‘इंटरनेट’च्या (माहितीजालाच्या) माहितीनुसार नव्हे, तर स्वतःच्या रोगाचे निदान वैद्यांच्या सल्ल्याने करा !

एखादी माहिती हवी असेल, तर आपल्याला एका क्षणात ‘इंटरनेट’चा वापर करून ती लगेच मिळवता येते. असे कोणतेच क्षेत्र नाही की, ज्याविषयीची माहिती ‘इंटरनेट’वर मिळत नाही. याचा लाभ सर्वांना होतोच. विकसित तंत्रज्ञानाचा आपण आपल्या जीवनात नक्की उपयोग करायला हवा; पण सध्या असे आढळून येते की, आपल्याला काही आरोग्याच्या तक्रारी दिसायला लागल्या की, रुग्ण पुढीलप्रमाणे चुका करतो.

१. रुग्णांकडून होणार्‍या सर्वसामान्य चुका

अ. सर्वप्रथम आरोग्याच्या काही तक्रारी जाणवल्या, तर त्या अगदी दुर्लक्षितच केल्या जातात. ‘आपोआपच दुखणे न्यून होईल’, असा विचार केला जातो.

आ. दुसरी चूक, म्हणजे आरोग्याच्या त्या तक्रारी वारंवार जाणवू लागल्या की, त्याविषयी घरात आणि मित्रमंडळी यांच्यासह चर्चा केली जाते आणि ते सर्व जण त्यांना ठाऊक असलेले घरगुती उपाय सांगतात.

वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर

इ. चुकीची माहिती वाचल्यामुळे रुग्णावर होणारा परिणाम : या सल्ल्यांचा उपयोग झाला नाही की, मग त्याविषयी ‘इंटरनेट’वर शोधले जाते. ‘इंटरनेट’वर त्याविषयीची सर्वच्या सर्व माहिती उपलब्ध होते; पण त्या माहितीनुसार ‘आपल्याला नेमके काय झाले आहे ?’ हे मात्र रुग्णाला लक्षात येत नाही. त्यातील लक्षणांची आपल्याला जाणवत असलेली लक्षणे पडताळून अनुमान बांधत जातो. कधी कधी तर ‘इंटरनेट’वर एखाद्या गंभीर आजारांचीही त्यात माहिती दिली जाते, त्यामुळे त्या रुग्णाच्या मनात ‘आपल्याला फार मोठा आजार झाला आहे’, अशी भीती निर्माण होते.

याविषयी उदाहरण द्यायचे झाल्यास एकदा एक रुग्ण माझ्या चिकित्सालयात आला. त्याचा चेहरा अगदी गंभीर आणि काळजीयुक्त होता. ‘काय काय तक्रारी आहेत ?’, हे त्याने मला सांगायला प्रारंभ केला आणि शेवटी एक वाक्य म्हणाला, ‘‘मला असे वाटते की, मला कर्करोग तर नसेल झाला ?’’ रुग्णाला पुष्कळ ढेकर येत होत्या, पोट साफ होत नव्हते आणि पोट फुगलेले जाणवत होते. रुग्णाला ही तक्रार साधारण मासाभरापासून होती. त्यांना मी विचारले, ‘‘तुम्हाला कर्करोग असेल, असे का वाटते ? त्यावर त्या रुग्णाने सांगितले, ‘‘मी वाचले आहे की, पुष्कळ ढेकर आल्या की, पोटाचा कर्करोग असण्याची शक्यता असते.’’ ‘‘कुठे वाचले ?’’, असे विचारल्यावर त्यांनी ‘इंटरनेट’वर वाचले’, असे सांगितले. पुढील अर्धा घंटा त्यांना हे समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला की, ‘त्या ‘इंटरनेट’कडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारचे रुग्ण प्रत्यक्ष तपासलेलेही नाहीत. अशा ‘इंटरनेट’चा सल्ला जरा जपूनच घ्या.’ त्यानंतर रुग्णाच्या चेहर्‍यावर आल्यापासून पहिल्यांदा स्मितहास्य बघितले आणि त्याची काळजी कमी झाली.

हे उदाहरण देण्याचे तात्पर्य एवढेच की, त्या रुग्णाने जी माहिती वाचली, त्यामुळे महिनाभर त्याच्या मनात अनावश्यक काळजी निर्माण झाली. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’, असे म्हटले आहे, ते इथे अगदी योग्य ठरेल. ‘आपल्याला भयंकर काहीतरी आजार झाला आहे’, या विचाराने त्या रुग्णाची मनस्थिती बिघडली. त्याचा परिणाम शरिरावरही आज ना उद्या होणारच. या चुकीतून प्रत्येकाने हेच शिकायला हवे की, ‘इंटरनेट’चा वापर केवळ माहिती करून घेण्यासाठी करायला हवा. आपल्याला काय आजार झाला आहे ? आणि त्यावर काय उपचार करावेत ? हे मात्र वैद्यांकडूनच जाणून घ्यायला हवे.

ई. वरीलप्रमाणे सर्व प्रयत्न झाले आणि कशाचाच लाभ दिसून आला नाही की, मग रुग्ण वैद्यांकडे जाण्याचा निश्चय करतो. तेथे जाऊन त्या रुग्णाला पुष्कळ अपेक्षा असते की, आता लगेच वैद्यांनी आजार बरा केला पाहिजे. रुग्णाने आधी केलेल्या प्रयोगातून एकतर तो आजार कधी कधी अंगावर काढला जातो किंवा तो गंभीर तरी झालेला असतो.

उ. मनाने औषध घेण्यापेक्षा वैद्यांना विचारूनच औषध घ्यावे ! ‘इंटरनेट’वर हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी काय खावे ? कॅल्शियम मिळवण्यासाठी काय खावे ? पाठदुखीसाठी कोणते व्यायाम करावेत ? अशी निरनिराळी माहिती उपलब्ध असते. अशा छोट्या छोट्या सूचनांचा प्रयोग करायला हरकत नसते; परंतु ‘किडनी स्टोन’साठी कोणते औषध घ्यावे ? अमुक एक त्रास होत असल्यास काय करावे ? अशा स्वरूपाची माहिती न घेता वैद्यांकडे जाऊनच उपचार करावेत.

दुसरे एक उदाहरण येथे द्यावेसे वाटते. बर्‍याचदा रुग्ण औषधांच्या दुकानामधून परस्पर औषध घेतात. असाच एक रुग्ण घसा दुखायला लागला; म्हणून औषधांच्या दुकानामधून औषध घेऊन गेला. त्याला औषध घेतल्यापासून सतत उचकी लागली. काही केल्या उचकी थांबेना. एक नातेवाईक घरी आले. ते त्या रुग्णाला म्हटले, ‘‘उचकी सतत लागणे, म्हणजे मूत्रपिंडाचा गंभीर आजार झाला आहे.’’ असे म्हटल्यावर रुग्ण पुष्कळ घाबरला. हा सगळा मानसिक ताण ओढवून घेतल्यानंतर तो वैद्यांकडे गेला आणि निदान झाले की, त्याने घेतलेल्या प्रतिजैविकांचा त्याला त्रास झाला आहे. दुसरे प्रतिजैविक औषध घेतले आणि तो ठणठणीत बरा झाला. या उदाहरणातून लक्षात घेण्यासारखे मुद्दे हे की, मनाने औषध घेणे, औषधांच्या दुकानामध्ये जाऊन औषध घेऊन घेणे, हे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. अशा चुका टाळल्या पाहिजेत. त्या त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींकडूनच आपण योग्य तो सल्ला घ्यायचा असतो.

ऊ. आपल्या मनात येणार्‍या आरोग्याविषयीच्या शंका वैद्यांना विचाराव्यात. कोणत्या तपासण्या करणे आवश्यक आहे ? ते जाणून घेऊन त्या कराव्यात. जेणेकरून आपल्या मनावरील अनावश्यक ताण न्यून होतो.

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (४.१२.२०२३)