३९ कोटी २४ लाख रुपयांची मालमत्ता कह्यात
पणजी : अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) गोवा राज्यातील ३९ कोटी २४ लाख रुपयांच्या ३१ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या कह्यात घेतल्या आहेत. अवैधरित्या भूमी बळकावल्याच्या प्रकरणांत गुतलेल्या लोकांच्या विरोधात ‘मनी लाँड्रिंग’ कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. विक्रांत शेट्टी, महंमद सुहैल, राजकुमार मैथी यांसह अन्य काही जणांविरुद्ध राज्यातील भूमी बळकावल्यासंबंधी गोवा पोलिसांनी नोंद केलेल्या ‘एफ्.आय.आर्.’ वरून ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.
राज्यात भूमी बळकावल्याची प्रकरणे समोर येऊ लागल्यानंतर त्यांचे अन्वेषण करण्यासाठी सरकारने गोवा पोलिसांचे विशेष अन्वेषण पथक स्थापन केले. ‘भूमी बळकावल्याच्या प्रकरणातील आरोपींनी स्वतःच्या, सहकार्यांच्या आणि नातेवाईकांच्या नावांवर बनावट कागदपत्रे बनवून भूमी मिळवल्या होत्या. बनावट कागदपत्रांत या भूमी त्यांच्या पूर्वजांच्या मालकीच्या असल्याचा दावाही केला होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे वारसा नोंदी करून त्यांची नावे अद्ययावत् किंवा भूमीच्या नोंदींमध्ये समाविष्ट करून घेतली. यांपैकी काही भूमी आरोपींनी गोवा आणि इतर राज्यांतील ग्राहकांना विकल्या’, असे ‘ईडी’च्या अन्वेषणात समोर आले आहे.
या मासाच्या आरंभी ‘ईडी’ने एस्टेव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि समीर कोरगावकर यांनी बळकावलेल्या ११ कोटी ८२ लाख रुपयांच्या भूमीही कह्यात घेतल्या आहेत.माफिया