महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
फोंडा : देहली येथील सुगम गायिका श्रीमती सुमन देवगण यांनी २७ नोव्हेंबरला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट दिली. या वेळी त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य सविस्तरपणे सांगितले. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विश्वविद्यालय करत असलेल्या विविध संशोधनाची माहिती श्री. आशिष सावंत यांनी दिली.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे एकूण कार्य पाहून त्यांनी ‘आजच्या काळासाठी आवश्यक असेच कार्य गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) करत आहेत. याची आजच्या पिढीसाठी पुष्कळ आवश्यकता आहे’, असे मनोगत व्यक्त केले.
श्रीमती सुमन देवगण यांचा परिचयदेहली येथील श्रीमती सुमन देवगण या सुगम संगीताच्या गायिका आहेत. त्यांची गझल, सुफी संगीत, ठुमरी, दादरा गायकी हे वैशिष्ट्य आहे. त्या संगीत नाटक अकादमीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. त्यांच्या गायनाचे कार्यक्रम देश-विदेशात झालेले आहेत. त्यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण पद्मश्री उस्ताद हाफिज अहमद खां यांच्याकडे झाले, तसेच सुगम संगीतातील ठुमरी, दादरा यांचे शिक्षण विदुशी नैनादेवी यांच्याकडे झाले. त्यांनी दूरचित्रवाणीवरील मालिका, काही चित्रपट यांमधे पार्श्वगायनही केले आहे. त्या अनेक सन्मानांनी विभूषित आहेत. |
संशोधन केंद्रातील सकारात्मक ऊर्जा आणि सात्त्विकता अनुभवल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही ज्या वेळी संगीत शिकायचो, त्या वेळी गुरूंच्या ज्या खोलीत आम्ही शिकायचो तिथे सतत गायनाचा रियाज केल्याने सकारात्मक स्पंदने निर्माण व्हायची आणि त्यामुळे अधिक चांगले वाटायचे. अशा ठिकाणी स्वर लावतांना वेगळेच म्हणजे दैवी जाणवायचे; परंतु येथे तर संशोधन केंद्राचा प्रत्येक कोपरा सात्त्विक आहे. त्यामुळे या वास्तूमध्ये कुठल्याही स्थानी स्वर लावला, तरी तुम्हाला तीच सात्त्विकता, तोच दैवीपणा अनुभवायला मिळू शकतो, असे मला वाटते.’’
‘या संशोधन केंद्रातून परत जायला पायच निघत नाही आहे. मी पुन्हा लवकरच येथे येईन’, असेही त्या जातांना म्हणाल्या.
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.