गोवंश संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पिंपरी ‌(पुणे) येथे सर्वांत मोठे अश्व आणि देशी गोवंश प्रदर्शन !

पिंपरी (जिल्हा पुणे) – गोवंश संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील सर्वांत मोठे अश्व आणि देशी गोवंशियांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यासाठी देशभरातून पशूपालकांनी नोंदणी केली आहे. बैलगाडा शर्यतबंदी उठवण्यासाठी यशस्वी लढा उभारणारे आणि गोसंवर्धनासाठी चळवळ उभी करणारे गोरक्षक आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, मोशी येथे २५ आणि २६ नोव्हेंबर या दिवशी भव्य देशी गोवंश प्रदर्शन आणि पशू आरोग्य शिबीर भरवण्यात येणार आहे. या वर्षी विविध देशी प्रजातींचे १ सहस्रांहून अधिक पशू प्रदर्शत सहभागी होतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

एकूण १७ प्रकारांतील पशूंचा ‘रँप वॉक’ (मॉडेल चालतात ती पद्धत) असलेले हे देशातील पहिले देशी गोवंश पशूप्रदर्शन आहे. देवनी, खिल्लार, लाल कंधारी, साहिवाल, लाल सिंधी, गीर, ओंगोले, वेचूर अशा विविध गोवंशासाठी प्रजातिनिहाय स्पर्धा घेण्यात येणार आहे. कोविड सारख्या महामारीच्या काळात देशी गोवंशियांचे आणि त्यांच्या उत्पादनांचे महत्त्व जगाला कळले आहे. त्यामुळे याविषयी जनजागृती आणि गोसंवर्धनाचा संदेश तळागाळात पोचला पाहिजे, या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील शासकीय आणि अशासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी. ज्यामुळे भावी पिढीला गोवंशाचे महत्त्व कळेल.