America Doctors : अमेरिकेत कामाचे वाढते तास आणि ‘टार्गेट’ यांमुळे डॉक्टर अत्यंत त्रस्त !

कारखाना कर्मचार्‍यासारखी दिली जाते वागणूक !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत क्षमतेच्या बाहेर जाऊन काम करण्यास बाध्य झाल्याने तेथील अनेक डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी हे पुष्कळ तणावात आहेत. अनेक जणांनी रुग्णालयांतील नोकर्‍या सोडल्या असल्याने उर्वरित लोकांवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही आमच्या क्षमतेबाहेर जाऊन काम करत आहोत. अशातच डॉक्टरांना असलेला तणाव, चिंता आणि थकवा यांमुळे रुग्णांसाठी जोखीम वाढत आहे. हे संपूर्ण प्रकरण आरोग्य क्षेत्रातील एकाधिकारशाही आणि अधिक नफा कमावण्यासाठी आस्थापनांद्वारे चालू केलेल्या ‘कॉर्पोरेट कल्चर’शी संबंधित आहे. त्यामुळे डॉक्टरांचे म्हणणे आहे की, या समस्यांवर आता कायद्याचे साहाय्य घ्यावे लागेल.

रुग्णांची वाढती संख्या, कामाचे वाढीव तास आणि वेगवेगळ्या ‘टार्गेट’मुळे डॉक्टर एवढे त्रस्त आहेत की, त्यांनी प्रशासन, आस्थापने अन् महामंडळ यांविरुद्ध बंड चालू केले आहे. प्रथमच युनियन करून विरोध केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेक औषध दुकानदार आणि परिचारिका यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

डॉ. आलिया शरीफ म्हणाल्या की, आम्ही डॉक्टर आहोत. आमचा व्यवसाय प्रतिष्ठित मानला जातो. असे असले, तरी ‘आम्ही कामगार आहोत’, अशी कामाच्या वेळी आम्हाला जाणीव करून दिली जाते. रुग्णालयात आम्हाला कारखाना कर्मचार्‍यासारखी वागणूक दिली जाते.

संपादकीय भूमिका

  • रुग्णालयांकडून ‘कॉर्पोरेट कल्चर’च्या नावाखाली अधिकाधिक नफा लाटण्यासाठी रुग्णांना लुटण्यासह डॉक्टरांचेही हाल केले जात आहेत. अमेरिकेतील हे वृत्त त्याचाच परिणाम होय, हे लक्षात घ्या !
  • भारतातही वैद्यकीय क्षेत्रात अल्पअधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. यावर उपाय काढण्यासाठी सरकारी स्तरावरच प्रयत्न होणे आवश्यक !