‘हर हर महादेव !’

त्रिमूर्तींपैकी एक भगवान शिव हिंदूंचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. सृष्टीचे निर्माणकर्ता श्री ब्रह्मदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव आहेत. मृत्यू किंवा मोक्ष यावर श्री महादेवाचा अंकुश असतो. शिवाच्या नियमित उपासनेने भय, दुःख, रोग, दारिद्रय नाहीसे होऊन जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभते. ‘ॐ नमः शिवाय’ हा शिवाचा नामजप, तर ‘हर हर महादेव’ हा जयघोष आहे. ज्योतिर्लिंगाच्या स्थानी किंवा शिवाच्या मंदिरांत, तसेच काशीला गेल्यावर ‘हर हर महादेव’चा जयघोष आपल्याला हमखास वारंवार ऐकायला मिळतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांना ‘हर हर महादेव’ हा ‘स्वराज्याचा मंत्र’ दिला होता ! या जयघोषाची त्या वेळी शत्रूच्या उरात धडकी भरवणारी एवढी प्रचंड दहशत निर्माण झाली होती की, हा घोष कानी पडताच स्वराज्याचे शत्रू यवन थरथर कापू लागत. मूठभर मावळ्यांच्या बळावर पाच पातशाह्यांना धूळ चारली, त्यामागील शक्तीसामर्थ्य हेच होते ! ‘जिथे देवतेचे नाम आहे, तिथे त्याची शक्ती असते’, हा धर्मशास्त्राचा सिद्धांत आणि ‘हर हर महादेव’ घोषाचे महत्त्व विज्ञानाच्या स्तरावही आता सिद्ध झाले आहे. वाराणसीतील आय.एम्.एस्. बी.एच्.यू.च्या ‘फॅकल्टी ऑफ डेंटल सायन्स’चे आधुनिक वैद्य तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांवर या माध्यामातून उपचार करत आहेत. या ठिकाणी तोंडाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना दोन्ही हात वर करून ‘हर हर महादेव’चा जयघोष करण्यास सांगितले जाते. ‘या उपचारामुळे रुग्णांना अवघ्या दोन मासांत आराम मिळाला आणि त्यांचे हात पूर्ण वर उचलले जाऊ लागले !’, असे तेथील आधुनिक वैद्यांच्या लक्षात आले ! शस्त्रक्रिया करतांना रुग्णाच्या तोंडाच्या भागावर त्याच्या छातीचे काही स्नायू रोपण केले गेल्याने त्याचे हात आणि खांदे यांची हालचाल थांबते. ती पूर्ववत् होण्यासाठी ‘फिजिओथेरपी’सह लाखो रुपयांचे उपचार करूनही विशेष पालट जाणवत नाही; मात्र याच कर्करोगाच्या ३०० हून अधिक रुग्णांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करत हात वर करण्याचा प्रयत्न केल्यावर ८० टक्क्यांहून अधिकांच्या अवयवांची हालचाल होऊन त्यांना विस्मयकारक आराम मिळाला. या महाविद्यालयाचे प्रमुख एच्.सी. बरनवाल यांनी सांगितले की, ‘हर हर महादेव’चे उपचार आता जगभरात स्वीकारली गेले आहेत !’

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.