‘वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही प्रसार करतांना काही धर्मप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. वसाहतीपासून दूर असलेल्या घरी रात्रीच्या वेळी जाऊन निमंत्रण दिल्यावर जिज्ञासूंना आनंद होणे : एका गावात प्रसार करतांना एका वसाहतीपासून दूर असलेल्या शेतामध्ये एक घर होते. रात्रीची वेळ होती, तरीही ‘त्यांच्याकडे जाऊन निमंत्रण द्यावे’, असा माझ्या मनात विचार आला. मी आणि सहसाधक त्यांच्या घरी गेलो. तेव्हा त्या जिज्ञासू आम्हाला म्हणाल्या, ‘‘एवढ्या रात्री आमच्या घरी सहसा कुणी येत नाही; पण तुम्ही निमंत्रण घेऊन आलात. आम्हाला पुष्कळ चांगले वाटले.’’
२. जिज्ञासूंनी अर्पण दिल्यावर ‘दिलेले अर्पण गुरूंपर्यंत पोचेल’, असा त्यांना विश्वास असणे : गावामध्ये प्रसार करतांना काही जिज्ञासूंनी अर्पण दिले. एक जिज्ञासू आम्हाला म्हणाले, ‘‘सनातनचे कार्य आम्हाला ठाऊक आहे. तुम्हाला दिलेले पैसे गुरूंपर्यंत पोचणारच आहेत. संस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे.’’
३. संस्था आणि साधक यांचे कौतुक करणे
अ. एक जिज्ञासू आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही घरचे सर्व सांभाळून सेवा करत आहात. आपली संस्कृती आणि धर्म हे आपणच सांभाळले पाहिजे. समाजामध्ये जागृती व्हायला पाहिजे. तुम्हाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.’’
आ. दुसरे जिज्ञासू म्हणाले, ‘‘सनातन संस्था भारतातील अशी एकमेव संस्था आहे, जी सर्वांना एकत्र करते. तुमची ही सेवा म्हणजे कृष्णाचीच सेवा आहे.’’
४. आम्ही जिज्ञासूंना संपर्क करतांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे ‘अॅप’ विषयी माहिती सांगितली. तेव्हा अनेकांनी ते ‘अॅप’ त्यांच्या भ्रमणभाषमध्ये ‘डाऊनलोड’ केले.
‘श्री गुरूंच्याच कृपेने गुरुपौर्णिमेच्या प्रसाराची सेवा करण्याची संधी मिळाली. गुरुदेवांचे समष्टी रूप अनुभवण्याची संधी दिली, याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. पूजा दीपक धुरी, साळगांव, कुडाळ. (३.७.२०२३)