उद्या म्हणजे १०.१२.२०२३ या दिवशी कै. शशिकांत मनोहर ठुसे यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे, त्या निमित्ताने…
‘केवळ नामस्मरण हीच आपली अमूल्य धनसंपत्ती आहे.’ – कै. शशिकांत ठुसे
प.पू. भक्तराज महाराज यांचे निस्सीम भक्त आणि प.पू. काणे महाराज यांची २५ वर्षे अविरत सेवा करणारे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील शशिकांत मनोहर ठुसे (वय ८१ वर्षे) यांचे २९.११.२०२३ या दिवशी निधन झाले. सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आपण कै. ठुसेकाका यांच्या निधनानंतरच्या दहाव्या दिवशी म्हणजे ८.१२.२०२३ या दिवशी पाहिली. त्या लेखाचा उर्वरित भाग येथे दिला आहे.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/743962.html
शशिकांत ठुसे यांनी गुरुबंधू डॉ. जयंत आठवले यांना पत्र लिहून १३ लाख रामनामाच्या आहुतीचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
आदरणीय गुरुबंधू डॉ. जयंत आठवले यांस,
सप्रेम भगवत् स्मरण, गुरुशरणम् वि.वि.
२३.११.२०२३ या दिवशी आपले भ्रमणभाषवर बोलणे झाल्याप्रमाणे आपणांस हे लिहून पाठवत आहे. त्यासह या कार्यक्रमाच्या आमंत्रणाचे पत्रही पाठवत आहे. त्या पत्रात ‘सद्गुरूंच्या कृपेनेच हा कार्यक्रम पूर्णत्वास जाईल’, हा विश्वास आहे’, असेही लिहिले आहे.
प.पू. काणे महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, म्हणजे १६.११.२०२३ या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून रामनामाची आहुती चालू करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी ३ यज्ञकुंडे बनवली होती. त्यात ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, या मंत्रातील रामनामाच्या (एका मंत्रात ३ वेळा ‘राम’ हे नाम येते.) १३ लाख आहुतींचे हवन करायचे होते; परंतु कार्यक्रमाच्या १५ दिवस आधी मी स्वतः, कु. गायत्री (मुलगी) आणि चि. विद्याधर (पुतण्या), असे तिघेही ताप अन् खोकला यांमुळे आजारी पडलो. कार्यक्रम एकेक दिवस जवळ येत होता. त्यामुळे दडपण येत होते. ‘कसे होणार ?’, याची काळजी वाढत होती. ‘गुरुकृपेनेच हा कार्यक्रम होणार’, हा विश्वास असूनसुद्धा काळजी वाटत होती; परंतु खरेच ‘गुरुकृपा’ काय असते ?’, याचा अनुभव आला. त्या दिवशी प्रत्यक्षात जवळजवळ २५० ते ३०० भक्त आले. प्रथम सकाळी ८ ते ९ या वेळेत १ घंटा विष्णुसहस्रनाम आणि नंतर ‘रामनामा’च्या आहुतीस आरंभ होऊन दुपारी १ वाजेपर्यंत १४ लक्ष ५८ सहस्र रामनामाच्या आहुती झाल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व जण महाप्रसाद घेऊन आपापल्या घरी परतले. हाच तो गुरुकृपेचा अनुभव ! एक माळ, म्हणजे १०८ वेळा मंत्र x ३ (एका मंत्रात ३ वेळा रामनाम येते) x ३० माळा x १५० भक्त = १४ लक्ष ५८ सहस्र. (२५० ते ३०० माणसे सकाळी ९ वाजता आली नव्हती. १० – ११ वाजेपर्यंत सवडीने आली; म्हणून केवळ १५० भक्तच हिशोबात धरले.)
आणि आता सारखा विचार येतो तो असा –
या अज्ञान्याने वाल्मीकि रामायण वाचले होते. त्यातील एक चौपाई सारखी आठवते.
नित्य करितां भगवद्भजन । संकल्प विकल्प गेले विरोन ।
त्यासींच भेटे रघुनंदन । अनन्यभजन या नांव ।। – भावार्थरामायण, युद्धकांड, अध्याय २४, ओवी ३५
अर्थ : नित्य भगवंताचे स्मरण केल्यावर मनाची ‘संकल्प-विकल्प’ स्थिती नाहीशी होते आणि त्याच वेळी भगवंताची प्राप्ती होते. यालाच ‘अनन्यभजन’ म्हणतात.
आश्रमातील सर्व संतांना / भक्तांना गुरुस्मरण, भगवत् स्मरण !’
– आपला एक अज्ञानी गुरुबंधू,
शशिकांत ठुसे, नारायणगाव, पुणे. (२४.११.२०२३)
१२. ठुसेकाकांच्या समवेत फिरायला गेल्यावर त्यांचा मिळालेला अनमोल सत्संग !
१२ अ. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणणे, एकनाथी भागवतातील श्लोक अर्थासहित म्हणून दाखवणे आणि ते ऐकून भावजागृती होणे : ‘ठुसेकाकांच्या समवेत पहाटे फिरायला जातांना मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही नेहमीप्रमाणे एकटे फिरत आहात’, असे समजून तुमचा नित्यक्रम केला, तर मला शिकता येईल.’’ तेव्हा आरंभी त्यांनी प.पू. बाबांची ‘श्रीधरा माधवा हरि..’ आणि ‘दीनानाथ माझा नाथ…’ ही भजने भावपूर्ण अन् मोठ्याने म्हटली. एके ठिकाणी थांबून त्यांनी १० मिनिटे हाता-पायांचे व्यायामप्रकार केले. त्यानंतर त्यांनी श्री एकनाथी भागवतातील ११ व्या स्कंधातील ३१ व्या अध्यायातील भगवंताचे ‘स्वधामगमन’ याविषयीचे श्लोक अर्थासहित म्हटले आणि त्याची फलनिष्पत्ती सांगितली. ते आर्ततेने आणि तन्मयतेने श्लोक म्हणत असतांना माझी सतत भावजागृती होत होती. त्यानंतर त्यांनी भागवतातील ८ व्या स्कंधातील ‘गजेंद्रमोक्षा’ची कथा श्लोकासहित सांगितली. यावरून ‘गजेंद्रासारखी भगवंताला आर्ततेने प्रार्थना कशी करायची ?’, हे मला शिकता आले.
१२ आ. प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन म्हणत असतांना काकांची भावजागृती होणे : चालतांना आम्हाला गवत आणि झाडी असलेला रस्ता लागला. तेथून उंच टेकडीवर गेल्यावर एक मोठा दगड आहे. तेथे एका बाजूला उंच टेकडी आणि दुसर्या बाजूला दरी आहे. त्या दगडावर बसून त्यांनी ‘सखे गं वेणू कुणी वाजविला..’ हे प.पू. बाबांचे भजन मोठ्याने म्हणण्यास प्रारंभ केला. थोड्या वेळात त्यांची भावजागृती झाल्यामुळे त्यांना भजन पूर्ण करता आले नाही. ते श्रीकृष्णभेटीसाठी व्याकुळ होऊन भावावस्थेत गेले होते.
१२ इ. ‘स्वतःचे साधनेचे प्रयत्न न्यून पडत आहेत’, याविषयीची खंत काकांच्या बोलण्यातून व्यक्त होणे : त्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘देवासाठी रडता आले पाहिजे; मात्र माझे तसे सारखे होत नाही.’’ एवढी भावावस्था असतांनाही ते म्हणाले, ‘‘मी न्यून पडतो. माझे अंतर्मन शुद्ध नाही. मी साधनेचे प्रयत्न वरवरचे करतो. मला आणखी पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत.’’ यावरून ‘त्यांची स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू होती. प.पू. बाबा आणि प.पू. काणे महाराज यांच्या कृपेने त्यांनी अध्यात्मातील चांगला टप्पा गाठला होता’, असे मला वाटते.
१३. सनातन संस्था आणि साधक यांच्याविषयीची आपुलकी !
१३ अ. साधकांशी प्रेमाने वागणे अन् त्यांना साधनेत साहाय्य करणे : तसे पहिले, तर परात्पर गुरु डॉ. आठवले हे काकांचे गुरुबंधू होते. काकांना त्यांच्याप्रती आणि सनातनच्या कार्याप्रती पुष्कळ आदर होता. काका सनातनच्या साधकांशी नेहमी आपुलकीने आणि प्रेमाने वागायचे. ते त्यांच्याकडे आलेल्या साधकांची विचारपूस करून त्यांना चहा-पाणी द्यायचे. साधकांची साधना आणि सेवा यांत साहाय्य होण्यासाठी ते साधकांना स्वतःच्या अनुभूती भावपूर्णरित्या सांगायचे.
१३ आ. भंडार्याच्या वेळी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला साहाय्य करणे : काकांच्या मळ्यामध्ये भंडार्याच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनासाठी काकांनी सर्वतोपरी साहाय्य केले.
१३ इ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संग्रहालयासाठी प.पू. काणे महाराजांनी वापरलेल्या सात्त्विक वस्तूंचा अनमोल ठेवा देणे : मी नारायणगाव येथे भंडार्याला गेल्यावर मला गुरुकृपेने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयासाठी संतांनी वापरलेल्या सात्त्विक वस्तू आणण्याची सेवा मिळाली. तेथे गेल्यावर कळले, ‘महाराजांनी त्यांच्या वस्तू कुठे आणि कोणत्या भक्ताकडे ठेवायच्या ?’, हे त्यांच्या भक्तांना आधीच सांगितले होते आणि त्यानुसार नियोजन झाले होते, तरीही काकांनी अपेक्षित असे साहित्य देण्यासाठी साहाय्य केले. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय हे प.पू. बाबांच्या आशीर्वादाने चालू असून सनातन संस्थेचे कार्य हे आपलेच आहे’, असा भाव ठेवून काकांनी तळमळीने सर्व साहित्य दिले. त्यांनी वेळ काढून संतांचा अनमोल ठेवा दिला. यावरून त्यांची व्यापकता आणि गुरुकार्याची तळमळ दिसून येते.
१४. काकांनी अध्यात्म आणि साधना यांविषयी सांगितलेले दृष्टीकोन !
१४ अ. ‘श्रीखंड्या’ होता येण्यासाठी अभिमान जाऊन त्यागी वृत्ती आली पाहिजे, त्यागातच आनंद आणि शांती आहे ! : काकांनी मला सांगितले, ‘‘एकनाथी भागवतातील अकराव्या स्कंधातील ३५ व्या अध्यायातील १४ श्लोकांचे महत्त्व फार आहे. जो कुणी प्रातःकाळी त्यांचे पठण करील, त्याला श्रीकृष्णाची प्राप्ती होते. श्रीखंड्याने १२ वर्षे संत एकनाथ महाराज यांच्या घरी चाकरी केली. प्रत्यक्ष भगवंताने श्रीखंड्याच्या रूपात त्यांची सेवा केली. जो श्रीखंड्या होऊ शकतो, तो श्रीकृष्ण होऊ शकतो. एकवेळ श्रीकृष्ण होणे सोपे आहे; पण श्रीखंड्या होणे अवघड आहे. यासाठी अभिमान जाऊन त्यागी वृत्ती अंगी आली पाहिजे. त्यागातच आनंद आणि शांती आहे.
१४ आ. महाभारतातील चिमणीसारखी देवाला आर्ततेने प्रार्थना करावी ! : आपली प्रार्थना आर्ततेने झाली पाहिजे. कौरव आणि पांडव यांच्या युद्धाच्या वेळी चिमणीने श्रीकृष्णाला तिच्या घरट्यातील अंडी वाचवण्यासाठी आर्ततेने प्रार्थना केली. एका हत्तीच्या गळ्यातील घंटा तुटली आणि झाडावरून खाली पडलेल्या घरट्यावर पडली. त्यामुळे घरट्यातील अंडी आणि त्यातून बाहेर आलेली पिल्ले युद्धाच्या रणधुमाळीतही सुरक्षित राहिली होती. चिमणीसारखी आर्तता माझ्यात येत नाही. आता आर्तता येण्यासाठीच प्रयत्न करायचे आहेत. आर्तता येत नाही; कारण माझ्यात तळमळ नाही. लोक म्हणतात, ‘काका किती मोठे आहेत !’; पण ‘खरंच मी किती नालायक आहे !’, हे आपले आपल्यालाच ठाऊक असते.’’
१४ इ. कुणी काहीही म्हटले, तरी आपण सद्गुरूंना जसे अपेक्षित आहे, तसेच वागायला हवे ! : प.पू. भक्तराज महाराज आणि त्यानंतर प.पू. काणे महाराज यांची सेवा करतांना काकांना अनेकांचा पुष्कळ विरोध झाला होता. त्या संदर्भात काका मला म्हणाले, ‘‘कुणी काहीही म्हटले, तरी सद्गुरूंना जसे अपेक्षित आहे, तसेच आपण वागायला हवे. कुणी आपल्याला ‘बावळट’ म्हटले, तर म्हणू द्या. त्याने काही बिघडत नाही.’’
१४ ई. आपली आर्तता भगवंतापर्यंत पोचली की, भगवंत मथुरेहून धावत येतो ! : मी काकांना विचारले, ‘‘माझ्या मनात मायेचे पुष्कळ विचार का येतात ?’’ त्यावर काका म्हणाले, ‘‘जोपर्यंत भगवंताच्या भेटीची आर्तता निर्माण होत नाही, तोपर्यंत तसे विचार येणार. ती आर्तता आपल्यात आली, तर सर्वकाही होऊ शकते. मी तुम्हाला शिकवण्यासारखे माझ्यात काही नाही. माझ्यातच काही नाही, तर मी दुसर्याला काय देणार ? आपणच मायेत अडकलेलो असतो आणि मायेतून सुटणेही आपल्याच हातात आहे. आपली तळमळ आणि इच्छा, यांवर सर्व अवलंबून आहे. प.पू. काणे महाराज यांचे वाक्य आहे, ‘भगवान की प्राप्ति इच्छा से होती है । भोगों की प्राप्ति कर्माें से होती है । हे आपल्याला समजले पाहिजे. ही इच्छा प्रतिदिन आणि प्रत्येक क्षणाला झाली पाहिजे. आपली आर्तता त्या भगवंतापर्यंत पोचली पाहिजे. मग तो मथुरेहून धावत येतो.’’
१४ उ. भगवंतासाठी कळवळून प्रार्थना झाली पाहिजे आणि त्याच्या भेटीसाठी डोळ्यांत अश्रू आले पाहिजेत ! : मी काकांना विचारले, ‘‘मला प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग बर्याच कालावधीसाठी लाभलेला आहे, तरी माझी अपेक्षित प्रगती होत नाही.’’ तेव्हा काका म्हणाले, ‘‘आता आपल्याला ‘काय व्हायचे आहे ? काय करायचे आहे ?’, हे कळलेले आहे. गुरूंनी आपल्याला ते सांगितलेले आहे. ‘त्या दृष्टीने पावले कशी टाकायची ?’, हे आपण ठरवायचे. कुणाकडून कसलीही अपेक्षा करायला नको. अपेक्षा आली की, काळजी, निराशा इत्यादी येते. त्याऐवजी केवळ भगवत्चिंतन करावे. ‘घरच्यांचे आणि समाजाचे जसे होईल, तसे होईल. आपण भगवत्चिंतन करावे’, असे माझे मत आहे. भगवंताला कळवळून प्रार्थना झाली पाहिजे आणि भगवंताच्या भेटीसाठी डोळ्यांत अश्रू आले पाहिजेत. आमच्याकडे देण्यासारखे काहीच नाही. गुरूंनी दिलेले नाम आहे. बस ! बाकी काही नाही.’’
१५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी आदर आणि आत्मीयता असणे : ठुसेकाका प.पू. बाबांचे जुने भक्त आणि शिष्य होते, तसेच ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरुबंधू अन् समवयस्क होते. काकांना परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अत्यंत आदर आणि आत्मीयता होती. ते नेहमी भ्रमणभाष करून एकमेकांची विचारपूस करून साधना आणि अध्यात्म यांविषयी बोलत असत.
१६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना निर्वाणीचा निरोप देणारे काकांचे बोल आणि त्यांच्या पत्रातील लिखाण !
२३.११.२०२३ या दिवशी काकांनी परात्पर गुरु डॉक्टरांना भ्रमणभाष केला होता. त्या वेळी काका म्हणाले, ‘‘आता मला कुठेही जावेसे वाटत नाही. मला कशाचेच काही वाटत नाही. मला स्थिर आणि शांत वाटत आहे.’’
२४.११.२०२३ या दिवशी काकांनी परात्पर गुरु डॉक्टरांना पत्र लिहिले. त्यात काकांनी प.पू. काणे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने झालेल्या भंडार्याविषयीची अनुभूती लिहिली आणि शेवटी लिहिले,
‘या अज्ञान्याने वाल्मीकि रामायण वाचले होते. त्यातील एक चौपाई सारखी आठवते,
नित्य करितां भगवद्भजन । संकल्प विकल्प गेले विरोन ।
त्यासींच भेटे रघुनंदन । अनन्यभजन या नांव ।। – भावार्थरामायण, युद्धकांड, अध्याय २४, ओवी ३५
अर्थ : नित्य भगवंताचे स्मरण केल्यावर मनाची ‘संकल्प-विकल्प’ स्थिती नाहीशी होते आणि त्याच वेळी भगवंताची प्राप्ती होते. यालाच ‘अनन्यभजन’ म्हणतात.
आश्रमातील सर्व संतांना / भक्तांना गुरुस्मरण, भगवत्स्मरण !’
– आपला एक अज्ञानी गुरुबंधू
यावरून ‘काका ईश्वराशी विलीन होत असल्याने ते परात्पर गुरु डॉक्टरांचा निर्वाणीचा (शेवटचा) निरोप घेत होते’, असे मला वाटले.
१७. विरक्त, त्यागी आणि भक्तीमय जीवन जगलेले ठुसेकाका !
प.पू. बाबा आणि प.पू. काणे महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर काकांनी तळमळीने साधना अन् सेवा चालू ठेवली. ते गुरूंच्या स्थूलदेहात न अडकता गुरूंनी सांगितलेली साधना करत राहिले. यावरून ‘त्यांच्या गुरूंनी त्यांच्या मनाची सिद्धता करून घेऊन त्यांना चांगल्या आध्यात्मिक टप्प्यावर नेऊन ठेवले होते’, असे मला वाटते. काकांनी त्यांच्या वहीत (डायरीत) ५.६.१९८४ या दिवशी लिहून ठेवले होते,
राम राम म्हणता जावा माझा प्राण ।
येवढें कृपादान तुमचें मज ।।
नको विद्या-वय आयुष्य फारसे ।
नाही मज पिसे मुक्तिचेंही ।।
नको धनमान न वाढो संतान ।
मुखी नारायण प्राण जावो ।।
तुका म्हणे दीन काकुलती येतो ।
तुज आठवितो पांडुरंगा ।।
संत तुकाराम महाराज यांच्या वरील अभंगानुसार ठुसेकाका पूर्वीपासूनच विरक्त, त्यागी आणि भक्तीमय जीवन जगले अन् नामजप करता करता २९.११.२०२३ या दिवशी ईश्वरचरणी विलीन झाले.
मागील काही वर्षांपासून काकांना भेटल्यावर आणि त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना मला काकांमध्ये अधिक चैतन्य जाणवून आनंद मिळत असे. ‘त्यांची यापुढेही आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
१८. काकांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता !
गुरुकृपेने मला ठुसेकाकांकडून नामस्मरण, शरणागतभाव, गुर्वाज्ञापालन, स्वीकारण्याची वृत्ती, प्रेमभाव, व्यापकता, सेवाभाव इत्यादी शिकता आले. ‘मला जे आवश्यक होते, ते परात्पर गुरु डॉक्टरांनी मला काकांच्या माध्यमातून शिकवले’, त्याबद्दल मी प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉ. आठवले, प.पू. काणे महाराज आणि कै. शशिकांत ठुसे यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.१२.२०२३)
(समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |