लोकांचा तेव्हा मृत्यू झाला. उर्वरित गाव तत्कालीन सरकारने अन्यत्र वसवले.

श्री. यज्ञेश सावंत

२. रामसेतूविषयी स्थानिकांमध्येच अनभिज्ञता !

धनुषकोडी येथे भूमी जेथे संपते, तेथे आल्यावर २-३ दुर्बिणी उभ्या केलेल्या व्यक्ती आपल्याला दिसतात आणि त्यांच्या दुर्बिणीतून पाहिल्यावर समोर समुद्रात जो भूभाग दिसतो, त्यालाच ते ‘तो रामसेतू आहे’, असे सांगतात अन् त्याहून अधिक दूर अंतरावर दिसणार्‍या भागाला श्रीलंकेचा भाग म्हणून सांगतात. दुर्बिणीतून दिसणार्‍या पहिल्या पठारी भागापर्यंत जायचे म्हटले, तर ते शक्य नाही. तेथे तर खोल समुद्र दिसतो. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्या पठारी भागापर्यंत पूर्वी, म्हणजे काही दशकांपूर्वी चालत जाऊ शकतो, अशी स्थिती होती; मात्र चक्रीवादळानंतर समुद्राचे पाणी जमा झाले, म्हणजे हे पठार जवळपास एक किलोमीटर अंतरावर आहे. हे पठार, म्हणजे समुद्रातील एक छोटे बेट आहे. त्या बेटापासून पुढे रामसेतू चालू होतो. या बेटावर सध्या ससे आणि उंदीर असे प्राणी आहेत, ती जागा भारत सरकारच्या कह्यात आहे. त्या पुढील भाग मात्र पाणीच पाणी आहे आणि तो भाग श्रीलंका सरकारच्या कह्यात आहे.

३. रामसेतूचे दर्शन होते का ?

रामसेतूचे थेट दर्शन होत नाही; कारण रामसेतू वर्ष १४८० आणि वर्ष १९६४ मध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर पाण्याखाली काही थोडाथोडका नव्हे, तर स्थानिकांच्या मतानुसार अनुमाने काही मीटर ते एक किलोमीटर पाण्याखाली गेला आहे, तसेच आसपासची एरव्ही दिसणारी बेटे ही पाण्याखाली गेली आहेत. श्रीलंकेच्या बाजूला, म्हणजे तलैरमन्नार येथे तो दिसू शकतो; मात्र तेथून काही अंतरावर तो पुन्हा पाण्याखाली जातो. भारताकडील धनुषकोडीच्या शेवटच्या टोकापर्यंतचा अनुमाने १ किलोमीटर रस्ता हा रामसेतूचाच एक भाग आहे, असे मानले जाते.

आपण धनुषकोडी येथे जाऊन समुद्रातील रामसेतूचे दर्शन घेऊ, असे होत नाही. त्यामुळे आपण ज्या आशेने किंवा अपेक्षेने येतो, त्यानुसार दर्शन होत नाही. रामसेतूच्या दर्शनासाठी समुद्रातून जायचे असल्यास सध्या तशी अनुमती मिळत नाही; मात्र विशेष अनुमती घेऊनच अभ्यास अथवा संशोधन यांसाठी तेथे जायला मिळाल्यासच जाऊ शकतो, अन्यथा ते सध्या तरी उपलब्ध नाही.

४. रामसेतूचे दगड उपलब्ध होणे

रामसेतूच्या भिंतीमध्ये लहान मासे लपतात. त्यांना खाण्यासाठी मोठे मासे येतात आणि ते भिंतींवर शेपटीचा प्रहार करतात अन् दोन्ही समुद्रही सातत्याने रामसेतूवर आदळत असतात. त्यामुळे रामसेतूच्या कडा अथवा भिंती कमकुवत होत जाऊन त्याचे तुकडे पडतात. हे तुकडे समुद्रात तरंगतात आणि नंतर तेथे आसपासच्या भागात वहात गेल्यावर तेथे मासेमारी करणारे मासेमार ते गोळा करतात. हे तुकडे दर्शनासाठी काही स्थानिक मंदिरांमध्ये उपलब्ध असतात.

५. विशेष अनुमती घेऊनही रामसेतूचे दर्शन नाही !

स्थानिक जाणकारांच्या माहितीनुसार विशेष अनुमती घेऊन कुरसुर्डीं बेट येथे जाण्याची व्यवस्था होते. समवेत एक माहिती सांगणारा (गाईड) असतो; मात्र तेथे सकाळ ते दुपार या वेळेतच जाता येते, म्हणजे सीमा शुल्क विभागाने तुम्हाला अनुमती दिली, तरी प्रत्यक्ष रामसेतूपर्यंत जाता येत नाही.

शिकागो येथून स्वामी विवेकानंद सर्वधर्म परिषदेहून पुन्हा आल्यावर त्यांनी पहिले पाऊल जेथे ठेवले, ती जागा म्हणजे कुंदगल गाव ! तेथेही ‘विवेकानंद रॉक’ नावाचे ठिकाण आहे. या गावातून एका अंतरापर्यंत जाता येते; मात्र त्वरितच परतावे लागते. श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये, म्हणजे तलैरमन्नार अन् धनुषकोडी यांच्यामध्ये काही निर्मनुष्य बेटे आहेत. त्या बेटांपैकी काही बेटांवर श्रीलंकेतील आतंकवादी संघटना ‘एल्.टी.टी.ई.’चे (‘लिबरेशन ऑफ तमिळ ईलम’चे) आतंकवादी अद्यापही आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. ते त्यांच्या बेटांजवळ अन्य कुणाला येऊ देत नाहीत आणि येथे काही वेळा गोळीबारही होतो.

कुंदगल गावच्या स्थानिक जाणकाराने सांगितले की, ‘मी ३ वेळा मला रामसेतू पहायचाच’, असा निश्चय करून गेलो, तेव्हा मला माहिती सांगणार्‍याने प्रत्येक वेळी वेगवेगळी जागा दाखवली. आमच्याकडील ७० वर्षांच्या वृद्ध व्यक्तींनीही असाच अनुभव मला सांगितला होता. स्थानिकांच्या मते सरकार रामसेतूविषयी जाणूनबुजून गुप्तता ठेवत आहे, जेणेकरून तेथे लोकांची जाण्याची गर्दी होऊ नये, तो भाग सुरक्षित राहील आणि लोकांनाही धोका उत्पन्न होऊ नये या दृष्टीने !

६. रामसेतूविषयी अपसमज पसरवण्याचा प्रयत्न !

रामसेतू हा श्रीरामाच्या वानरसेनेने बांधला, तर त्याविषयी पुढील संशोधन, म्हणजे त्याची माहिती हिंदूंना उपलब्ध होणे, त्याच्या दर्शनाची व्यवस्था करणे असे का होत नाही ? याचा विचार करतांना प्रामुख्याने माहिती मिळाली. ती म्हणजे ‘रामसेतू हा रामाने बांधला हे सोडाच, तो मानवनिर्मित आहे कि नैसर्गिक आहे ?’, यावर तज्ञांचा खल चालू आहे म्हणे ! बुद्धीवादी तज्ञांची कीव करावीशी वाटते. यात पाश्चात्त्य बुद्धीवादीच नाही, तर भारतातील अनेक महाभाग आहेत की, ते वैज्ञानिकदृष्ट्या आणि समुद्री रचनांच्या अभ्यासाच्या आधारे सांगत आहेत की, ही नैसर्गिक रचना आहे मनुष्यनिर्मित नाही !

७. रामसेतू तोडण्यासाठी प्रारंभी ब्रिटीश आणि नंतर काँग्रेस यांची घातक चाल !

वर्ष १८२३ मध्ये ऑर्थर कॉटन या ब्रिटीश संशोधकाने पंबन (रामेश्वरम् येथील रामसेतू जवळचे गाव) येथे सर्वेक्षण केले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील प्रवासामध्ये तैलमन्नारचे आखात अन् पाल्कची सामुद्रधुनी यांना हा रामसेतू वेगळा करतो. परिणामी ‘रामसेतूचा काही भाग तोडून छोटी आणि मोठी जहाजे जाण्यासाठी मार्ग सिद्ध करू शकतो’, असे त्याला वाटले अन् तशी योजना त्याने मांडली. त्याने ही योजना मांडून प्रत्यक्षात प्रयत्न चालू केला; मात्र त्याची डाळ काही शिजली नाही आणि अनेक कारणांमुळे हा प्रयत्न सोडून द्यावा लागला. हाच प्रकल्प स्वातंत्र्यानंतर हिंदुद्वेषी काँग्रेस सरकारने हातात घेऊन त्याला ‘सेतूसमुद्रम् प्रकल्प’ असे गोंडस नाव देऊन सेतू तोडण्यासाठी प्रयत्न केले; मात्र हिंदूंच्या विरोधामुळे सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तो प्रकल्प रेंगाळत जाऊन थांबला आणि आताच्या केंद्र सरकारने हिंदूंच्या भावना लक्षात घेता ‘सागरी सेतूला काही धक्का न लावता श्रीलंकेला वळसा घालूनच जहाजे जातील’, हे धोरण स्वीकारले आहे.

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने म्हणे सांगितले आहे की, त्यांच्या उपग्रहांच्या (‘सॅटेलाईट’च्या) छायाचित्रांनुसार ‘हा ‘ॲडम ब्रिज’ आहे आणि तो मनुष्यनिर्मित आहे’, याचे सकृतदर्शनी काही कारण लक्षात येत नाही. ‘नासा’ ठरली अमेरिकी अवकाश संशोधन संस्था ! तिला लाखो वर्षांचा इतिहास असलेल्या हिंदूंच्या पूर्वजांनी निर्माण केलेली अद्भुत आश्चर्ये काय कळणार ?

८. केंद्र सरकारने रामभक्तांच्या अपेक्षांची पूर्तता करावी !

सर्वसामान्यांना धनुषकोडी येथे जाऊनही रामसेतूचे समाधानकारक दर्शन मिळत नाही, यासाठी केंद्र सरकार विविध स्वरूपाच्या उपाययोजना करू शकते का ? हे पाहिले पाहिजे. मुख्य म्हणजे धनुषकोडी येथे रामसेतूची सद्यःस्थिती, त्याची माहिती सांगणारे फलक उपलब्ध केले पाहिजेत.

सध्या एवढ्या विविध प्रकारचे छायाचित्रक आणि ‘सॅटेलाईट इमेजिंग’ व्यवस्था उपलब्ध आहेत, तर रामसेतूचे प्रत्यक्ष नाही, तर छायाचित्रात्मक वा ‘लाईव्ह व्हिडिओ’ यांद्वारे दर्शन घेण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. जेणेकरून रामभक्त धनुषकोडी येथे प्रत्यक्षात न येता अन्य ठिकाणांहूनही दर्शन घेऊ शकतील. विशिष्ट प्रकारची अनुमती देऊन रामभक्तांना श्रीलंका अथवा भारत येथून रामसेतूच्या जवळ जाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे.

काही दशकांपूर्वी समुद्रात बुडून समुद्राच्या तळाशी पोचलेल्या ‘टायटॅनिक’ जहाजाच्या अवशेषापर्यंत लोकांना जाण्याची सुविधा विदेशात केली जाते, तर हिंदूंचा ऐतिहासिक वारसा असणार्‍या रामसेतूपर्यंत पोचण्याची व्यवस्था सरकार का करू शकत नाही ?

छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक स्मारक समुद्रात उभारण्यासाठी ३ सहस्र कोटी रुपयांहून अधिक व्यय करण्यात येणार आहे. समुद्रात नावेने एका विशिष्ट अंतरावरील बेटापर्यंत गेल्यास, त्या बेटावर हे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. येथे तर रामसेतू हा ऐतिहासिक आणि धार्मिक सेतू स्वयंसिद्ध आहे. भारत सरकारने स्वत:हून लक्ष घालून त्यासाठी योजना सिद्ध करावी. द्रविडस्तानाचा प्रभाव असलेले आणि सनातन धर्माचा द्वेष करणार्‍या तमिळनाडू सरकारकडून हिंदू फार काही अपेक्षा ठेवू शकत नाहीत.

रामसेतू आपला दैवी आणि एकमेवाद्वितीय वारसा आहे. त्याचे रक्षण आणि संगोपन झालेच पाहिजे. केंद्र सरकारची ‘रामायण रेल्वे सर्किट’ ही रेल्वे तिकीट सुविधा आहे. ज्यामध्ये प्रभु श्रीराम भारतातील ज्या स्थानी गेले, तेथे तुमचा काही दिवसांमध्ये प्रवास पूर्ण केला जातो; पण त्यात रामसेतूचे संवर्धन आणि दर्शन यांसाठीची योजना नाही. हिंदूंना रामसेतूच्या सद्यःस्थितीची आणखी माहिती हवी आहे आणि त्याची स्थिती समजून घ्यायची आहे, त्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक होऊन आज ना उद्या हिंदूंच्या अपेक्षांची पूर्तता करावी !’

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.१२.२०२३)