इंदूर (मध्यप्रदेश) येथे ४ विद्यार्थ्यांनी वर्गातील एका विद्यार्थ्याला कंपासद्वारे १२५ वेळा भोसकले !

(कंपास म्हणजे पेन्सिल घालून वर्तुळ बनवले जाणारे यंत्र)

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील गरिमा विद्या विहार शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याला अन्य ४ विद्यार्थ्यांनी कंपासद्वारे १२५ वेळा भोसकल्याची घटना घडली. पीडित विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी शाळा व्यवस्थापन आणि ४ विद्यार्थी यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, २४ नोव्हेंबरला जेव्हा ते मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेले, तेव्हा मुलगा शाळेच्या बाहेरच बसला होता. तो थोडा घाबरला होता आणि त्याचे दोन्ही हात पोटावर होते. त्याने सांगितले की, खूप दुखत आहे. कारण विचारल्यावर तो आधी गप्प राहिला. घरी आल्यावरही त्याच्या डोळ्यांतून अश्रू वहातच होते. त्याला याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, वर्गातील ४ विद्यार्थ्यांनी त्याचे पाय आणि पोट यावर एक टोकदार कंपास घातला होता. तसेच त्याच्या पोटात अनेक वार करण्यात आले. त्याची पॅन्ट काढली तेव्हा संपूर्ण पायावर भोसकल्याच्या खुणा होत्या. मुलाच्या शरिरावर १२५ पेक्षा अधिक जखमा होत्या ज्या जाड सुईने टोचल्यासारख्या दिसत होत्या, तर त्यांपैकी १०८ खोल होत्या. पँट पाहिली तेव्हा त्यावर अनेक ठिकाणी रक्त होते. घटनेच्या वेळी मुले खेळत होती. त्यानंतर आपापसांत वाद होऊन ४ मित्रांनी त्याच्यावर आक्रमण केले.

संपादकीय भूमिका 

‘शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अशी विकृती कुठून येत आहे ?’, याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना काढण्याचा प्रयत्न करत रहाण्यासहच मुलांना साधना शिकवून धर्माचरण करण्यास लावले, तर अशा घटना थांबतील !