युद्धविरामानंतर इस्रायल-हमास यांच्यात पुन्हा युद्ध चालू !

तेल अविव – इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेला युद्धविराम १ डिसेंबर या दिवशी संपला. त्यानंतर या दोघांत पुन्हा युद्ध चालू झाले आहे. इस्रायलने दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात, तर हमासने इस्रायलमधील काही भागात क्षेपणास्त्र डागली. इस्रायली सैन्याने सांगितले की, १ डिसेंबरला सकाळी ७  वाजता युद्धविराम संपला आणि अर्ध्या घंट्यानंतर हमासकडून आक्रमण झाले. इस्रायलनेच प्रथम आक्रमण केल्याचा दावा हमासने केला आहे.

सौजन्य 9 न्यूज ऑस्ट्रेलिया 

२४ नोव्हेंबर या दिवशी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम झाला होता. या काळात हमासने १०० इस्रायली ओलिसांची सुटका केली, तर इस्रायलने २४० पॅलेस्टिनींची सुटका केली. दोन्ही बाजूंच्या सुटका झालेल्या नागरिकांमध्ये महिला आणि लहान मुले यांचा समावेश आहे. हमासच्या कह्यात अजूनही १४० इस्रायली ओलीस आहेत. कतार आणि इजिप्त यांच्या मध्यस्थीने युद्धविराम वाढवण्याचे प्रयत्न केले गेले; परंतु ते यशस्वी झाले नाहीत. इस्रायलने हे स्पष्ट केले आहे की, युद्धबंदीनंतर ते हमासवर पूर्ण ताकदीनिशी आक्रमण करतील आणि जोपर्यंत हमासचा नायनाट होत नाही, तोपर्यंत  थांबणार नाही.

आम्ही हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे ! – पंतप्रधान नेतान्याहू

पंतप्रधान नेतान्याहू

हमासला संपूर्णपणे नष्ट केल्यावरच गाझामधील आमच्या मोहीम आम्ही थांबवू, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांना सांगितले. जेरुसलेमध्ये ब्लिंकन यांची भेट घेतल्यानंतर नेतान्याहू म्हणाले, ‘‘आम्ही हमासला संपवण्याची शपथ घेतली असून तसे करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही.’’