‘सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत पू. मंदाकिनी डगवार, म्हणजे माझी मोठी बहीण पू. ताई ! आम्हा कुटुंबियांना कुठलीही व्यावहारिक किंवा आध्यात्मिक अडचण आली, तर पू. ताई आम्हाला पुष्कळ छान दृष्टीकोन देऊन त्यातून बाहेर काढून पुढे घेऊन जातात. ‘साधनेविना पर्याय नाही’, असे सांगून त्या आम्हाला साधनेसाठी उद्युक्त करतात. कार्तिक शुक्ल त्रयोदशी (२५.११.२०२३) या दिवशी त्यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांच्याविषयीची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांना ६० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. कुटुंबियांचा आधार बनून प्रेमाने त्यांच्याकडून साधना करून घेणार्या पू. मंदाकिनी डगवार !
पू. ताई आम्हा भावंडांमध्ये सर्र्वांत मोठ्या आहेत आणि त्या आम्हा कुटुंबियांचा आधारही आहेत. पू. ताई तत्त्वनिष्ठ राहूनही सर्वांना प्रेमाने सांभाळून घेतात. त्या आम्हा सर्व कुटुंबियांची आध्यात्मिक आई आहेत. ‘साधना करून मनुष्य जन्माचे सार्थक करायचे आहे’, असे त्यांनी आमच्या मनावर बिंबवले आहे. आमच्याकडून साधनेचे प्रयत्न करून घेणार्या पू. ताईंमध्ये मला माझ्या गुरुमाऊलींचे रूप दिसते.
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी वडिलांच्या मनात श्रद्धा निर्माण करणे : माझ्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला होता, तेव्हा वडील पू. ताईंना ‘मंदा, मंदा’, असे सारखे हाक मारायचे. तेव्हा पू. ताई वडिलांना म्हणाल्या, ‘‘मला हाक न मारता प.पू. गुरुदेवांना हाक मारा. त्यांना आळवा आणि त्यांचे स्मरण करा. तुम्हाला होणार्या सर्व त्रासांचे त्यांना आत्मनिवेदन करा. तेच आपले रक्षण करतात.’’ त्यामुळे वडिलांच्या मनामध्ये प.पू. गुरुदेवांविषयी पुष्कळ श्रद्धा निर्माण झाली. त्यानंतर वडिलांना काही त्रास झाला, तर ते प.पू. गुरुदेवांचा ‘प.पू. डॉक्टर आठवलेजी की जय ।’, असा जयघोष करायचे.
२. पू. मंदाकिनी डगवार यांनी मनावर बिंबवलेले साधनेचे महत्त्व !
२ अ. ताप आल्यावर देवाच्या अनुसंधानात राहून नामस्मरण करण्यास सांगणे : एकदा मला पुष्कळ ताप आला होता; म्हणून ‘यजमानांनी घरी थांबावे’, असे मला वाटत होते. नेमका तेव्हा मला पू. ताईंचा दूरभाष आला. मी त्यांना म्हटले, ‘‘मला पुष्कळ ताप आला आहे आणि घरी मी एकटीच आहे.’’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘औषध घे आणि भगवंताचे नामस्मरण कर. देव तुझ्या समवेत आहे. देवाशी बोल आणि देवाच्या सतत अनुसंधानात रहा.’’ हे ऐकून मला पुष्कळ चांगले वाटले. पू. ताईंनी दिलेल्या या आध्यात्मिक दृष्टीकोनामुळे मी लगेच बरी झाले.
२ आ. अपघात झाल्यावर दिलेला आध्यात्मिक आधार !
२ आ १. अपघात झाल्यामुळे रुग्णालयात भरती केल्यावर प्रथम पू. मंदाकिनी डगवार यांनाच कळवणे आणि त्यांच्या शब्दांनी आश्वस्त होणे : वर्ष २०१५ मध्ये माझा मोठा अपघात झाला. मार्ग ओलांडत असतांना मला चारचाकी गाडीने धडक दिली. मी अर्धवट शुद्धीत होते. मला काहीच समजत नव्हते. माझ्या मुखातून केवळ ‘परम पूज्य’, एवढेच शब्द निघाले. तेथील एक दुकानदार ताई आणि माझ्या समवेत असणार्या एक ताई यांनी मला रुग्णालयात नेले. तेथील आधुनिक वैद्यांनी मला विचारले, ‘‘कुणाला भ्रमणभाष करायचा ?’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘माझी मोठी बहीण पू. मंदाकिनी डगवार यांना भ्रमणभाष करा.’’ त्यांनी पू. ताईंना भ्रमणभाष लावल्यावर मी पू. ताईंना सांगितले, ‘‘माझा मोठा अपघात झाला असून मी रुग्णालयात आहे.’’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘काही काळजी करू नकोस. तू लवकर बरी होशील. गुरुदेव तुझ्या समवेत आहेत.’’
२ आ २. अपघातामुळे पुष्कळ वेदना होणे; पण पू. मंदाकिनी डगवार यांनी सांगितल्याप्रमाणे गुरुस्मरण केल्यावर ईश्वराने वेदना सोसण्याची शक्ती देणे : माझा अपघात झाला, तेव्हा माझ्या घरी कुणीच नव्हते. मुलगी वाचनालयात आणि यजमान बाहेरगावी गेले होते. अपघातामुळे मला पुष्कळ वेदना होत होत्या; पण पू. ताईंनी सांगितल्यानुसार गुरुस्मरण केल्यामुळे ईश्वराने मला वेदना सोसण्याची शक्ती दिली. पू. ताई माझ्या गुरुच आहेत.
२ आ ३. पू. मंदाकिनी डगवार यांनी ‘व्यष्टी साधना वाढवण्याची ही संधी आहे’, असे सांगून व्यष्टी साधना करून घेणे : अपघातानंतर पुढे २ मास मला पलंगावरून उठता येत नव्हते. तेव्हा पू. ताई मला म्हणाल्या, ‘‘या स्थितीत तुला व्यष्टी साधना वाढवण्याची पुष्कळ चांगली संधी आहे.’’ पू. ताई मला न विसरता भाववृद्धीसत्संग आणि शुद्धीसत्संग (टीप) यांच्या ‘लिंक’ पाठवून द्यायच्या. त्या मला ते सत्संग ऐकायला सांगायच्या आणि ‘सत्संग ऐकले कि नाही ?’, याचा आढावाही घ्यायच्या. त्या अधूनमधून भ्रमणभाष करून माझी विचारपूस करायच्या आणि भावप्रयोग करून घ्यायच्या. त्या त्यांच्या गोड आवाजात मला भजन ऐकवायच्या. त्यामुळे मला शक्ती मिळत होती. त्या २ मासांत देवाने पू. ताईंच्या माध्यमातून माझ्याकडून व्यष्टी साधनेचे चांगले प्रयत्न करून घेतले.
टीप – साधकांनी त्यांच्याकडून झालेल्या चुका सांगितल्यावर ‘त्या चुका कुठल्या स्वभावदोषांमुळे झाल्या?’, ते सांगून ते स्वभावदोष न्यून करण्यासाठी केलेले मार्गदर्शन.
२ आ ४. पू. मंदाकिनी डगवार यांच्यामुळे ‘देवच कुटुंबियांच्या माध्यमातून साहाय्य करत होता’, याची जाणीव होणे : पू. ताई मला सतत सांगत होत्या ‘काळजी करू नकोस. श्रीकृष्ण तुझ्या समवेत आहे.’ कुटुंबियांना माझे सर्व जागेवरच करावे लागत होते; पण माझ्या मुलीने माझी पुष्कळ काळजी घेतली. कुटुंबियांनी माझी सर्व सेवा आनंदाने केली. तेव्हा पू. ताईंमुळेच मला ‘कुटुंबियांच्या माध्यमातून देवच साहाय्य करत आहे’, याची जाणीव झाली. प.पू. गुरुदेव, त्यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
३. पू. मंदाकिनी डगवार यांचे जाणवलेले गुण
३ अ. शिकण्याची वृत्ती : पू. ताई सतत सर्व स्वीकारण्याच्या आणि शिकण्याच्या स्थितीत असतात. त्यांना एखादी गोष्ट कळली नाही, तर त्या विचारून विचारून ती सेवा पूर्ण करतात.
३ आ. साधनेची ओढ
१. पू. ताईंच्या साधनेत पुष्कळ अडचणी आल्या; पण त्या अडचणींवर मात करून त्यांनी मनापासून साधना केली.
२. आम्ही बहिणी असून भ्रमणभाषवर त्या कधीच मायेतील विषय बोलत नाहीत. पू. ताई आम्हाला सांगतात, ‘साधनेचे प्रयत्न कुठे न्यून पडतात ?’, याचे चिंतन करून साधनेचे प्रयत्न वाढवा. सतत वर्तमानकाळात रहा आणि सतत गुरुस्मरण करा.’
३ इ. सेवेची तळमळ
१. एकदा आम्ही माहेरी (तहसिल (पुलगाव, जि. वर्धा)) गेलो असतांना पू. ताई तिथेही सत्संग आणि अर्पण घेण्याची सेवा करत होत्या. तेथील दुकानांत गेल्यावर पू. ताई ‘दुकानदारांना साधना सांगणे, त्यांना वर्गणीदार बनवणे’, असे प्रयत्न माझ्याकडूनही करून घेत होत्या.
२. आमची बदली ‘लोणी’ (जि. अमरावती) या गावी झाली असतांना पू. ताई २ घंट्यांसाठी माझ्याकडे आल्या होत्या. तेवढ्या वेळेत त्यांनी २ संपर्क केले.
३. आमची बदली ‘येवदा’ (जिल्हा अमरावती) येथे झाली असतांना पू. ताई तिथे २ दिवसांसाठी आल्या होत्या. तिथे आम्ही पोलीस वसाहतीत रहात होतो. तिथेही पू. ताईंनी सत्संगाचे नियोजन करून सत्संग घेतला.
यातून ‘पू. ताईंना गुरुसेवेचा पुष्कळ ध्यास असून त्या सेवेविना राहूच शकत नाहीत’, हे माझ्या लक्षात आले आणि शिकताही आले.
३ ई. अनुसंधान : पू. ताई कुठलेही काम किंवा सेवा करत असतील, तरी त्या सतत देवाच्या, म्हणजेच गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात.
३ उ. स्वतःमधील आंतरिक भावाने इतरांची भावजागृती करणे
१. पू. ताई सतत भावावस्थेत असतात. त्या भजने छान म्हणतात. त्यांनी गायलेली भजने ऐकून भावजागृती होते.
२. ‘पू. ताईंमध्ये असलेली तळमळ अाणि भाव यांमुळे त्यांनी सांगितलेली सूत्रे समोरच्या व्यक्तीच्या अंतर्मनापर्यंत पोचतात आणि तिची भावजागृती होते’, हेही मला अनुभवता आले.
४. श्रीमती मंदाकिनी डगवार ‘संत’ म्हणून घोषित होण्याआधी काही दिवस घरी आल्या असतांना आलेल्या अनुभूती !
अ. श्रीमती मंदाकिनी डगवार रामनाथी येथे जाण्याच्या २ मास आधी अमरावती येथे माझ्या घरी आल्या होत्या. तेव्हा ‘संत घरी येत आहेत’, असा भाव माझ्या मनात निर्माण झाला होता आणि माझ्याकडून तशा प्रार्थना होत होत्या.
आ. त्या घरी आल्यावर ‘माझ्या वास्तूची शुद्धी होत आहे’, असे मला जाणवत होते.
इ. मला कंबर आणि पाय यांचा पुष्कळ त्रास आहे; पण त्या घरी आल्या, तेव्हा हा त्रास पुष्कळ न्यून झाला.
त्यांच्या वास्तव्याने मला पुष्कळ आनंद मिळाला. ‘ताई लवकरच पू. ताई होणार’, असे मला सारखे वाटत होते. त्याप्रमाणे पुढे दोनच मासांनी (१०.४.२०२२ या दिवशी) त्या संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.’
– सौ. चंदा अशोकराव बागडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५२ वर्षे), अमरावती (महाराष्ट्र) (१८.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |