७.१२.२०२२ या दिवशी दैवी बालसाधकांच्या सत्संगात पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवारकाकू यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यांना अन् एका बालसाधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांनी केलेले मार्गदर्शन
अ. ‘आपण सर्वांनी स्वतःत जर एका गुणाची वृद्धी केली, तर अनेक स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आपोआप नष्ट होतील.
आ. आपल्याला सत्संगात सांगितलेले ध्येय प्रतिदिन पूर्ण करूया आणि त्याचा प्रत्येक घंट्याला आढावा घेऊया.
इ. अनेक गुणांची माळ बनवून ती गुरुचरणी अर्पण करूया.
ई. ‘प.पू. गुरुदेव आपल्यासाठी किती करत आहेत !’, याची जाणीव ठेवून आपण त्यासाठी सतत कृतज्ञताभावात रहाण्याचा प्रयत्न करूया.
२. पू. (श्रीमती) डगवार यांना आलेल्या अनुभूती
अ. दैवी सत्संगात आल्यावर ‘मी जणू एक छोटी बालिकाच झाली आहे’, असे मला वाटले.
आ. कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १२ वर्षे) बोलत असतांना ‘तिच्या वाणीतून प्रकाश बाहेर पडून तो प्रत्येकाच्या हृदयात जात आहे’, असे मला जाणवले.
इ. जेव्हा मी सत्संगात आले, तेव्हा प्रार्थना चालू होती. सभागृहात येताक्षणीच मला ‘प्रत्येक साधक हे शेवंतीचे पुष्प आहे’, असे जाणवू लागले आणि प्रत्यक्षात कु. प्रार्थना पाठक ही शेवंतीच्या पुष्पांविषयीच प्रार्थना घेत होती. हे मला वैशिष्ट्यपूर्ण वाटले.
ई. कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना ‘जणू काळच तिचे शब्दमोती वेचण्यासाठी थांबला आहे’, असे मला जाणवले.
उ. ‘हा दैवी सत्संग उच्च लोकातच चालू आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला ऋषीमुनी अन् देवता यांचेही अस्तित्व जाणवले.
ऊ. ‘सत्संगाच्या शेवटी प्रकाशात वाढ झाली’, असे मला जाणवले; तसेच दैवी सुगंधही येत होता.’
– (पू.) श्रीमती मंदाकिनी डगवार (वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१२.२०२२)
३. कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती
अ. ‘पू. डगवारकाकू सत्संगात माझ्या बाजूलाच बसल्या होत्या. त्या वेळी ‘जणू भगवंतच पू. काकूंच्या रूपात माझ्या बाजूला बसला आहे आणि तोच माझ्याकडून सर्वकाही करून घेत आहे’, असे मला जाणवले. माझ्या उजव्या हातावर एक सोनेरी रंगाचा दैवी कण सत्संग संपेपर्यंत दिसत होता.
आ. ज्या दिवशी पू. डगवारकाकू दैवी सत्संगात आल्या, त्या दिवशी दत्तजयंती आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवसही होता. वातावरणात श्री दत्ततत्त्व आणि श्री देवीतत्त्व कार्यरत झालेच होते. त्याच समवेत पू. काकूंच्या उपस्थितीने ‘ईश्वराचे सगुण तत्त्व थेट मिळत आहे’, असे मला जाणवले.’
– कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१५.१२.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |