वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मंगलमय रथोत्सव झाला. त्या वेळी सौ. शुभांगी शेळके यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. रथातील सिंहासनावर विराजमान झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दृष्टीतील प्रीती आणि करुणा पाहून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे
‘२२.५.२०२२ या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या रथोत्सवाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले रथावर आरूढ झाले होते. पितांबर परिधान केलेली विष्णुस्वरूप गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) अत्यंत प्रीतीमय दृष्टीने आम्हा साधकांकडे पहात होती. त्यांच्या वात्सल्यमय दृष्टीत करुणा होती. त्यांची वात्सल्यमय दृष्टी आम्हाला सांगत होती, ‘वत्सा, मी सतत तुझ्या समवेत आहे.’ ‘परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या करुणामय दृष्टीतून प्रत्येकाची प्रेमाने आणि आपुलकीने विचारपूस करत आहेत’, असे मला जाणवले. त्या क्षणी ‘सिंहासनावर आरूढ झालेला माझा विष्णुस्वरूप आराध्यदेव जणू स्वतःही भक्तीरसाने न्हाऊन निघाला आहे’, असे मला जाणवले. ‘कितीतरी वर्षे स्वतःच्या खोलीत तपस्या करत असलेला माझा देव आज प्रत्यक्षात स्थुलातून केवळ साधकांच्या प्रेमापोटी स्वतःची प्रकृती अस्वस्थ असतांनाही बाहेर पडला’, याबद्दल आम्ही सर्व जण गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.
२. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सूर्याप्रमाणे स्थिर राहून अवघ्या ब्रह्मांडाला प्रकाशित करत आहेत’, असे जाणवणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चेहर्यावर शांत रस स्थित झाला आहे’, असे मला वाटले. सूर्य जसा एका ठिकाणी स्थिर राहून अवघ्या ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, काळजी वहातो आणि पालनपोषण करतो, अगदी तसेच त्यांच्या अस्तित्वातून मला जाणवत होते. त्याच वेळी त्यांच्याकडून मातेचा प्रीतीभावही प्रक्षेपित होत होता.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अस्तित्वाने भर उन्हातही पौर्णिमेच्या कैवल्यमय चांदण्याची शीतलता अनुभवता येणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यात कारुण्यभाव ओतप्रोत भरला आहे आणि त्या अत्यंत करुणामय दृष्टीने साधकांकडे पहात आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी मला भर उन्हातही पौर्णिमेच्या कैवल्यमय चांदण्याची शीतलता अनुभवता आली, ती केवळ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अस्तित्वामुळेच ! त्या वेळी ‘त्यांच्याकडूनही पुष्कळ वात्सल्यरस प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यात श्री गुरूंप्रतीचा शिष्यभाव अन् साधकांप्रतीचा वात्सल्यभाव अनुभवण्यास मिळणे
रथात श्री गुरूंच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला चरणांशी ‘भूदेवी’स्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि डाव्या बाजूला ‘श्रीदेवी’स्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ विराजमान झाल्या होत्या. श्री गुरूंच्या चरणांशी बसलेल्या या दोन्ही देवींच्या मनात आपल्या गुरूंप्रतीचा परमोच्च शिष्यभाव आणि साधकांसाठी वात्सल्यभाव दाटला होता. ‘या दोघींच्या केवळ अस्तित्वामुळे अवघ्या विश्वाची पापकर्मे धुऊन निघत आहेत आणि कलियुगातील जिवांना पुन्हा एकदा साधनेची संधी मिळत आहे’, असे मला जाणवले.
५. तीनही गुरूंचे विलोभनीय सौंदर्य पाहून आपोआप त्यांची दृष्ट काढली जाणे
आम्ही मार्गाच्या कडेला रांगेत उभे असतांना माऊलींचा रथ आमच्या जवळ आला. तेव्हा त्यांचे ते विलोभनीय सौंदर्य पाहून माझे दोन्ही हात आपोआप वर गेले आणि मी माझ्या दोन्ही हातांनी गुरुमाऊली अन् श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची दृष्ट काढत राहिले. त्या वेळी माझ्या मनात एकच विचार होता, ‘हे परमेश्वरा, केवळ भक्तांच्या आणि साधकांच्या प्रेमापोटी तू कितीतरी वर्षांनी मंदिरातून बाहेर पडला आहेस !’
६. ‘गुरुमाऊलीची वात्सल्यमय दृष्टी प्रत्येक साधकावर पडत असल्याने गुरुमाऊली एकाच वेळी प्रत्येक साधकाच्या समवेत आहे’, असे जाणवणे
रथातून मार्गक्रमण करत असतांना मार्गाच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या प्रत्येकालाच पहाणे गुरुमाऊलींसाठी सामान्यपणे अशक्य होते; परंतु गुरुमाऊलीची वात्सल्यमय दृष्टी प्रत्येक साधकावर पडत होती. ‘कृष्ण जसा रासलीलेत एकाच वेळी प्रत्येक गोपीच्या समवेत असायचा, तसेच या रथोत्सवात गुरुमाऊली एकाच वेळी प्रत्येक साधकाच्या समवेत आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवले.
७. ‘सर्व साधक विष्णुलोकात आहेत’, असे जाणवणे
आमच्यासारख्या पामरांवर देवाने एकाच वेळी सर्व भावरसांची मुक्त हस्ते उधळण केली आणि आम्ही साधक त्यात चिंब न्हाऊन निघत होतो. खरोखरच त्या क्षणी ‘आम्ही सर्व जण विष्णुलोकात आहोत’, असे मला प्रकर्षाने जाणवले.’
– सौ. शुभांगी शेळके (एम्.ए. नाट्यशास्त्र), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |