तुळशी विवाह !

‘दिवाळी’च्या दीपोत्सवानंतर येते ते तुळशीचे लग्न ! अजूनही महाराष्ट्रातील गावांत, तसेच गोव्यात तुळशीविवाह केला जातो. हिंदु धर्मात तुळशीला ‘पापनाशिनी’ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. असुर जालंधराची पत्नी वृंदा ही पतीव्रता असते. तिच्या पातिव्रत्यामुळे विष्णूला असुरांचा नाश करणे कठीण होते. त्यामुळे ते तिच्या पतीचे रूप घेऊन तिच्याकडे जातात. पती युद्धातून परत आले असे वाटून ती तिचे व्रत थांबवते, तसेच तिचे पातिव्रत्यही भंग होते. त्यामुळे विष्णूला असुरांचा नाश करणे शक्य होते. वृंदेला हे कळल्यावर ती विष्णूला शाप देते की, तुम्ही दगड व्हाल. तोच पृथ्वीवरील शाळिग्राम होय. वृंदा सती गेल्यावर तिच्या राखेतून तुळशीचे रोप जन्म घेते. विष्णु तिच्या भक्तीसाठी तिला आशीर्वाद देतात की, तुला पृथ्वीवर कायम पुजले जाईल आणि मी कायम तुझ्यासमवेत राहीन. यासाठी प्रतिवर्षी तुळशीचा विवाह श्रीविष्णूचे रूप असलेल्या श्रीकृष्णासमवेत करतात. काळाच्या ओघात लोप पावत असलेल्या भक्तीभावाचे प्रतीक असलेल्या तुळशी विवाहाचे हे महत्त्व आहे.

हिंदु धर्मात चराचरांत देव पहातात. वड, पिंपळ, नाग, गाय, बैल, चूल, जाते, मुसळ, उखळ, अग्नि, दीप आदींचे पूजन करून त्यांच्याप्रती आपण आपली असलेली कृतज्ञता व्यक्त करतो. तुळशीसारख्या बहुउपयोगी आणि औषधी झुडुपाची तर आपण प्रतिदिन पूजा करतो. तुळशीच्या विवाहाचा विधी कार्तिक शुक्ल द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. या वर्षी २४ ते २७ नोव्हेंबर या काळात तुळशी विवाहाचे मुहूर्त आहेत. ‘बाळकृष्णाच्या मूर्तीचा तुळशीसमवेत विवाह लावून देणे’, हा विवाहविधी आहे. प्राणवायू देणार्‍या तुळशीविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि तिच्यासारखी भक्ती आपल्यात निर्माण होण्यासाठी या वेळी भावपूर्ण प्रार्थना करावी. प्रत्येक सणाप्रमाणे दिवाळीचा सणही आधुनिक झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने केले जाणारे धार्मिक विधी, परंपरा यांचे पालन करत दिवाळी साजरी करण्याची पद्धत शहराच्या ठिकाणी तर हरवत चालली आहे. दिवाळी म्हणजे केवळ फटाके उडवणे, गीतगायनादी कार्यक्रमांचे आयोजन करणे, पर्यटनाला जाणे अथवा मौजमजा करणे हे नव्हे. दिवाळीच्या धर्माचरणाच्या अंतर्गत येणार्‍या विविध पूजा आणि धार्मिक कृती भावपूर्ण केल्या, तर देवतेचे चैतन्य मिळून संस्कृतीचे जतन होईल ! हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीमागे केवळ वैज्ञानिक नव्हे, तर त्याहीपेक्षा सूक्ष्म आणि व्यापक असा आध्यात्मिक आधार आहे. तो अनुभवण्यासाठी मात्र धर्मात सांगितलेल्या पद्धतीनुसार सण साजरे करणे आवश्यक आहेत !

–  सौ. अपर्णा जगताप, पुणे