आज (कै.) शशिकांत मनोहर ठुसे यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे, त्या निमित्ताने…
‘प.पू. काणे महाराज श्री. शशिकांत ठुसे यांच्या नारायणगाव येथील घरी वर्ष १९९२ ते २०१७ अशी २५ वर्षे राहिले. ठुसेकाका त्यांना म्हणायचे, ‘आम्ही तुमच्या घरी रहातो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.१२.२०२३) |
‘काही वर्षांपूर्वी शशिकांत ठुसेकाका यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती; परंतु प्रसिद्धीपराङ्मुख असल्याने त्यांनी ‘स्वतःबद्दल काहीही प्रसिद्ध करू नये’, असे कळवले होते. त्यामुळे त्यांची पातळी आणि त्यांच्याविषयीचा हा लेख प्रसिद्ध केला नव्हता. आता त्यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के झाली आहे. ‘त्यांच्यातील गुणांविषयी सर्वांना कळावे आणि सर्वांना त्यांतून शिकता यावे’, यासाठी हा लेख प्रसिद्ध करत आहोत.’ – संकलक (५.१२.२०२३) |
त्याग आणि समर्पणभाव यांचे मूर्तीमंत उदाहरण असलेले शशिकांत ठुसेकाका !‘आपल्या गुरूंचा शिष्य होण्यासाठी त्याच्यात ‘आज्ञाधारकपणा’, हा प्रमुख गुण असावा लागतो. शशिकांत ठुसेकाकांमध्ये शिष्याचा हा गुण होता. त्यांनी प.पू. भक्तराज महाराज यांचे आज्ञापालन म्हणून अत्यंत कठीण असलेली प.पू. काणे महाराजांची सेवा समर्पणभावाने केली. त्यांनी शेवटपर्यंत प.पू. काणे महाराजांचेही तंतोतंत आज्ञापालन केले. या लेखाचा अभ्यास केल्यास साधकांना ‘गुरुसेवा आणि गुर्वाज्ञापालन कसे करावे ?’, याचा आदर्श वस्तूपाठ शिकायला मिळेल !’ |
प.पू. भक्तराज महाराज यांचे निस्सीम भक्त आणि प.पू. काणे महाराज यांची २५ वर्षे अविरत सेवा करणारे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील शशिकांत मनोहर ठुसे (वय ८१ वर्षे) यांचे २९.११.२०२३ या दिवशी निधन झाले. ८.१२.२०२३ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) यांना त्यांच्याविषयी जाणवलेली अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने वर्ष १९९२ पासून मला नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील प.पू. काणे महाराज यांचा सत्संग मिळाला. प.पू. काणे महाराज हे नारायणगाव येथील शशिकांत ठुसेकाका यांच्या घरी रहात असत. मी प.पू. काणे महाराज यांचा सत्संग आणि सेवा यांसाठी नारायणगाव येथे ठुसेकाकांच्या घरी जाऊन रहात असे. माझा काकांशी अधूनमधून भ्रमणभाषवरही संपर्क होत असे. ठुसेकाकांविषयी मला जाणवलेली अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. साधक, संत किंवा पाहुणे यांचे ‘अतिथी देवो भव ।’, हा भाव ठेवून आदरातिथ्य करणे
वर्ष २०००-२००१ मध्ये मी प.पू. काणे महाराज यांचा सत्संग मिळावा; म्हणून प्रत्येक आठवड्याला शनिवार-रविवारी नारायणगावला जाऊन ठुसेकाकांच्या घरी रहात असे. प.पू. काणे महाराज यांच्या देहत्यागानंतर मला ४.११.२०१७ या दिवशी नारायणगाव येथे झालेल्या भंडारा सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी वर्ष २०१८ आणि वर्ष २०१९ मध्ये नारायणगाव येथे झालेल्या प.पू. काणे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याला गेलो होतो. ठुसेकाका त्यांच्याकडे आलेले साधक, संत किंवा पाहुणे यांचा ‘अतिथी देवो भव ।’, या भावाने आदरातिथ्य करत असत. काकांनी मला प्रेम आणि आधार दिला. प.पू. काणे महाराज आणि ठुसेकाका यांच्या सत्संगामुळे मला अध्यात्म शिकण्यातील अन् साधनेतील आनंद मिळाला.
२. उतारवयातही उत्साही आणि शांत असणे
वर्ष २०१७ मध्ये भंडार्यानिमित्त नारायणगावला गेल्यावर मला ठुसेकाकांचा ३ दिवस सत्संग मिळाला. त्या वेळी त्यांच्याकडून मला पूर्वीपेक्षा अधिक चैतन्यशक्ती मिळून आनंद मिळाला. तेव्हा त्यांचे वय ७५ वर्षे होते, तरीही ‘त्यांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्षमता पूर्वीसारखीच होती’, असे मला वाटले. ते कधीही निराश झालेले, थकलेले किंवा कंटाळलेले जाणवले नाहीत. ते नेहमी शांत आणि उत्साही असत.
३. राष्ट्राभिमानी आणि धर्माभिमानी
ते पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचे. त्यामुळे शिस्त आणि हिंदुत्व त्यांच्या अंगी मुरले होते. ते ज्वलंत राष्ट्राभिमानी आणि धर्माभिमानी होते.
४. गुरुप्राप्तीपूर्वी केलेली साधना आणि गुरुप्राप्ती
४ अ. वारकरी संप्रदायानुसार साधना करणे आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र वाचल्यावर गुरूंची ओढ लागणे : ठुसेकाका वारकरी संप्रदायानुसार साधना करत होते. ते ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा जप करत असत. आरंभी काका ‘वायरमन’ म्हणून व्यवसाय करत होते. सर्व जण त्यांना ‘इलेक्ट्रिक फिटर’ म्हणायचे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र वाचल्यावर त्यांना गुरूंची पुष्कळ ओढ लागली. गुरु मिळवण्यासाठी ते कीर्तन आणि प्रवचन यांना जाऊ लागले. ते गोंदवल्याला जाऊन प्रार्थना करू लागले. तेव्हा अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती त्यांना म्हणायच्या, ‘‘तुमचा जप आणि साधना जशी चालली आहे, तशीच चालू राहू द्या. एके दिवशी गुरु तुमच्या घरी येतील.’’
४ आ. प.पू. भक्तराज महाराज भजनाच्या निमित्ताने ठुसेकाकांच्या घरी येणे आणि त्यांनी काकांना गुरुमंत्र देणे : काकांनी १४ वर्षे तळमळीने साधना केली. त्यानंतर नारायणगावापासून ११ कि.मी. अंतरावर असलेल्या कांदळी येथील प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) भजनाच्या निमित्ताने काकांच्या घरी आले. तेव्हा प.पू. बाबांनी त्यांना गुरुमंत्र देऊन शिष्य म्हणून त्यांचा स्वीकार केला. त्यानंतर १० वर्षे काकांनी तन-मन-धनाने गुरुसेवा केली. प.पू. बाबा म्हणतील, तसेच काकांनी केले आणि त्यांना अनेक अनुभूती आल्या.
५. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. काणे महाराज यांची केलेली सेवा !
५ अ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे २५ वर्षे प.पू. काणे महाराजांची अविरत, परिपूर्ण आणि समर्पणभावाने सेवा करणे : त्यानंतर प.पू. बाबांनी त्यांना प.पू. काणे महाराज यांची सेवा आणि सांभाळ करण्याची आज्ञा केली. प.पू. काणे महाराज पुष्कळ शिस्तप्रिय आणि प्रत्येक गोष्ट धर्मानुसार करणारे होते. साधकांना त्यांच्या समवेत रहाणे किंवा त्यांची सेवा करणे पुष्कळ कठीण जायचे. साधकाची एखादी चूक झाली, तरी प.पू. महाराज साधकांना म्हणायचे, ‘‘यापुढे तू माझी काहीही सेवा करू नकोस, एवढीच माझी सेवा कर !’’ त्यामुळे साधक थोडे दिवसही त्यांच्या सेवेत टिकत नसत. असे असतांना केवळ प.पू. बाबांचे आज्ञापालन म्हणून ठुसेकाकांनी प.पू. काणे महाराजांची २५ वर्षे अविरत, परिपूर्ण आणि समर्पणभावाने सेवा केली.
‘स्वतःचे घर म्हणजे प.पू. काणे महाराजांचे घर आहे’, असा भाव ठेवून ठुसेकाका आणि त्यांचे कुटुंबीय घरात लहान मुलांप्रमाणे अन् आदर्श शिष्याप्रमाणे राहिले.
५ आ. पत्नीच्या प्रेमळ स्वभावामुळे काकांना प.पू. बाबा आणि प.पू. काणे महाराज यांची ३५ वर्षे सेवा करता येणे : काकांच्या पत्नीही ((कै.) विजया याही) प.पू. बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) शिष्या होत्या. त्यांनी काकांना प्रारंभापासून गुरुसेवेत साहाय्य केले. काकींच्या प्रेमळ स्वभावामुळे काकांना प.पू. बाबा आणि प.पू. काणे महाराज यांची ३५ वर्षे सेवा करता आली. सर्व भक्त आणि साधक यांचे जेवण-खाण अन् रहाण्याची व्यवस्था त्या आनंदाने आणि प्रेमाने करायच्या. त्यांना प.पू. बाबांची भजने आवडायची आणि त्यांचे नामस्मरणही सतत चालू असायचे. त्या घरातील सर्वांना एकत्र घेऊन भजने आणि स्तोत्रे म्हणायच्या अन् नित्योपासना करायच्या. पत्नीच्या निधनानंतरही (२८.९.२०२१ नंतरही) काकांनी स्थिर राहून साधना आणि सेवा शेवटपर्यंत चालू ठेवली.
५ इ. त्यागी वृत्ती आणि समर्पणभाव : काकांनी वारकरी संप्रदायानुसार चालू असलेली साधना आणि त्यांचा फॅब्रिकेशनचा अन् शेतीचा व्यवसाय बंद करून १० वर्षे प.पू. बाबांची सेवा केली. त्यांनी प.पू. बाबांचा कांदळी (जिल्हा पुणे) येथील आश्रम आणि शेती यांचे व्यवस्थापन पाहिले. त्यानंतर प.पू. बाबांच्या आज्ञेनुसार त्यांनी सतत २५ वर्षे प.पू. काणे महाराज यांची सेवा केली. प.पू. काणे महाराज शेवटपर्यंत काकांच्या घरीच राहिले. माझ्यासारखे महाराजांकडे येणारे साधक त्यांच्याकडेच रहायचे. काका ही नारायणगाव येथील प्रतिष्ठित, सधन आणि आदरणीय व्यक्ती होती. गुरुप्राप्तीनंतर त्यांनी मायेतील गोष्टींचा त्याग केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत समर्पणभावाने गुरुसेवा केली.
६. प.पू. काणे महाराज यांचे आज्ञापालन करणे
अ. नारायणगावपासून ३ कि.मी. अंतरावर काकांनी ३ एकर भूमीवर केवळ फळबाग, प.पू. काणे महाराज यांच्यासाठी आणि स्वतःसाठी लहान घर अन् ध्यानमंदिरासारखी झोपडी (कुटी) बांधली. त्यांनी प.पू. काणे महाराजांच्या आज्ञेनुसार गीता प्रेसच्या सहस्रो ग्रंथांचे वाटप केले. महाराज प्रतिदिन लहान मुलांना गोळ्या वाटत आणि कुत्र्यांना शिरा अन् मांजरांना पेढे देत. हे सर्व काकांनी स्वतःच्या त्यागातून केले.
आ. काका उत्तररात्री ३.३० वाजता उठून नामस्मरण करायचे. त्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करून पहाटे ५.४५ ते सकाळी ७ या कालावधीत ते टेकडीवर फिरायला जायचे. थोडा वेळ मळ्यामध्ये देखरेखीची कामे करून एका झोपडीत राहून पूर्णवेळ नामजप आणि साधना करायचे. त्या झोपडीतही पुष्कळ चैतन्य निर्माण झाले आहे. काका वारकरी संप्रदायात असतांना वर्ष १९८० पूर्वी त्यांनी १३ कोटी सामूहिक नामजप केला होता. महाराजांच्या सेवेला आरंभ केल्यावर १३ कोटी जप करण्याचा संकल्प करून तो त्यांनी ९ वर्षांत (वर्ष २००५ ते २०१४ या कालावधीत) पूर्ण केला. महाराज नेहमी नामस्मरणाविषयी सांगायचे. त्यानुसार ‘काकांचा सतत नामजप होत असे’, असे मला वाटते. काकांच्या समवेत असलेल्यांनाही ते ‘नामजप होतो का ?’, असे विचारायचे. उगीचच चौकशी आणि बुद्धीच्या स्तरावर चर्चा करण्याऐवजी नामस्मरण करा, असे ते लोकांना सांगायचे.
इ. प.पू. काणे महाराज जिवंत असतांना आणि त्यांच्या देहत्यागानंतरही काका त्यांचे आज्ञापालन करत राहिले, उदा. महाराजांचे अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी समाधी न बांधता केवळ पिंपळाचे एक झाड लावणे आणि बहिर्मुख न होणे. ते मानसिक स्तरावर न रहाता आध्यात्मिक स्तरावर रहायचे. त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी त्यांना लग्नाचे निमंत्रण देऊन येण्याचा आग्रह केल्यावर ते त्यांना ‘शक्य होणार नाही’, असे अत्यंत नम्रपणे आणि शांतपणे सांगायचे.
ई. एकदा काका मला म्हणाले, ‘‘मला महाराजांनी सांगितले होते, ‘तू कुणाच्याही पाया पडायचे नाही.’ ते मी आतापर्यंत पाळतो; मात्र ‘प.पू. काणे महाराजांच्या पाया पडतांना मी प.पू. भक्तराजांच्या, म्हणजे माझ्या गुरूंच्या पाया पडत आहे’, या भावाने पाया पडत होतो. ‘कुणाच्याही पाया पडू नकोस, म्हणजे साधना सोडून कुणाकडेही जाऊ नकोस’, हेच महाराजांना अपेक्षित होते; कारण कुणाकडे गेलो नाही, तर दुसर्यांच्या आणि माझ्या पाया पडण्याचा प्रश्नच येत नाही.’’
उ. ‘ठुसेकाकांचे वय ७५ वर्षे झाल्यावर त्यांचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करावा’, असे त्यांचे चाहते आणि नातेवाईक यांना वाटत होते. याविषयी ते मला म्हणाले, ‘‘महाराजांनी मला ‘बहिर्मुख राहू नकोस’, असे सांगितले आहे. मला त्यांनी सांगितलेली साधना करायची आहे. असे कार्यक्रम आणि उत्सव केल्यास माझा अहं वाढेल. ‘मी काय आहे ?’, हे मला ठाऊक आहे. ‘मी किती नालायक आहे आणि मी आणखी किती साधना करायला पाहिजे ?’, हे केवळ सद्गुरुच सांगू शकतात. बाकीचे सर्व अशा कार्यक्रमांतून आणि इतर वेळी खोटी स्तुती करत असतात.’’ यावरून ‘काका आदर-सत्कारात अडकले नव्हते’, हे लक्षात येते. त्यांची वेशभूषा आणि वागणे अत्यंत साधे होते.
ऊ. वर्ष २०१७ मध्ये मी ठुसेकाकांच्या समवेत काही दिवस राहिल्यावर ‘त्यांची आध्यात्मिक प्रगती चांगली होत आहे’, असे मला जाणवले होते. मी त्यांची गुणवैशिष्ट्ये लिहून दिली होती. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक झालेली असून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत’, असे कळवले होते; परंतु त्यांना ‘आदर-सत्कारात अडकायचे नाही’, अशी प.पू. काणे महाराजांची आज्ञा असल्याने त्यांची गुणवैशिष्ट्ये प्रकाशित करता आली नाहीत. ‘काका जीवनभर निरपेक्ष आणि विरक्त जीवन जगले’, असे मला वाटते.
७. प्रेमभाव
७ अ. सर्व प्राणीमात्रांवर निरपेक्ष प्रेम करणे : काही वर्षे नारायणगाव येथील श्री. शामकांत कोल्हे प.पू. काणे महाराजांची सेवा करत होते. ठुसेकाकांनी त्यांनाही आत्मीयतेने जवळ केले. ते कुणाविषयी आकस ठेवत नसत किंवा स्पर्धा करत नसत. त्याऐवजी स्वतःकडे न्यूनता घेऊन ते प्रत्येकाशी जुळवून घेत असत. ते सर्वांवर निरपेक्ष प्रेम करायचे. ते पशू-पक्षी, प्राणी आणि झाडे यांवरही फार प्रेम करायचे. त्यांनी गोशाळा चालू केली, तसेच त्यांच्याकडे अनेक प्रकारचे कुत्रे आणि मांजरे होती.
७ आ. काकांचे समष्टीवरील प्रेम, नियोजनक्षमता आणि व्यापकता ! : पूर्वी ठुसेकाका ‘प.पू. बाबांच्या भंडार्यात महाप्रसाद बनवणे आणि भक्तांना वाढणे’, अशा सेवा करत असत. प.पू. काणे महाराजांच्या देहत्यागानंतरच्या १४ व्या दिवशी उदकशांत, भजन आणि भंडारा (महाप्रसाद) असा कार्यक्रम ठेवला होता. ‘भंडार्याला अधिकाधिक भक्तांनी यावे आणि त्यांना महाराजांच्या चैतन्याचा लाभ व्हावा’, अशी काकांची इच्छा होती. महाराजांचा अधिक लोकांशी संपर्क नव्हता; मात्र काकांचा प्रेमभाव आणि लोकसंग्रह यांमुळे नारायणगावापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या मळ्यात ठेवलेल्या कार्यक्रमाला ८०० भक्त आले होते. काका सकाळी १० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सर्व अतिथी आणि भक्त यांचे स्वागत अन् आदरातिथ्य करत होते.
८. अनेक ग्रंथांचा अभ्यास असूनही इतरांकडून शिकण्याचा प्रयत्न करणे
प.पू. काणे महाराज ज्ञानयोगी होते. महाराजांनी सांगितल्यानुसार काकांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. त्यांनी काही ग्रंथांचे १०८ वेळा पारायण केल्यासारखे वाचन केले आणि त्यांतील महत्त्वाचा भाग लिहून काढला. असे असतांनाही एखादी व्यक्ती अध्यात्माविषयी सांगत असेल आणि तिला त्याविषयी माहिती असेल, तर ते सर्व मन लावून ऐकत असत, तसेच गोशाळा, शेती, बागकाम, आयुर्वेद आणि साधना यांविषयी ते संबंधितांना विचारून शिकण्याचा प्रयत्न करत असत.
९. आई-वडील आणि गुरु यांच्या ऋणांतून मुक्त होण्यासाठी केलेले प्रयत्न !
९ अ. आई-वडिलांच्या ऋणामधून मुक्त होण्यासाठी त्यांच्या ओसाड भूमीत फळबाग लावणे : काका मला म्हणाले, ‘‘मी ही शेती इत्यादी कशासाठी केले ? मी यात असून नसल्यासारखा आहे. आमच्या आई-वडिलांची भूमी ओसाड पडली होती. येथे फळबाग केल्याने मला आई-वडिलांच्या ऋणातून थोडेसे मुक्त होता आले. लोक येथे आले की, त्यांना आनंद मिळतो. ते अर्धा-एक घंटा येथे रमून जातात. त्यामुळे आई-वडिलांच्या ऋणामधून अंशतः मुक्त होण्याचा प्रयत्न गुरूंनी माझ्याकडून करून घेतला.’’
९ आ. गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सतत नामजप करणे : काका पुढे म्हणाले, ‘‘गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सतत नामात रहाण्यासाठी तेच माझ्याकडून प्रयत्न करून घेतात. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रतिदिन एक पाऊल पुढे पडलेच पाहिजे. ‘ते कसे पुढे पाडायचे ?’, हे आपल्यावर अवलंबून आहे. तुमच्याएवढे माझ्याकडे काहीच ज्ञान नाही. मला सूक्ष्मातीलही काहीच कळत नाही.’’
१०. बाह्यांगाने अनेक गोष्टी करत असूनही अंतर्मनातून साधनारत असणे
काकांनी मळ्यामध्ये गोशाळा आणि सेंद्रिय शेती चालू केली. काका हे सर्व बाह्यांगाने करत असले, तरी त्यांचे मन नामस्मरण आणि साधना यांतच गुंतलेले असायचे.
११. फळबागेत ध्वनीक्षेपकावर नामजप आणि प.पू. बाबांची भजने लावल्याने ‘झाडांमध्येही चैतन्य आहे’, असे वाटणे
त्यांनी ३ एकर भूमीवर लावलेल्या फळबागेतील प्रत्येक झाडाला ऐकू येईल, अशी ध्वनीक्षेपक यंत्रणा लावली आहे. मागील २६ वर्षे तेथे प्रतिदिन २४ घंटे नामजप आणि प.पू. बाबांची भजने लावलेली असतात. त्यामुळे ‘झाडांमध्येही पुष्कळ चैतन्य आहे’, असे मला वाटते.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.१२.२०२३)
(क्रमशः)