आपल्या देशात, म्हणजेच भारतात लोकशाही आहे. जगातील ‘सर्वांत मोठी लोकशाही असलेला आपला देश’, अशी आपली ओळख आहे. आपल्या देशाने सभ्यता जगाला शिकवली आहे. सभ्यतेच्या विषयी भारतीय संस्कृती सर्वांत श्रेष्ठ संस्कृती मानली जाते. अशा देशात काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यासारखा एक सुमार बुद्धीचा मध्यमवयीन माणूस रहातो. या माणसाचे पणजोबा, आजी आणि वडील या तिघांनी पंतप्रधान पद भूषवले आहे, म्हणजे एका राजघराण्यात जन्माला आलेला हा माणूस आहे; पण या माणसाला भारतीय संस्कृती ठाऊक नाही. शासनपद्धत काय असते ? ते ठाऊक नाही. लोकप्रतिनिधीने कसे वागावे ? कसे बोलावे ? याचे भान राहुल गांधींना नाही. अर्थात् लोकप्रतिनिधींमधील अनेक लोकप्रतिनिधींना त्यांचे दायित्व नेमके काय आहे ? त्यांनी समाजात कसे वावरावे ? आपली पत कशी राखावी ? तेही त्यांना कळत नाही. अशा सर्वांमध्ये राहुल गांधी सर्वोच्च स्थानावर आहेत.
१. विरोधक म्हणून राहुल गांधी यांची भूमिका दायित्वशून्यतेची !
लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका कशी असावी ? याची जाण आजच्या विरोधी पक्षाला आहे, असे वाटत नाही. त्याचा उत्तम नमुना म्हणजे राहुल गांधी आहेत. सत्ताधारी पक्षाने देशहिताचे निर्णय घेऊन प्रगती साधली आहे. त्यासाठी विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाचे प्रकटपणे कौतुक केले पाहिजे. देशाचे पंतप्रधान संपूर्ण देशाचे नेतृत्व करत असतात. त्यांचे मत हे देशाचे मत आहे, असे मानले जाते. देशाच्या पंतप्रधानाला जगात सन्मानाने वागवले जाते. ते सभ्यतेचे लक्षण आहे. राहुल गांधींना एवढी सुद्धा समज नाही, हे त्यांच्या वर्तनातून वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यांनी अत्यंत हीन पातळीवर जाऊन प्रत्येक वेळी अश्लाघ्य टीका केली आहे. पंतप्रधानांचा एखादा निर्णय अयोग्य वाटला, तर स्वतःचे विरोधी मत सर्व मर्यादा पाळून अत्यंत सभ्यतेने व्यक्त करता येते. ते व्यक्त करतांना ‘पंतप्रधानांचा निर्णय कसा अयोग्य आहे ?’, ते सप्रमाण सिद्ध करण्याचे दायित्वही विरोध करणार्याचे आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाला त्यापेक्षा अधिक श्रेयस्कर, हितकारक आणि अधिक श्रेष्ठ पर्याय सुचवणे, हे विरोध करणार्याचे कर्तव्य ठरते. राहुल गांधी अशा प्रकारचा विरोध करतांना आढळत नाहीत; कारण त्यांची तेवढी वैचारिक, बौद्धिक, मानसिक आणि भावनिक योग्यता नाही.
२. गुणांची पारख नसलेले !
केवळ राहुल गांधींमध्येच नव्हे, तर देशातील अनेक राजकीय नेत्यांमध्ये मोदी यांच्यामधील कोणतेही गुण आढळून येत नाहीत, हे दुर्दैव आहे. मोदी यांचा साधेपणा, राष्ट्रभक्ती, अथक काम करण्याचा त्यांचा सहज स्वभाव, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, आतंकवादाच्या विरोधात संपूर्ण जगात निर्माण केलेले वातावरण, जगातील सर्वसामान्य देशांना देऊ केलेला साहाय्याचा हात, देश स्वावलंबी बनवण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा, सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्याशी प्रसंगानुरूप साधलेला संवाद, ‘इस्रो’च्या (भारतीय अवकाश संस्थेच्या) वैज्ञानिकांना धीर देण्यासाठी त्यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्याविषयी व्यक्त केलेला कृतज्ञता भाव, गोरगरिबांसाठी निर्माण केलेल्या विविध सोयी, देशातील विकास कामे या आणि अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांच्याविषयी अपशब्द वापरतो, त्या वेळी तो सर्वसामान्य जनतेच्या मनातून उतरत जातो. एवढेच नव्हे, तर अशा लोकप्रतिनिधींमुळे आपल्या देशाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगली जाऊन देशाची अपकीर्ती होते. हे दुःख या वेदना असह्य आहेत.
३. सारासार बुद्धी नसलेले !
पंतप्रधानांनी केलेल्या कार्याची नोंद घेऊन राहुल गांधींनी एकदाही पंतप्रधानांचे कौतुक केल्याचे स्मरत नाही; मात्र मुखातून प्रत्येक वेळी पंतप्रधानांच्या विषयीचा विद्वेष बाहेर पडलेला आहे. परिणामी त्यांच्याकडून वारंवार सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधी अत्यंत निम्नस्तरावर आहेत. राहुल गांधींना पंतप्रधानांना नावे ठेवणे, बिनबुडाचे आरोप करणे, या व्यतिरिक्त काहीही जमलेले नाही. ते भाषण करतांना जी बडबड करतात, ती बालिश म्हणण्याच्या लायकीची सुद्धा नाही. वयाची ५० वर्षे उलटून गेल्यावरही ‘राहुल गांधींना सारासार बुद्धी आहे’, असे म्हणण्याचे धाडस होत नाही.
४. विरोधी पक्ष, म्हणजे बुद्धीहीन लोकांचा पक्ष आहे का ?
‘भारतात कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूसाठी मोजलेले पैसे सरळ उद्योगपती अदानींच्या खात्यात जमा होतात’, असे ते मूर्खासारखे बडबडत असतात. ‘ते अशी मशीन (यंत्र) बनवणार आहेत की, एका बाजूने बटाटा टाकला की, दुसर्या बाजूने सोने बाहेर पडणार आहे’, अशी बाष्कळ बडबड करणारा एक राजकीय नेता पंतप्रधानपदाचे स्वप्न पहात आहे. त्याचे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपडणारे महाभाग आपल्या देशात आहेत. हे पाहिल्यावर ‘विरोधी पक्ष, म्हणजे बुद्धीहीन लोकांचा पक्ष आहे कि काय ?’, असे वाटू लागते.
५. अंधश्रद्धा निर्मूलनवाले आता कुठे आहेत ?
नुकतेच राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांना ‘पनवती’ असे म्हटले आहे. विश्वचषक स्पर्धेत आपल्या देशाने अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाशी खेळतांना आपला पराभव झाला. आपल्या या पराभवाचे खापर राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर फोडले. नरेंद्र मोदी त्या सामन्याला उपस्थित राहिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे अंधश्रद्धा नाही का ? इतर वेळी अंधश्रद्धेवर टीका करणार्या लोकांनी राहुल गांधींच्या या वक्तव्यावर मौन पाळले आहे. याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या राहुल गांधींच्या या वक्तव्याला त्यांचा पाठिंबा आहे, असा जर कुणी लावला, तर त्यात चुकीचे काय ?
६. आतापर्यंत केवळ विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन !
कोणताही वकूब अंगी नसतांना काय वाटेल, ते बरळत रहाणे, हे एका लोकप्रतिनिधीला शोभणारे आहे का ? सध्याचे राजकीय वातावरण पाहिले, तर ते मनाला समाधान आणि आनंद देणारे नाही. गेल्या अनुमाने १० वर्षांच्या काळात आपल्या देशाने विविध क्षेत्रांत स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आपली अर्थव्यवस्था जगातील अर्थव्यवस्थेची तुलना करता सुदृढ आणि सक्षम आहे. या वास्तवतेकडे पाठ फिरवून केवळ पंतप्रधानांना वारंवार अपमानित करणे आणि त्यांच्यासाठी अपशब्द योजून आपल्या विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन करणे एवढेच काम राहुल गांधी करत आले आहेत.
७. ‘लोकप्रतिनिधी कसा नसावा ?’, याचा एक आदर्श म्हणजे राहुल गांधी !
राष्ट्राला घातक असणार्या गोष्टींना पाठिंबा देणे, आतंकवाद्यांची बाजू घेणे, विदेशात स्वदेशाची निंदा करणे, ही गोष्ट लोकप्रतिनिधी या नात्याने अत्यंत लांच्छनास्पद आहे. असे लांच्छनास्पद वर्तन राहुल गांधींकडून घडले आहे. आपल्या कोणत्याही वर्तनाचा ना खेद ना खंत असलेल्या राहुल गांधींना पुढच्या अनेक जन्मांत सद्बुद्धी लाभेल, असे वाटत नाही. ते काही असले, तरी एक गोष्ट नक्की अनंत काळ राहुल गांधी जनतेच्या लक्षात रहातील; कारण ‘लोकप्रतिनिधी कसा नसावा ?’, याचा एक आदर्श त्यांनी या विश्वात उभा केला आहे. अर्थहीन बडबड करणार्याला लोक राहुल गांधी या नावाने संबोधतील. थोडक्यात राहुल गांधी हे नाव भविष्यात ‘एक अपशब्द’ म्हणूनच उपयोगात आणले जाईल, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य ते काय ?
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२२.११.२०२३)
संपादकीय भूमिकादेशाच्या पंतप्रधानांवर अत्यंत हीन पातळीवर टीका करणारा विरोधी पक्ष म्हणजे बुद्धीहीन लोकांचा पक्ष होय ! |