मुसलमानांनो, नेदरलँड्स सोडा आणि अन्य कोणत्याही इस्लामी देशात चालते व्हा !

एक जुन्या व्हिडिओत नेदरलँड्सचे संभाव्य भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स यांनी वक्तव्य केल्याचा दावा

नेदरलँड्सचे संभाव्य भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत नेदरलँड्सचे कट्टर इस्लामविरोधी आणि राष्ट्रवादी नेते गीर्ट विल्डर्स यांचा पक्ष सर्वाधिक जागांवर निवडून आला आहे. या दृष्टीने लवकरच विल्डर्स हे पंतप्रधान बनतील, असे बोलले जात आहे. अशातच त्यांचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार एका व्हिडिओमध्ये विल्डर्स बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात ते म्हणत आहेत की, नेदरलँड्सचे जे मुसलमान कुराणला येथील कायद्यापेक्षा अधिक महत्त्व देतात, त्यांनी नेदरलँड्स सोडावे.

सौजन्य: Zee News English

या व्हिडिओनुसार विल्डर्स पुढे म्हणतात की, नेदरलँड्स येथील जे मुसलमान आमचे स्वातंत्र्य, आमची लोकशाही आणि आमची मूल्ये यांचा आदर करत नाहीत अन् ज्यांना कुराणचे नियम हे आमच्या धर्मनिरपेक्ष कायद्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे वाटतात, त्या सर्वांसाठी माझा संदेश आहे की, त्यांनी नेदरलँड्समधून चालते व्हावे ! ते कोणत्याही इस्लामी देशात जाऊ शकतात. तेथे ते त्यांचे इस्लामी कायदे पाळू शकतील. ते त्यांचे कायदे असतील, आमचे नाहीत.

निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त केल्यानंतर विल्डर्स यांनी म्हटले होते की, ‘पार्टी फॉर फ्रीडम’ पक्ष लवकरच सरकारचा भाग असेल आणि मी या सुंदर देशाचा पंतप्रधान ! विल्डर्स यांच्या पक्षाला ७६ जागा असलेल्या संसदेत ३७ जागांवर विजय मिळाला असला, तरी एकूण मतांच्या टक्केवारीत त्यांच्या पक्षाचा २५ टक्केच सहभाग आहे.