रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०२२ मध्ये साजरा झालेला सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस म्हणजे दिव्य लोकातील भावसोहळा !

‘२०.११.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा ३३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्या वेळी रामनाथी आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली देशपांडे हिला आलेल्या अनुभूती, पू. अश्विनीताईंनी केलेले मार्गदर्शन आणि सायलीला जाणवलेले पू. अश्विनीताईंचे दैवी गुण यांविषयी येथे दिले आहे.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी रामनाथी आश्रमाविषयी केलेले मार्गदर्शन

कु. सायली देशपांडे

‘‘रामनाथी आश्रम म्हणजे भूवैकुंठ आहे. येथील प्रत्येक साधकाकडून शिकायला मिळते. ‘अनंत हस्ते देता कमलाकराने, घेता किती घेशील दो कराने ।’, या उक्तीप्रमाणे देव आपल्याला पुष्कळ देत असतो. आपण शिकण्याच्या संधीचा लाभ करून घेऊया.’’

१. अनुभूती

१ अ. पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी वातावरणात आनंद अनुभवणे : ‘२०.११.२०२२ या दिवशी सकाळी ‘आज पू. अश्विनीताईंचा वाढदिवस आहे’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद अनुभवता आला. ‘प्रत्येक झाड, पाने, फुले, पशू-पक्षी आनंद व्यक्त करत आहेत’, असे मला जाणवले. वातावरणातील आनंदातही वाढ झाली होती.

१ आ. वाढदिवसाच्या ठिकाणी आल्यानंतर ‘दिव्य लोकात आले आहे’, असे जाणवणे : कार्यक्रमस्थळी आल्यावर ‘मी दिव्य लोकात आले आहे’, असे मला जाणवत होते. सोहळा चालू झाल्यावर मला आनंदाची स्पंदने जाणवत होती. मला ‘पू. अश्विनीताईंचे दर्शन होत आहे आणि त्यांच्या सोहळ्यात सहभागी होता येत आहे’, याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

१ इ. पू. अश्विनीताईंसाठी केलेली कविता ऐकतांना मला त्यांच्यामध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे तत्त्व जाणवू लागले आणि माझा कृतज्ञताभाव दाटून आला.

२. पू. (सौ.) अश्विनीताईंनी केलेले अमूल्य मार्गदर्शन

२ अ. ‘चुका झाल्यावर भीती वाटून ताण येणे’, या स्वभावदोषावर पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगितलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दृष्टीकोन : पू. अश्विनीताईंनी सांगितले, ‘‘आपल्या मनात ‘माझ्याकडून सेवेत चुका होतील. उत्तरदायी साधक चुका सांगतील’, अशी भीती असते. त्यामुळे आपल्याला ताण येऊन काळजी वाटते. तेव्हा आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला दृष्टीकोन लक्षात घ्यावा. परात्पर गुरु डॉ. आठवले सांगतात, ‘‘साधकांच्या मनातील ‘माझे चुकले’, या विचारामागे ‘माझे चुकायला नको’, हा विचार असतो, म्हणजे ती त्यांची स्वेच्छा असते, तसेच ‘कुणी मला चूक सांगेल’, या विचारामागे ‘मला कुणी चूक सांगू नये’, अशी स्वेच्छा असते. साधकांनी स्वेच्छेत अडकायचे नाही. साधकांनी वर्तमानकाळात रहायचे आणि परमेश्वरी इच्छा स्वीकारायची. साधक वर्तमानकाळात राहिल्याने त्यांच्या मनात ‘पुढे काय होईल ? कुणी चूक सांगितली तर ?’, असे विचार येणार नाहीत.

२ आ. ‘शिकण्याच्या स्थितीत राहिल्याने चिंता, ताण आणि काळजी’ असे न वाटता सतत आनंद जाणवणे : उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून देवाला चूक सांगायची असेल, तर ती ईश्वरेच्छेने सांगितली जाईलच. तेव्हा साधकांनी स्वेच्छा आड येऊ देऊ नये. हे अहंचे अडथळे आहेत. सर्वकाही ईश्वरेच्छेने होत असते, ते स्वीकारा आणि परिस्थितीतील आनंद घ्या. साधकांनी सकारात्मक आणि शिकण्याच्या स्थितीत रहावे. साधकांनी शिकण्याच्या स्थितीत राहिल्याने त्यांना चिंता, ताण, काळजी असे काही वाटत नाही. त्यांना सतत आनंद जाणवतो. जो शिकण्याच्या स्थितीत रहात नाही, तो स्वतःच्या कोषात रहातो.’’

३. पू. (सौ.) अश्विनीताईंनी मार्गदर्शन केल्यानंतर वातावरणात जाणवलेला पालट आणि अनुभवलेली शांती

पू. ताईंचे मार्गदर्शन झाल्यानंतर मला वातावरणात गारवा जाणवू लागला. सर्वत्र शांतीची स्पंदने प्रक्षेपित झाली. कुणीही बोलत नव्हते. तेव्हा पू. ताई म्हणाल्या, ‘‘अशी शांतीची स्थिती अनुभवत रहावी’, असे वाटते.’’ त्यानंतर आम्ही डोळे बंद करून ती शांती अनुभवू लागलो. त्या वेळी वातावरणात मोठ्या प्रमाणात निर्गुण तत्त्व जाणवत होते. ‘मी कुठेतरी आकाशात तरंगत आहे’, असे मला वाटत होते.

४. पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन

४ अ. सहजता : पू. ताईंचा वाढदिवस साजरा झाल्यावर त्या सर्वांशी प्रेमाने आणि सहजतेने बोलत होत्या. माझी आणि त्यांची या वेळी प्रथमच ओळख झाली, तरीही त्या आमची अनेक वर्षांपासून ओळख असल्याप्रमाणे सहजतेने बोलत होत्या.

४ आ. शिकण्याची वृत्ती : एकदा पू. ताई बालसाधकांच्या दैवी सत्संगात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मला तुमच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले.’’ पू. ताई आमच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत आणि त्यांचा आध्यात्मिक अधिकारही उच्च आहे, तरीही त्या आमच्याकडून शिकण्याच्या स्थितीत होत्या.

४ इ. कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणे : पू. अश्विनीताई मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे ज्ञानाची गंगा आहे. ते ज्ञान प्रत्येक साधकाच्या माध्यमातून पाझरत असते. मीही काही वेगळे सांगणार नाही. त्यांनी सांगितलेली काही वाक्येच सांगणार आहे.’’ अशा प्रकारे त्यांनी कर्तेपणा गुरुचरणी अर्पण केला.

५. कृतज्ञता

‘गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे मला पू. अश्विनीताईंच्या वाढदिवसाच्या दिव्य सोहळ्यात सहभागी होता आले आणि अनेक भावक्षण अनुभवता आले. मला पू. ताईंकडून पुष्कळ शिकायला मिळाले, त्याबद्दल मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.११.२०२२)