सेवा करतांना भावाच्या स्तरावर प्रयत्न करतांना साधिकेला लाभलेला संतांचा सत्संग !

१. पाहुण्यांना महाप्रसाद वाढण्याची सेवा करतांना ‘संतांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करणे; पण प्रत्यक्षात तसा भाव निर्माण न होणे

सौ. सोनाली पोत्रेकर

‘एकदा मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अतिथींना महाप्रसाद वाढण्याची सेवा होती. सकाळपासून माझ्या मनात ‘भाव भुकेला हरि, करितसे भक्तांची चाकरी’, हे भजन येत होते. तेव्हा मी प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून विचारले, ‘हे गीत माझ्या मनात सतत चालू ठेवून तुम्हाला मला काय शिकवायचे आहे ? मला काही कळत नाही. तुम्हीच मला सांगा.’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी भाव ठेवण्यात अल्प पडत आहे. आज पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (सनातनच्या ११९ व्या संत) यांचा वाढदिवस आहे.’ ‘पाहुण्यांना जेवण वाढण्याची सेवा करतांना पू. डगवारकाकूंची सेवा करत आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न करायचे मी ठरवले; पण प्रत्यक्ष सेवा करतांना मला तसे जमत नव्हते. तेव्हा माझ्या मनात विचार आले, ‘मला संतसेवा कशी मिळणार ? मला तर संतसेवेचे काहीच येत नाही.’

२. पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार आणि पू. (श्रीमती) विजया दीक्षित यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना जेवण वाढण्याची सेवा मिळणे अन् संतांचा सत्संग आणि त्यांची सेवा मिळाल्याबद्दल कृतज्ञता वाटणे

पाहुण्यांचे जेवण झाल्यावर मी आवरायला घेणार इतक्यात पू. रेखाताईंनी (पू. रेखा काणकोणकर, सनातनच्या ६० व्या संत) यांनी मला सांगितले, ‘‘पू. डगवारकाकू आणि पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी (सनातनच्या ११३ व्या संत) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना जेवण वाढण्याच्या सेवेत साहाय्य करा.’’ तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. मला त्या सेवेत पूर्ण वेळ भावजागृती अनुभवता आली. ‘संतांची छायाचित्रे काढणे, संतांनी संतांना शुभेच्छा देणे’ आदी सोहळा मला प्रत्यक्ष पहायला मिळत होता. मला वाटले, ‘माझी काहीच पात्रता नसतांना प.पू. डॉक्टर मला किती भरभरून देत आहेत !’ मला संतांचा सत्संग आणि त्यांची सेवा मिळाल्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटून माझा भाव दाटून येत होता.

३. पू. दीक्षितआजींनी साधिकेचा हात हातात धरल्यावर तिला शब्दांच्या पलीकडले पुष्कळ काही मिळणे

पू. दीक्षितआजींच्या जवळ मी हात जोडून बसले. तेव्हा त्यांनी माझे हात हातात धरून सांगितले, ‘‘परम पूज्यांचे आशीर्वाद सतत आपल्या समवेत आहेत.’’ त्यांचा स्पर्श मला शब्दांच्या पलीकडचे पुष्कळ काही देत होता.

४. संतसेवा करतांना संतांची प्रीती अनुभवणे

मी संतांना वाढत असतांना पू. डगवारकाकू आणि त्यांची मुलगी कु. मयुरी यांनी मला सांगितले, ‘‘उभे राहू नका. बसा. आम्हाला काही हवे असल्यास आम्ही मागून घेऊ.’’ शेजारच्या आसंदीवर मी बसले. तेव्हा त्यांनी माझी आणि कुटुंबियांची प्रेमाने विचारपूस केली.

५. पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्यातील देवीतत्त्व कार्यरत असल्याने दिवसभर सूक्ष्मातून घंटानाद ऐकू येणे

मला दिवसभर घंटानाद ऐकू येत होता. मला वाटले की, कुठेतरी घंटानाद चालू असेल. मी अन्य साधकांना याविषयी सांगितले. तेव्हा ‘असा घंटानाद चालू नाही’, असे मला समजले. तेव्हा मला दिवसभर ‘सूक्ष्मातून घंटानाद ऐकू येत आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘पू. डगवारकाकू धर्मप्रचाराची सेवा करतात. त्यासाठी त्यांच्यात देवीतत्त्व कार्यरत असते. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मला सूक्ष्मातून घंटानाद ऐकू आला’, असे मला वाटले.

‘प.पू. डॉक्टरांनी मला पाहुण्यांना जेवण वाढायची सेवा करतांना पू. डगवारकाकूंना जेवण वाढत आहे’, असा भाव ठेवायला सांगितला आणि पू. रेखाताईंच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवायलाही दिला. मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. सोनाली रवींद्र पोत्रेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक