१०० घंट्यांमध्ये कामगारांपर्यंत पोचणार !
उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी २६ नोव्हेंबरच्या पहाटे ५ वाजल्यापासून बोगद्याच्या वरून यंत्राद्वारे खोदकाम करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. १०० घंट्यांमध्ये ८६ मीटर खोदकाम करून खाली बोगद्यात असणार्या कामगारांपर्यंत पोचण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे. दुसरीकडे ‘ऑगर यंत्रा’चे ब्लेड तुटल्यानंतर ते बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू करण्यात आला आहे. त्यासाठी विविध यंत्र आणण्यात आली आहेत. ‘प्लाझ्मा कटर’ यंत्राद्वारे अडकलेले ब्लेड कापण्यात येणार आहे. तसेच विदेशी तज्ञांचे एक पथकही येथे पोचले आहे. जर ऑगर यंत्राचा तुटलेला भाग बाहेर काढता आला, तर नंतरचे खोदकाम हाती घेण्यात येईल. येथून कामगारांपर्यंत पोचण्यासाठी केवळ १० मीटर अंतर खोदणे शेष राहिले आहे.
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना योगासने करण्याचा सल्ला !
बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बी.एस्.एन्.एल्.कडून दूरभाष लाईन टाकण्यात येत आहे. त्याद्वारे हे कामगार त्यांच्या नातेवाइकांशी थेट संपर्क करू शकणार आहेत. तसेच या कामगारांच्या मानसिक स्थितीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. कामगारांना पत्ते, बुद्धीबळ, ल्युडो, तसेच भ्रमणभाष खेळण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. यासमवेतच त्यांना योगासने करण्यासही सांगण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकायोगासनांसमवेत कामगारांना देवतांचा नामजप करणे, प्रार्थना, भावजागृतीसाठी प्रयत्न करण्यासही सांगितल्यास त्यांना ईश्वरी साहाय्य मिळून त्यांची स्थिती चांगली राहू शकते ! |