|
नंदुरबार – विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते आणि पत्रकार केतन रघुवंशी हे गेल्या अनेक वर्षांपासून गोरक्षणाचे कार्यही करत आहेत. अशाच एका प्रकरणात त्यांनी गोवंशियांची कातडीची अवैधपणे वाहतूक करणारी जाबीरखान जहाँगीरखान कुरेशी याची गाडी पकडली. या प्रकरणात पोलिसांनी कुरेशी याच्यावर कारवाई न करता केतन यांच्यावरच वर्ष २०२२ मध्ये गुन्हे नोंद केले. या संदर्भात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाद मागण्यात आली. सविस्तर प्रकरण ऐकल्यावर गोरक्षक केतन रघुवंशी यांना त्रास दिल्याविषयी पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून नंदुरबार पोलीस अधीक्षकांना आयोगाने २१ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. नंदुरबार पोलीस अधीक्षक यांना अधिक अन्वेषण करून संबंधित पोलीस अधिकार्याने केलेली चूक शोधून काढून त्याच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत. (‘गोरक्षकांवर कायद्याचा बडगा आणि गोहत्यार्यांना मुक्त संचार’ ही स्थिती महाराष्ट्राला पाकिस्तानच्या दिशेने घेऊन जात आहे का, असा कुणी प्रश्न विचारल्यास चूक ते काय ? महाराष्ट्र सरकारने हा अनर्थ घडू देण्याआधीच कठोर उपाययोजना आखाव्यात, ही हिंदूंची आग्रही मागणी आहे ! – संपादक) या प्रकरणी अधिवक्ता रोहन गिरासे यांनी केतन रघुवंशी यांची बाजू मांडली. आदेश पारित झाल्यापासून एक मासाच्या आत तक्रारदाराला संबंधित रक्कम देऊन आयोगाकडे अनुपालन अहवाल सुपूर्द करण्यास सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने दिलेल्या आदेशात नमूद केलेली सूत्रे !
१. गोरक्षक केतन रघुवंशी यांनी तक्रारी परत घ्याव्यात, यासाठी त्यांच्या विरोधात खोटा हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. हा प्रस्ताव न्यायालयाने रहित केला.
२. तक्रारदार हे गोरक्षक असून त्यांनी तळोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा ५०० गोवंशियांची अवैधपणे होणारी वाहतूक पकडून दिली होती. कुरेशी हा गोवंश मांसविक्री आणि तस्करी करत असल्याचे माहिती असतांनाही त्याचे वाहन सोडण्यात आले अन् तक्रारदार केतन रघुवंशी यांच्या विरोधात खोटा गुन्हा नोंद करून घेण्यात आला.
३. खरे पहाता गोरक्षक केतन रघुवंशी यांनीच गुन्ह्याची माहिती पोलिसांना देणे, दूरभाष करणे, त्यांना घटनास्थळी बोलावणे, त्याचे चित्रीकरण करणे, जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यात आणण्यास साहाय्य करणे असे केलेले असतांना केतन यांच्यावर दरोडा, लूटमार यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या खोट्या तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या.
४. वरील सर्व गोष्टी पहाता पोलीस अधिकार्यांनी तक्रारदाराशी केलेली वर्तणूक ही पूर्णत: चुकीची असून ती मानवाधिकाराचे उल्लंघन करणारी आहे. त्यासाठी तो ‘मानवी हक्क’ आणि त्या हेतूसाठी आर्थिक भरपाईचा अधिकारी आहे. त्यामुळे कलम १८ (ई) च्या अंतर्गत मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ आणि विनियम २२ ते २४ महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग (प्रक्रिया), विनियम २०११ प्रमाणे नंदुरबार पोलीस अधीक्षकांना चौकशी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
केतन रघुवंशी (गौ रक्षक व सुदर्शन न्युज चे जिल्हा वार्ताहर) यांच्यावरील दाखल खोट्या गुन्हानच्या निकाल संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार याना रुपये 21000 दंड व संबंधित अधिकारींचे खातेनिहाय चौकशीचे आदेश माननीय ह्युमन राईट कमिशन महाराष्ट्र यांनी दिलेhttps://t.co/mb8hMDDpQC
— हिंदुसेवक केतन रघुवंशी (@ketansports) November 25, 2023
आयोगाचा आदेश सचोटीने धर्मकार्य करणार्या गोरक्षकांसाठी समाधानाची गोष्ट ! – केतन रघुवंशीमी एक व्यावसायिक असून श्री. सुरेश चव्हाणके यांच्या ‘सुदर्शन चॅनल’चा वार्ताहर आहे. माझ्याकडे भाजप युवामोर्चा नंदुरबार जिल्हाध्यपदाचे दायित्व आहे. मी पकडलेल्या गाडीत ५०० गोवंशियांची कातडी प्रत्यक्षात असतांना स्थानिक पोलिसांनी केवळ धर्मांधांचा अनुनय करण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे नोंद केले. ऐन गणेशोत्सवात मला नंदुरबार शहरातून हद्दपार केले. ही हद्दपारी अवैध असल्याने त्याला सत्र न्यायालय नंदुरबार येथे आव्हान दिले. हे आव्हान संमत होऊन हद्दपारी रहित झाली. तरीही पोलिसांनी त्यांचा हेकेखोरपणा सोडला नाही आणि माझ्या विरोधात खोटे गुन्हे लावणे चालूच ठेवले. त्यामुळे मी या विरोधात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे आव्हान केले. त्यानुसार माझ्यावरील गुन्हा रहित करण्याचा आयोगाने आदेश दिला. हा आदेश म्हणजे सचोटीने धर्मकार्य करणार्या महाराष्ट्रातील तमाम गोरक्षकांसाठी समाधानाची गोष्ट आहे. यामुळे हिंदु बांधव आणि गोरक्षक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.’’ |