मराठा समाजाला सरसकट आरक्षण कुठल्या कायद्याखाली देणार ? – गिरीश महाजन, भाजप

गिरीश महाजन, भाजप

मुंबई – सरसकट मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. मी जरांगे पाटील यांची ४ वेळा भेट घेतली, तेव्हा सांगितले की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे शक्य नाही. कुणबी दाखले सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत; पण मराठा समाजाला सरसकट आरक्षण कुठल्या कायद्याखाली देणार ? हा प्रश्न आहे. न्यायमूर्ती शिंदे आणि न्यायमूर्ती गायकवाड यांनीही मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका मांडली आहे, असे गिरीश महाजनांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केले. सरकारने दिलेल्या आश्वासानंतर जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. या पार्श्वभूमीवर वरील वक्तव्य महत्त्वाचे आहे.

मराठा आरक्षणाचा कायदा तयार करण्यासाठी ४ दिवसांचा काळ पुरेसा नसून १ मासाची मुदत द्या, नोदींचा अहवाल करून कायदा तयार करतो, असे महाजन यांनी सांगितले होते. आता त्यांनी वेगळी विधाने करून मराठा समाजाला नडण्याचे काम करू नये. महाजनांनी फडणवीसांचे नाव खराब करू नये, असे जरांगे पाटील यांनी विधानावर उत्तर दिले आहे. ‘गिरीश महाजनांच्या सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. माध्यमांचे व्हिडिओही आहेत. पूर्ण राज्यात ते व्हायरल करू’, अशी धमकीही त्यांनी पुढे दिली.