सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हाताच्या बोटांतून, तसेच डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वरूपी प्रकाशाचे प्रयोग

‘साधना करणार्‍या उन्नत व्यक्तीच्या देहातून पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे सातत्याने प्रक्षेपित होत असतात. या पंचतत्त्वांतील तेजतत्त्व अनुभवणे थोडे सोपे आहे. तेजतत्त्व हे आपल्याला उष्णता आणि प्रकाश यांच्या माध्यमातून जाणवते. यांतील प्रकाशाची अनुभूती घेता येण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काही प्रयोग केले. ‘एखाद्या ठिकाणी त्यांनी हात केल्यावर किंवा त्या ठिकाणी त्यांनी पाहिल्यावर हाताच्या बोटांतून किंवा डोळ्यांतून तेजतत्त्व प्रकाशाच्या रूपात प्रक्षेपित झाल्याने त्या ठिकाणी काय पालट अनुभवायला येतात ?’, या संदर्भातील हे प्रयोग होते. येथे हे प्रयोग, त्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्या अनुभूतींमागील शास्त्र दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. प्रयोगातील सामायिक भाग

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत आडवी तुळई (बीम) आहे. तिच्या भूमीला समांतर असलेल्या आडव्या भागावर दंडदीप (ट्यूबलाईट) आडवा लावला आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दंडदीपाच्या समोर साधारण ५ मीटर अंतरावर बसून पुढील प्रयोग केले.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समोर हात केल्यावर त्या भागातील प्रकाश वाढणे किंवा अंधार न्यून होणे

२ अ. तुळई आणि तिला लागून असलेले छत यांवर पडलेल्या दंडदीपाच्या प्रकाशाच्या दिशेने हात केल्यावर ‘प्रकाशात काय पालट होतो ?’, ते पहाणे : प्रयोग करतांना चालू असलेल्या दंडदीपाचा प्रकाश तुळई आणि तिच्या काटकोनात तिला लागून असलेले खोलीचे छत यांच्या काही भागावर पडला होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दंडदीपाचा प्रकाश जेथे पडला होता, त्याच्या दिशेने त्यांचा उजवा हात केला. त्या वेळी त्यांनी त्या हाताची बोटे सरळ ठेवली. प्रथम त्यांनी त्यांचा हात स्थिर ठेवला आणि काही वेळाने तो डावीकडे-उजवीकडे थोडा हालवला. तसे केल्यावर ‘दंडदीपाच्या पडलेल्या प्रकाशात काय पालट होतो ?’, हे त्यांनी आम्हा प्रयोग बघणार्‍या साधकांना पहाण्यास सांगितले.

२ अ १. अनुभूती – दंडदीपाच्या पडलेल्या प्रकाशात थोडी वाढ होणे, तो थोडासा निळसरही दिसणे आणि हात हलवल्यावर प्रकाशही हलतांना दिसणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचा हात दंडदीपाच्या प्रकाशाच्या समोर करून तो स्थिर ठेवला, तेव्हा तुळई आणि छत यांवर पडलेला दंडदीपाचा प्रकाश थोडा वाढल्याचे, तसेच तो थोडासा निळसर झाल्याचे प्रयोग बघणार्‍या साधकांना जाणवले. नंतर त्यांनी आपला हात डावीकडे-उजवीकडे थोडा हलवल्यावर तुळई आणि छत यांवरील प्रकाश हलतांना दिसला.

२ अ १ अ. अनुभूतींमागील शास्त्र : साधना केल्याने देहामध्ये सत्त्वगुण वाढतो आणि देहातून पृथ्वी, आप, तेज, वायु अन् आकाश ही पंचतत्त्वे चैतन्याच्या स्तरावर प्रक्षेपित होऊ लागतात. देहातील पंचतत्त्वे प्रक्षेपित होऊ लागल्यावर कोणत्या पंचतत्त्वामुळे कोणत्या अनुभूती येतात, हे पुढील सारणीमध्ये दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अध्यात्मातील ‘परात्पर गुरु’ या सर्वाेच्च पदावर असून त्यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी लावायला नाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन्  यांनी ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’च्या माध्यमातून सांगितले आहे. साधनेमुळे त्यांच्या संपूर्ण देहातून तेजतत्त्व सातत्याने प्रक्षेपित होत असते. त्यामुळे ते त्यांच्या बोटांतूनही सातत्याने प्रक्षेपित होते. तेजतत्त्व प्रकाशाच्या रूपात प्रक्षेपित होते, हे येथील सारणीत दिले आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जेव्हा तुळई आणि छत यांवर पडलेल्या दंडदीपाच्या प्रकाशाच्या दिशेने आपला हात केला, तेव्हा तो प्रकाश थोडा वाढल्याचे प्रयोग बघणार्‍या साधकांना दिसले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बोटांतून प्रक्षेपित होणारा प्रकाश दंडदीपाच्या प्रकाशात मिसळला गेला आणि त्यामुळे तो वाढलेला दिसला. त्यांनी जेव्हा आपला हात डावीकडे-उजवीकडे हलवला, तेव्हा त्यांच्या बोटांतून प्रक्षेपित झालेल्या प्रकाशाचे स्थानही हलले. त्यामुळे प्रकाश हलतांना दिसला.

२ अ १ आ. प्रकाश निळसर दिसण्याचे कारण : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हात तुळई आणि छत यांवर पडलेल्या दंडदीपाच्या प्रकाशाच्या दिशेने केल्यावर तो प्रकाश थोडासा निळसर दिसला. याचे कारण म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये विष्णुतत्त्व आहे, तसेच महर्षींनी ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’मध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत’, असे म्हटले आहे. विष्णुतत्त्व हे निळसर असल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दंडदीपाच्या प्रकाशाच्या दिशेने हात केल्यावर तो प्रकाश निळसर झाला, असे लक्षात आले, तसेच ईश्वरभक्तीचा सूक्ष्मातील रंगही निळसर असतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’ या अध्यात्मातील सर्वाेच्च पदावर असल्याने त्यांच्यात ईश्वरभक्ती आहेच. खरेतर ते ईश्वराचेच सगुण रूप आहेत; म्हणूनही त्यांच्यामुळे दंडदीपाचा प्रकाश निळसर झालेला दिसला.

२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दंडदीप चालू असतांना त्याच्या दिशेने हात करणे : चालू असलेल्या आडव्या दंडदीपाच्या पुढील तुळईवर त्याची सावली पडली होती. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दंडदीपाच्या दिशेने आपला हात केला. तेव्हा त्यांनी ‘दंडदीपाच्या पडलेल्या सावलीमध्ये काय पालट होतो ?’, याचे निरीक्षण आम्हाला करायला सांगितले. ते स्पष्टपणे कळण्यासाठी त्यांनी दंडदीपाच्या दिशेने केलेला आपला हात मागे घेतला आणि पुन्हा तो दंडदीपाच्या दिशेने केला. असे त्यांनी दोन-तीनदा केले.

२ आ १. अनुभूती – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी चालू असलेल्या दंडदीपाच्या दिशेने आपला हात केल्यावर आडव्या दंडदीपाच्या पुढे तुळईवर त्याची पडणारी सावली फिकट झाली.

२ आ १ अ. अनुभूतीमागील शास्त्र : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दंडदीपाच्या दिशेने आपला हात केल्यावर त्यांच्या हाताच्या बोटांतून प्रक्षेपित झालेला तेजतत्त्वरूपी प्रकाश दंडदीपामध्ये मिसळला. त्यामुळे दंडदीपाचा प्रकाश वाढल्याने दंडदीपाची पडलेली सावली फिकट झाली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दंडदीपाच्या दिशेने केलेला हात मागे घेतल्यावर दंडदीपाची फिकट झालेली सावली गडद व्हायची आणि त्यांनी दंडदीपाच्या दिशेने हात केल्यावर दंडदीपाची सावली पुन्हा फिकट व्हायची. यावरून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हाताच्या बोटांतून प्रकाश प्रक्षेपित होतो, हे सिद्ध झाले.

२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तुळईवरील थोडासा अंधार असलेल्या दिशेने हात करणे, तसेच त्यांनी त्या अंधाराच्या भागात हात डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे हलवणे : तुळईवर दंडदीपाच्या उजवीकडील भागापुढे थोडासा अंधार होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्या अंधाराच्या दिशेने हात केला आणि ‘त्या अंधारामध्ये काय पालट होतो ?’, हे पहाण्यास सांगितले, तसेच त्यांनी अंधाराच्या दिशेने केलेला हात त्या अंधाराच्या भागात डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे हलवला. तेव्हाही त्यांनी ‘त्या अंधारामध्ये काय पालट होतो ?’, हे पहाण्यास सांगितले.

२ इ १. अनुभूती – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तुळईवरील (छतावरील बीमवर) थोडासा अंधार असलेल्या दिशेने हात केल्यावर तेथील अंधार न्यून होणे आणि त्यांनी हात डावीकडे-उजवीकडे हलवल्यावर अंधारावर प्रकाशाचे पट्टे उमटत असल्यासारखे दिसणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तुळईवरील थोडासा अंधार असलेल्या भागाच्या दिशेने हात केल्यावर तेथील अंधार न्यून झाल्याचे लक्षात आले, तसेच त्यांनी हात स्थिर न ठेवता त्या अंधार असलेल्या भागात डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे २ – ३ वेळा हलवला. त्या वेळी रंगाच्या ‘ब्रश’ने एखाद्या रंगाचे आडवे पट्टे लावल्यावर ज्याप्रमाणे आधीचा रंग पुसला जाऊन नवीन रंगाचे पट्टे दिसतात, त्याप्रमाणे ‘अंधार दूर होऊन प्रकाशाचे पट्टे तुळईवर उमटत आहेत’, असे दिसले.

२ इ १ अ. अनुभूतींमागील शास्त्र : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जेव्हा त्यांचा हात तुळईवरील थोडासा अंधार असलेल्या भागाच्या दिशेने केला, तेव्हा त्यांच्या हाताच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्‍या प्रकाशामुळे तेथील अंधार न्यून झाला. तसेच जेव्हा ते त्यांचा हात अंधाराच्या भागात डावीकडे-उजवीकडे हलवत होते, तेव्हा त्यांच्या बोटांतून प्रक्षेपित झालेला प्रकाशही डावीकडे-उजवीकडे पसरत होता आणि प्रकाशाचा पट्टा तयार होत होता. त्यामुळे ‘त्या प्रकाशाच्या पट्ट्याने अंधार पुसला जात आहे’, असे तेव्हा जाणवत होते.

२ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी खोलीत २ दंडदीप चालू असतांना भिंतीच्या वरच्या भागातील कोनाड्याच्या दिशेने हात करणे : या प्रयोगात तुळईवरील दंडदीप चालू होता, तसेच आडव्या तुळईच्या दोन्ही बाजूंना काटकोनात असलेल्या दोन्ही भिंतींवरील दंडदीपही चालू होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तुळई, तिच्यापुढील भिंत आणि वरील छत हे एकमेकांना जोडलेल्या ठिकाणी झालेल्या त्रिकोणी कोनाड्याच्या दिशेने हात केला.

२ ई १. अनुभूती – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातातून प्रकाशकण प्रक्षेपित होत असलेले दिसणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कोनाड्याच्या दिशेने हात केल्यावर तेथे दैवी प्रकाशमान कण दिसले, तसेच प्रकाशकण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हाताकडून कोनाड्याच्या दिशेने जात असल्याचेही दिसले. त्या प्रकाशकणांना गती होती.

२ ई १ अ. अनुभूतीमागील शास्त्र : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बोटांतून तेजतत्त्व प्रक्षेपित होते. ते आपल्याला डोळ्यांनी प्रकाशाच्या रूपात दिसते. चैतन्य हे तेजतत्त्वाचे दुसरे रूप आहे. ते आणखी सूक्ष्म आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बोटांतून प्रकाशासह चैतन्यही प्रक्षेपित होतच असते. त्यांनी स्पर्श केलेली कोणतीही वस्तू चैतन्याने भारित होते. त्यामुळे तिची सकारात्मक ऊर्जा वाढते आणि ती ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे मोजता येते. वर्ष २०१२ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देहावर चैतन्याचे सोनेरी रंगाचे दैवी कणही दिसले होते, तसेच ‘दैवी कण त्यांच्या देहातून प्रक्षेपितही होत आहेत’, हेही समजले होते. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दैवी कण’) आताही ‘त्यांनी खोलीतील कोनाड्याच्या दिशेने हात केल्यावर आणि खोलीतील प्रकाश आणखी २ दंडदीप लावून वाढवल्यावर त्यांच्या हाताच्या बोटांतून प्रकाशमान दैवी कण कोनाड्याच्या दिशेने जात आहेत’, याची अनुभूती घेता आली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बोटांतून प्रक्षेपित होणारे दैवी प्रकाशमान कण म्हणजे चैतन्याचे कण होते.

२ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तुळईच्या अलीकडे खोलीच्या मध्यभागी असणार्‍या छताकडे हात केला आणि त्याचे निरीक्षण करायला सांगितले, तसेच छताच्या या भागाची तुलना त्याच्या उजवीकडे कडेला असलेल्या छताच्या भागाशी करण्यास सांगितली.

२ उ १. अनुभूती – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी छताच्या दिशेने हात केल्यावर तेथे प्रकाश दिसणे, छताचा तो भाग सजीव जाणवणे आणि त्याकडे बघून भावजागृती होणे : खोलीच्या मध्यभागी असलेल्या छतावर प्रकाश दिसला. त्या तुलनेत त्याच्या उजवीकडे कडेला असलेल्या छतावर अल्प प्रकाश दिसला. छताच्या त्या दोन्ही भागांची तुलना केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘छताचा मधला भाग सजीव, तर त्याच्या उजवीकडे कडेला असलेल्या छताचा भाग निर्जीव वाटतो.’’ छताचा मधला प्रकाश असलेला भाग बघून भावजागृती झाली.

२ उ १ अ. अनुभूतींमागील शास्त्र : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी खोलीच्या मध्यभागी असलेल्या छताच्या दिशेने हात केल्यावर त्यांच्या हातातून प्रक्षेपित झालेल्या तेजतत्त्वामुळे तेथे प्रकाश दिसला. छताचा हा मधला भाग आणि त्याच्या उजवीकडे असलेला छताचा भाग यांची तुलना केल्यावर छताच्या त्या दोन्ही भागांमधील भेद सहजतेने लक्षात आला. छताचा मधला भाग थोडा प्रकाशमान दिसत होता, तर छताचा दुसरा भाग प्रकाशमान दिसत नव्हता, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातातून प्रकाश प्रक्षेपित होण्यासह चैतन्यही प्रक्षेपित होते. त्यामुळे त्यांनी खोलीच्या मध्यभागी असलेल्या छताच्या दिशेने हात केल्यावर त्यांच्या हातातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे छताचा तो भाग सजीव असल्याप्रमाणे वाटला. ही सजीवता डोळ्यांना ‘ते छत मऊ जाणवणे’, या रूपात जाणवली. याउलट छताचा अन्य भाग निर्जीव आणि कडक वाटला; कारण त्याकडे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हात केलेला नव्हता. एखादी चैतन्यमय वस्तू बघून आपोआपच ईश्वराची अनुभूती येते आणि भावजागृती होते. त्यामुळे छताचा मधला प्रकाश असलेला भाग बघून भावजागृती झाली.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समोर बघितल्यावर त्या भागातील प्रकाश वाढणे किंवा अंधार न्यून होणे

३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तुळई आणि छत यांवर पडलेल्या दंडदीपाच्या प्रकाशाकडे पहाणे : प्रयोग करतांना तुळईवरील दंडदीप चालू होता. त्यामुळे त्याचा प्रकाश तुळई आणि तिच्या काटकोनात तिला लागून असलेले खोलीचे छत यांच्या काही भागावर पडला होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दंडदीपाचा प्रकाश जेथे पडला होता, त्या दिशेकडे पाहू लागले आणि त्यांनी ‘दंडदीपाच्या पडलेल्या प्रकाशात काय पालट होतो ?’, हे आम्हा साधकांना पहायला सांगितले.

३ अ १. अनुभूती – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तुळई आणि छत येथे पडलेल्या दंडदीपाच्या प्रकाशाकडे पाहिल्यावर तेथील प्रकाश वाढल्याचे अन् तो निळसर झाल्याचे दिसले, तसेच हातामुळे जेवढ्या भागाचा प्रकाश वाढला, त्यापेक्षा डोळ्यांमुळे अधिक भागाचा प्रकाश वाढलेला दिसला.

३ अ १ अ. अनुभूतींमागील शास्त्र : सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांच्या संपूर्ण देहातून तेजतत्त्व प्रकाशाच्या रूपात प्रक्षेपित होत असते. त्यामुळे ते त्यांच्या डोळ्यांतूनही प्रक्षेपित होते. संपूर्ण देहापैकी डोळे हे तेजतत्त्व जाणवण्याचे ज्ञानेंद्रिय आहे, तसेच ते तेजतत्त्व प्रक्षेपित करण्याचेही प्रमुख माध्यम आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तुळई आणि छत येथे पडलेल्या दंडदीपाच्या प्रकाशाकडे पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यांतून प्रक्षेपित झालेल्या तेजतत्त्वरूपी प्रकाशामुळे दंडदीपाचा प्रकाश वाढल्याचे दिसले, तसेच त्यांच्यातील विष्णुतत्त्व आणि ईश्वर भक्ती यांच्यामुळेही दंडदीपाचा प्रकाश निळसर झाल्याचे दिसले.

हातातून जे तेजतत्त्वरूपी प्रकाशकिरण प्रक्षेपित होतात, ते ठराविक भागात प्रक्षेपित होतात. आपण डोळ्यांनी पुष्कळ मोठा भाग पाहू शकतो. त्यामुळे तेवढ्या भागात डोळ्यांतून प्रक्षेपित झालेला तेजतत्त्वरूपी प्रकाश पसरतो; म्हणून हातामुळे जेवढ्या भागाचा प्रकाश वाढला, त्यापेक्षा डोळ्यांमुळे अधिक भागाचा प्रकाश वाढलेला दिसला.

३ आ. तुळई, भिंत आणि छत हे एकमेकांना जोडलेल्या ठिकाणी तयार झालेल्या कोनाड्यात असलेल्या अंधाराकडे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पहाणे : तुळईचा उजवीकडील शेवटचा भाग, त्याच्यापुढील काटकोनातील आडवी भिंत आणि त्यांच्या काटकोनातील छत हे एकमेकांना जोडलेल्या ठिकाणी त्रिकोणी कोनाडा तयार झाला आहे. तेथे थोडा अंधार होता. त्या कोपर्‍यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पाहिले आणि ‘तेथील अंधारामध्ये काय पालट होतो ?’, याचे त्यांनी आम्हाला निरीक्षण करायला सांगितले.

३ आ १. अनुभूती – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्रिकोणी कोनाड्यातील अंधाराकडे पाहिल्यावर तेथे गोलाकार प्रकाश दिसणे, त्या प्रकाशात पिवळी आणि गुलाबी छटा दिसणे, तसेच नंतर कोनाड्याचा संपूर्ण भाग प्रकाशमान वाटू लागणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तुळई, तिच्यापुढील भिंत आणि वरील छत हे एकमेकांना जोडलेल्या ठिकाणी झालेल्या त्रिकोणी कोनाड्यातील अंधाराकडे पाहिल्यावर तेथे प्रथम गोलाकार पांढरा प्रकाश पडल्याचे दिसले. त्या पांढर्‍या प्रकाशात पिवळी आणि गुलाबी छटाही दिसली. थोड्या वेळाने त्या संपूर्ण कोनाड्यात प्रकाश पसरला.

३ आ १ अ. अनुभूतींमागील शास्त्र : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या डोळ्यांतून तेजतत्त्वाचा प्रकाश कोनाड्याकडे प्रक्षेपित झाला आणि कोनाड्याच्या आकारामुळे त्याला गोलाकार प्राप्त झाला. त्या पांढर्‍या गोलाकार प्रकाशात फिकट पिवळी आणि गुलाबी छटा दिसण्याचे कारण, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील अनुक्रमे चैतन्य अन् ‘प्रीती’ हा गुण. चैतन्याचा सूक्ष्मातील रंग पिवळा आहे आणि प्रीतीचा सूक्ष्मातील रंग फिकट गुलाबी आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या डोळ्यांतून प्रकाशाचे होणारे प्रक्षेपण वाढल्यामुळे संपूर्ण कोनाड्यात प्रकाश पसरला.

३ इ. थोडासा अंधार असलेल्या एका त्रिकोणी कोनाड्याकडे हाताचा तळवा करून त्याच्या बोटांमधील अंतरामधून कोनाड्याकडे बघणे आणि त्या वेळी तो तळहात आजूबाजूला आडवा हलवणे : खोलीत छत, तुळई आणि भिंत यांच्या एकत्रीकरणातून एक त्रिकोणी कोनाडा बनला आहे. त्या कोनाड्यात थोडासा अंधार होता. सच्चिदानंद परब्रह्म

डॉ. आठवले यांनी अंधार असलेल्या त्या कोनाड्याच्या दिशेने आशीर्वादासारखा आपला तळहात केला. त्या वेळी त्यांनी त्या तळहाताच्या बोटांमध्ये अंतर ठेवले आणि त्यामधून त्या कोनाड्याकडे बघितले. कोनाड्याकडे बघतांना त्यांनी तो तळहात मनगटातून आजूबाजूला आडवा फिरवला आणि आम्हाला त्या कोपर्‍याचे निरीक्षण करायला सांगितले.

३ इ १. अनुभूती : त्या कोनाड्यात धुरासारखा प्रकाश तयार झालेला दिसला. हात काढल्यावरही तेथे एखाद्या ठिकाणी धूप दाखवल्यावर जमा होणार्‍या धुराप्रमाणे दिसणारा स्थिर असा प्रकाशाचा ढग दिसला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्या कोनाड्याच्या दिशेने केलेला हात मागे घेतल्यावर काही सेकंदांनी तो प्रकाशाचा ढग न्यून झालेला दिसला. तीन मिनिटांनंतरही त्या कोनाड्याच्या पुढे त्याला जोडून असलेले भितींचे कोपरे धूसर दिसत होते, म्हणजे अजूनही तेथे थोडासा धुरासारखा प्रकाश होता, तसेच तेथे पिवळसर रंगही दिसत होता.

३ इ १ अ. अनुभूतींमागील शास्त्र : साधना करणार्‍या उन्नत व्यक्तीच्या देहातून तेजतत्त्व प्रक्षेपित होत असते. हे तेजतत्त्व तिच्या बोटांतून, तसेच तळहातातूनही प्रक्षेपित होत असते. बोटांतून प्रक्षेपित होणारे तेजतत्त्व हे अधिकतर प्रकाशाच्या रूपात, तर तळहातातून ते अधिकतर शक्तीच्या रूपात बाहेर पडते. त्यामुळे तळहातातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वामध्ये पृथ्वीतत्त्व, म्हणजे शक्ती अधिक असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कोनाड्याच्या दिशेने आपला तळहात करून आणि त्याच्या बोटांमध्ये ठेवलेल्या अंतरामधून त्या कोनाड्याकडे पाहिले. तेव्हा त्यांनी आपला तळहात आजूबाजूला आडवा हलवला. त्या वेळी त्या कोनाड्यामध्ये धुरासारखा तयार झालेला प्रकाश आम्हा साधकांना दिसला. याचे कारण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या डोळ्यांतून कोनाड्याकडे प्रक्षेपित झालेला तेजतत्त्वरूपी प्रकाश आणि त्यांच्या तळहातातून कोनाड्याकडे प्रक्षेपित झालेले शक्तीयुक्त (पृथ्वीतत्त्वयुक्त) तेजतत्त्व यांचा संयोग हे आहे. तेजतत्त्व आणि पृथ्वीतत्त्व यांच्या संयोगाने धुराची निर्मिती होते. तो कोनाडा असल्यामुळे तो धुरासारखा प्रकाश काही सेकंद तेथेच टिकून राहिला आणि मग तो न्यून झाला. तो धुरासारखा प्रकाश आजूबाजूला पसरला, तेव्हा त्रिकोणी कोनाड्यांच्या पुढे त्याला जोडून असलेले भितींचे ३ कोपरे धुरासारख्या प्रकाशामुळे धूसर दिसले. तो धूसर प्रकाश म्हणजे तेजतत्त्व असल्याने, म्हणजेच ते चैतन्य असल्याने आणि त्याचा रंग पिवळसर असल्याने त्या कोपर्‍यांवर पिवळसर रंगही आलेला दिसला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे त्यांच्या हाताची बोटे आणि डोळे यांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजत्त्वाची अनुभूती आम्हाला घेता आली. असे प्रयोग अन्य कुणी केलेले ऐकिवात किंवा वाचनात नाहीत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी संशोधनाचे नवे दालन आम्हाला उघडे करून दिले, यासाठी आम्ही त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.१.२०२३)

तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हाताच्या बोटांतून, तसेच डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वरूपी प्रकाशाचे प्रयोग’, या संदर्भात संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. या प्रयोगांच्या संदर्भात कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ? या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

संपर्क : श्री. आशिष सावंत

इ-मेल : [email protected]

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.