‘मी हिंदु जनजागृती समितीचा समन्वयक या नात्याने समाजसेवा म्हणून धर्म आणि पर्यावरण यांचे रक्षण करण्याची सेवा करत असतांना मला अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याकडून विधीविषयी (कायदेशीर गोष्टींमध्ये) मार्गदर्शन मिळत असे. कार्तिक कृष्ण द्वितीया (२९.११.२०२३) या दिवशी असलेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ४५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यामध्ये धर्मरक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व गुण असणे
१ अ. जिज्ञासू : वीरेंद्रदादांना राष्ट्र आणि धर्म यांविषयी सखोल माहिती जाणून घेण्याची पुष्कळ जिज्ञासा असते.
१ आ. उत्तम निरीक्षणक्षमता : वीरेंद्रदादा समाज, शासन, राज्यकर्ते, धर्मांध, तथाकथित पुरोगामी इत्यादींमध्ये चालू असलेल्या अयोग्य किंवा चांगल्या गोष्टी यांचे उत्तम निरीक्षण करतात.
१ आ. अभ्यासूवृत्ती : वीरेंद्रदादा एखाद्या खटल्यासाठी सर्व प्रमुख दैनिकांतील वृत्ते, ‘वेबसाईट’(माहितीजाल), इतिहास, धर्मप्रेमी किंवा धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी संघटना इत्यादींकडून मिळालेली माहिती किंवा माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेली माहिती इत्यादी माध्यमांतून माहिती जमा करून त्याचा सखोल अभ्यास करतात. ते एखाद्या खटल्याच्या संदर्भासाठी अतिशय महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे शोधतात आणि त्या विषयीच्या विधीनियमांचा (कायद्यांचा) अभ्यास करतात.
१ इ. इतरांना सर्वाेतोपरी साहाय्य करणे
१. एखादी व्यक्ती किंवा संघटना एखाद्या विषयावर मोहीम चालू करत असेल, तर वीरेंद्रदादा अशा संघटनांकडून राबवलेल्या मोहिमांना यश मिळेपर्यंत त्यांना सर्वाेतोपरी साहाय्य करतात.
२. त्यांनी विधीविषयी (कायदेशीर) केलेल्या मार्गदर्शनामुळे हिंदु जनजागृती समितीची ‘अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक आणि मंदिर सरकारीकरण यांच्या विरोधातील मोहीम, राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी दिलेला न्यायालयीन लढा, कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींच्या विरोधातील न्यायालयीन लढा, आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने घेण्यात येणार्या मोहिमा इत्यादी मोहिमा सनदशीर मार्गाने अन् यशस्वीपणे राबवता आल्या.
१ ई. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लागणारे धैर्य आणि लढाऊ वृत्ती :
‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।
अंतर्बाह्य जग आणि मन ।।’ – तुकाराम गाथा, अभंग ४०९१
अर्थ : रात्रंदिवस आम्ही युद्धासारख्या प्रसंगाचा सामना करत आहोत. हा संघर्ष बाहेरील जगाच्या समवेतच आत मनाशीही चालू आहे.
‘वीरेंद्रदादांची सेवा अशाच प्रकारची असते’, हे मी स्वतः अनुभवले आहे. एखाद्या अयोग्य किंवा अन्यायकारक प्रसंगासाठी न्यायालयीन खटले दाखल करणे आणि न्याय मिळेपर्यंत खटले लढणे, समाजासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणे इत्यादी प्रसंगांना ते मोठ्या धैर्याने अन् लढाऊ वृत्तीने सामोरे जातात.
२. राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रेमापोटी अविरतपणे न्यायालयीन लढे देणे
त्यांना पाठदुखी आणि इतरही काही शारीरिक त्रास आहेत, तसेच त्यांना तीव्र आध्यात्मिक त्रासही आहे. त्यांना कधीही दूरचा प्रवास करावा लागतो, कार्यक्रमांना वक्ता म्हणून जावे लागते, मुलाखती द्याव्या लागतात, ऐन वेळी न्यायालय किंवा शासकीय कार्यालय येथे उपस्थित रहावे लागते आणि इतर अधिवक्त्यांशी समन्वयही करावा लागतो. ते या सर्व गोष्टी कुशलतेने हाताळून राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रेमापोटी न्यायालयीन लढे अविरतपणे अन् यशस्वीपणे देत आहेत.
३. ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’ची धुरा सक्षमपणे सांभाळणारे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर !
एके काळी ‘विश्वगुरु’ असलेली भारतभूमी आज चोहोबाजूंनी संकटात आहे. या मातृभूमीला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यासाठी ‘हिंदु विधीज्ञ परिषद’ ही हिंदु धर्माभिमानी अधिवक्त्यांची संघटना मागील ११ वर्षे कार्यरत आहे. वर्ष २०१२ मध्ये अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’ची स्थापना झाली आणि वीरेंद्रदादांना या संघटनेचे अध्यक्ष केले गेले. तेव्हाचे त्यांचे वय, अनुभव किंवा त्यांचे विधीविषयीचे (कायद्याचे) ज्ञान इत्यादी अल्प असूनही त्यांना अध्यक्ष नेमल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले होते. ‘वीरेंद्र याचा अर्थ शूरांचा राजा’, असा आहे. त्यांच्या या नावाप्रमाणे आणि ईश्वरीकृपेने ते ‘हिंदु विधीज्ञ परिषद’ या संघटनेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. धर्माच्या बाजूने असलेली हिंदु विधीज्ञ परिषद, म्हणजे आगामी हिंदु राष्ट्रातील आदर्श न्यायव्यवस्थेचा पाया आहे आणि ती त्या दिशेने वाटचाल करत आहे.
४. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर धर्मरक्षणार्थ कार्यरत असल्याने धर्म त्यांचे रक्षण करीत असणे
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यामध्ये ज्वलंत राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान आहे. ‘धर्माे रक्षति रक्षितः।’ (मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक १५), म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो.’ या वचनानुसार ‘ईश्वर त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ ज्ञान देऊन त्यांच्याकडून धर्मरक्षणाची सेवा करून घेतो अन् त्यांचे रक्षणही करतो’, असे मला वाटते.
५. विधीविषयीच्या सर्व सेवा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सेवा’, या भावाने करणे
एवढ्या मोठ्या प्रमाणात न्यायालयीन सेवा करत असतांनाही ते नामजप, सत्संग, आध्यात्मिक उपाय इत्यादी व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतात. त्यांचा त्यांचे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ते ‘सर्व न्यायालयीन सेवा ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सेवा असून माझी साधना आहे’, या भावानेच करतात. ‘सर्वकाही गुरुदेवच करून घेतात’, असा त्यांचा भाव असतो.
‘वीरेंद्रदादांची सेवा परिपूर्ण, भावपूर्ण आणि गुरुमाऊलींना अपेक्षित अशी असते’, असे मला वाटते.
६. जणू धर्मरक्षणार्थ जन्माला आलेले अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर !
माझ्या अनुभवावरून मला म्हणावेसे वाटते,
धर्माच्या करिता वीरेंद्रदादांसी जगती ईश्वराने धाडियेले।
ऐसे जाणूनी वीरेंद्रदादा राष्ट्र, धर्म अन् गुरुभक्ती करितसे।
ईश्वराने हिंदू आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे अमूल्य रत्न दिले आहे. यापुढेही ‘त्यांच्याकडून अशीच अनमोल आणि अद्वितीय सेवा करून घेऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती करून घ्यावी’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे समष्टी संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.११.२०२२)