नवी देहली – भारतीय नौदलाने अरबी समुद्रात माल्टाचा देशाच्या मालवाहू नौकेच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय नौदलाने तात्काळ कारवाई करत समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवणारे विमान आणि एक चाचेगिरीविरोधी गस्ती युद्धनौका घटनास्थळी पाठवली आणि माल्टाच्या नौकेला सुरक्षा पुरवली. भारतीय नौदल या मालवाहू नौकेच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. सध्या ही नौका सोमालियाच्या किनार्याकडे सरकत आहे.
भारतीय नौदलाने सांगितले की, माल्टाहून निघालेल्या मालवाहू नौकेवर १८ कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचार्यांनी १४ डिसेंबर या दिवशी ‘युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स’च्या पोर्टलवर एक संदेश पाठवला की, ६ अनोळखी लोक त्यांच्या नौकेचा पाठलाग करत आहेत. या माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत भारतीय नौदलाने माल्टा नौकेच्या साहाय्यासाठी त्यांचे निरीक्षण (सर्व्हिलान्स) विमान पाठवले आणि मालवाहू नौकेला तात्काळ सुरक्षा पुरवली.