लखलखला संस्कृतीचा शुक्रतारा

वर्ष २०१४ च्या निवडणुकीत चमत्कार का घडला ? याचा विचार आपल्याकडे विशेषत्वाने केला जात नाही. आजसुद्धा परिस्थिती विशेष पालटलेली नाही. ‘इंडिया’ (I.N.D.I.A.) नामक जो नवा गट सध्या उदयाला आला आहे आणि ज्याचा अपरिहार्यतेने अन् क्रमाने अस्तही होणार आहे, तोसुद्धा या चमत्काराचा अभ्यास अथवा विश्लेषण करू इच्छित नाही. वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या, तसतशा काही ‘वैचारिक’ वगैरे म्हणवणार्‍या चळवळी आपल्या वळवळीतून सत्ताधार्‍यांविरुद्ध मळमळ ओकू लागल्या ! तथापि यांनाही वर्ष २०१४ मध्ये असे काय घडले की, ‘ज्यामुळे भलेभले प्रस्थापित उन्मळून पडले आणि देहलीच्या बाहेरचा माणूस पंतप्रधान झाला’, याचा शोध घ्यावा, असे वाटले नाही आणि अद्यापही वाटत नाही.

डॉ. सच्चिदानंद शेवडे

१. स्वातंत्र्यापासून वर्ष २०१४ पर्यंतची परिस्थिती

एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत ‘मूलतत्त्ववाद’ हा विचार आला. ‘मी मूलतत्त्ववादी आहे’, असे सहज म्हणताच सूत्रसंचालक दचकला. ‘हे तुम्ही सहस्रो दर्शकांसमोर खुलेपणाने मान्य करत आहात !’, असे त्याने विचारले. त्यावर हसून मी त्याला म्हटले, ‘‘होय, मी हिंदु आहे आणि मूलतत्त्ववादी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटते; कारण हिंदु मूलतत्त्वे तुम्ही जाणून घेतली नाहीत. सत्य, अहिंसा, शांती आणि अस्तेय आदी गोष्टी त्यात येतात. अन्य धर्मियांची मूलतत्त्वे आणि हिंदूंची मूलतत्त्वे यात मुळातच भेद आहे. तो समजून घ्यायला हवा !’’

असे म्हणणे हे वर्ष २०१४ नंतरच्या काळात सहज शक्य झाले आहे. पूर्वी ‘आपण हिंदु आहोत’, असे सांगतांनाही कित्येक जण संकोचत. जणू हिंदु असणे, म्हणजे काहीतरी गुन्हा केल्याची जाणीव असणे ! वर्ष १९४७ ला देश विभाजित होऊन स्वतंत्र झाला. धर्माच्या आधारावर विभाजन झाले. ‘पापस्तान’ हा मुसलमानांसाठी बनला म्हटल्यावर स्वाभाविकपणे उर्वरित देश हा हिंदु देश बनायला हवा होता; पण तत्कालीन नेत्यांनी हिंदूंना न विचारताच ‘हा देश सर्वांसाठी’, असे घोषित केले. हिंदूंनीही ते अजाणतेपणी मान्य केले. त्यानंतर मतांसाठी अल्पसंख्यांकांच्या अनुनयाचे जे पर्व चालू झाले, ते अद्यापही संपले नाही. काँग्रेसने हमासला दिलेल्या समर्थनाच्या अगदी अलीकडच्या उदाहरणाने हे सिद्ध झाले. अशा अनुनयाने इतके टोक गाठले की, ‘हिंदूंना आपणच या देशात उपरे असल्याची भावना निर्माण व्हावी !’

घुसखोर विधर्मियांनी जो क्रूर संहार केला, धर्मांतरे घडवली, बलात्कार केले, मंदिरे पाडली या टोकदार इतिहासाचा मागमूसही शालेय वा महाविद्यालयीन क्रमिक पुस्तकात येणार नाही, याची पक्की काळजी घेतली गेली. अगदी सोमनाथ मंदिराच्या जिर्णोद्धाराला जाणे सुद्धा पंडित नेहरूंनी नाकारले. या काँग्रेसी नीतीवर डाव्या (साम्यवादी) विषवल्लीने कळस चढवला. कैक दशके शिक्षणक्षेत्र हे त्यांच्या हाती असल्याने त्यांनी हिंदूंचा दैदिप्यमान इतिहास नाकारून खोट्या माहितीची जंत्री भरलेली पुस्तके लिहून अनेक पिढ्यांमधील राष्ट्रवाद एक प्रकारे मारला. जातीयवादाची उदाहरणे टाकून हिंदूंमधील जाती एकमेकांच्या विरुद्ध कशा उभ्या रहातील, ते पाहिले.

स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंच्या देव, धर्म, उपासना, परंपरा, आदर्श आदींची खिल्ली उडवणार्‍या लोकांना ‘बुद्धीवादी’ म्हणून सातत्याने पुढे आणले गेले. हे कथित बुद्धीवादी अन्य धर्माच्या आदर्शांची मात्र खिल्ली उडवू धजत नव्हते. तसे केले, तर ‘आपले काय होईल ?’, ही रास्त चिंता त्यामागे असावी ! हा या सर्वांचा दुहेरी मापदंड बघणारा हिंदु गोंधळलाही होता आणि खवळलाही होता; पण मुळात सहिष्णू असणारा हा मोठा वर्ग, ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) अशी ललकारी देत नव्हता; कारण ते त्याच्या धर्माने त्याला कधीच शिकवले नव्हते !

मुळात फारच उदारमतवादी असलेल्या या सहिष्णू वर्गाने ‘सर्वांसाठी देश’, हे मान्य केले, तरी ‘या देशाच्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा’, हे मात्र मान्य होण्यासारखे नव्हते. तरीही हे मुकाटपणाने ऐकून घेतले. वर्ष १९२५ मध्ये हिंदुहितार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. अर्थात् त्या वेळी त्यांना राजाश्रय कसा मिळेल ? स्वराज्य मिळाल्यावर आमचे तत्कालीन नेते हे तरी संघाला जवळ कसे करणार होते ? कारण देश सर्वांसाठीचा झाला होता ना ! मग डाव्यांनी (साम्यवाद्यांनी) संघाला आपलेच इटलीतील नाव देऊन ‘फॅसिस्ट’ ठरवले !

हिंदु महासभेचे पूर्व अध्यक्ष असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काँग्रेस आणि साम्यवादी या दुकलीने भारतीय राजकारणात अकारण वादग्रस्त व्यक्तीमत्व ठरवले.

२. समाजमाध्यमांचा दणका

जवळपास ६०-६५ वर्षे सातत्याने एक मार्गी आणि वैचारिक वा बुद्धीवादाचे कातडे पांघरून होणार्‍या आक्रमणांमुळे सामान्य हिंदू विचलित होत होता; मात्र पुरेसा अभ्यास, वाचन नसल्यामुळे आणि जे राष्ट्रविचारक आहेत, त्यांच्या लेखनाला कोणतीही माध्यमे फारसे स्थान देत नसल्याने त्याला सुयोग्य उत्तरे मिळत नव्हती. ती क्रांती समाजमाध्यमांनी घडवून आणली. हे दुधारी शस्त्र आहे, हे मान्यच आहे. तथापि अनेक अभ्यासकांना त्यावर व्यक्त होता येऊ लागले. याखेरीज हिंदूंना खडबडून जागे करण्यात काँग्रेस आणि साम्यवादी यांचेही योगदान आहेच, ते नाकारून कसे चालेल ? त्यांच्याच खोट्या प्रचाराच्या मार्‍याने शेवटी वर्ष २०१४ मध्ये केंद्रीय सत्तापालट झाला ! यामुळे पिसाटलेले साम्यवादी निरर्गल बडबड करून अधिक उघडे पडू लागले. लोकांना सत्य कळू लागले. त्यांचा ‘सिलेक्टिव्ह’ (ठराविक) दृष्टीकोन उघडा पडू लागला.

३. पालट कसा होत गेला ? याचा विचार करा !

फाळणीनंतर लगेच तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनल रेल्वेस्थानकाच्या बाहेर फिरणार्‍या बग्ग्यांच्या चालकांच्या टोप्या पालटल्या. हे सर्व प्राय: मुसलमान होते आणि डोईवर लाल गोंड्याच्या तुर्की टोप्या धारण करणारे होते. फाळणीनंतर उर्वरित भारत हा हिंदु देश झाला, असे समजून त्यांनी त्या टोप्या फेकून गांधी टोप्या धारण केल्या. ८-१५ दिवसांतच त्यांना वस्तूस्थितीची जाणीव झाली आणि त्यांच्या डोईवर पूर्वीप्रमाणे तुर्की टोप्या दिसू लागल्या ! पुढच्या काळात कपड्यात आणि दिसण्यात स्वतःचा वेगळेपणा दाखवणेच नव्हे, तर मिरवणे, हे क्षण न क्षण वाढू लागले. त्यात लांगूलचालन करणार्‍या सर्वपक्षीय नेत्यांची भर पडू लागली. साहजिकच आपण अल्पसंख्यांक, म्हणजे कुणीतरी विशेष आहोत, अशी धारणा होणे स्वाभाविक होते. यात बॉलीवूड कसे मागे राहील ? पूर्वी चित्रलेखा वगैरेसारख्या चित्रपटात शुद्ध हिंदीत गाणी लिहिणारे शायर हळूहळू उर्दू शब्दांची पेरणी करू लागले. त्याला सुमधुर संगीताची साथ लाभल्यावर लोक त्या संगीतात हरवू लागले आणि शब्दांकडे दुर्लक्ष करू लागले.

‘आपकी नजरोने समझा प्यार के काबील मुझे’, हे माला सिन्हा यांच्या तोंडचे; पण लतादीदींनी गायलेले आणि गाजलेले गीत ऐकतांना आपल्याला कधीच काही खटकले नाही; कारण आपण गाणी नुसतीच ऐकतो अथवा पडद्यावर पहातो आणि विसरून जातो. अशा वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘अन्य भारतीय भाषाभगिनींपैकी एक म्हणून आम्ही उर्दूचा यथोचित सन्मान करू; पण तिने आपली मर्यादा ओलांडून आम्हाला (म्हणजे मराठीला !) डोईजड ठरू नये’, हे मत आठवते. एक अनपढ सोज्वळ हिंदू स्त्री गाण्यात ‘बंदा परवर शुक्रीया’ कसे म्हणेल ? ‘नजर, काबील, मंजूर, फैसला’ आदी उर्दू शब्द तिला कसे ठाऊक असतील, हा विचार ना गीतकाराने केला आणि ना गायिकेने केला. प्रयत्न केला वा स्मरणशक्तीवर थोडा ताण दिला, तरी अशी अनेक गाणी आठवतील, असे का होते ? याचा विचार व्हावा. बघा, आठवत आहेत का अशी काही गाणी…?

‘दिवार’ या गाजलेल्या हिंदी सिनेमामध्ये देवळात देवदर्शनाला जाण्याचे तर दूरच; पण देवळातील प्रसाद खाण्यासही नकार देणारा नास्तिक अमिताभ बच्चन ‘७८६’ (मुसलमानांची पवित्र संख्या) क्रमांकाच्या बिल्ल्यावर मात्र श्रद्धा ठेवतो. त्या बिल्ल्यामुळेच अनेकदा संकटातून वाचतो आणि शेवटी बिल्ला हातून हरवल्याने मरतो. ‘शोले’मधील अभिनेता शंकराच्या मूर्तीमागे उभा राहून अभिनेत्रीशी प्रेमालाप करतो. संपूर्ण हिंदु वातावरणात वाढलेला अभिनेता ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ या ओळीपुढे ‘अल्ला अल्ला इन्कार तेरा’, सहजपणे म्हणतो आणि ८० टक्के हिंदूंना यातील विसंगती वर्षानुवर्षे खटकली नाही. इतका टोकाचा सहिष्णुपणा हिंदूंनी दाखवला; पण हिंदी (नव्हे उर्दू) चित्रपट सातत्याने हिंदूंच्या भावना तुडवत राहिले. ‘गावातील ठाकूर हा अन्यायी, पुजारी हा त्याचा एक हात, तर बनिया हा दुसरा हात, हेच दाखवत राहिले. मठ-मंदिरे आणि साधू वगैरे जुगारी, बलात्कारी असे खलनायक असल्याचे अन् त्याच वेळी मुसलमान, म्हणजे गावासाठी वा मित्रासाठी प्राण देणारे’, असे चित्र रंगवत राहिले. याचा अचूक लाभ ‘टॉलीवूड’ने (दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी) उचलला. हिंदु मूल्ये, संस्कृत श्लोक आणि सभ्यता याचा उपयोग करत चित्रपट बनवले आणि ते हिंदीतही डब केले. बॉलीवूडच्या खोट्या प्रचाराला अक्षरशः उबलेला प्रेक्षक ते चित्रपट डोक्यावर घेऊ लागला.

बहुसंख्यांकांना प्रत्येक माध्यमातून अपमानित करण्याचा कहर लोटला, तेव्हा राष्ट्रीय विचारांचे उत्थान होणे, हे अगदी स्वाभाविक होते ! तसेच झाले. मतपेटीतून लोकांनी निषेध व्यक्त करत वर्ष २०१४ ला सत्तापालट केला. आता जरा हिंदु इतिहासही समोर येऊ लागला. अन्यथा ‘या देशाचा इतिहास जणू मोगलांपासून चालू झाला’, असेच भासत होते. रामायण-महाभारताला तर साम्यवाद्यांनी मिथक ठरवून टाकले होते. चंद्रगुप्त, शालिवाहन,  विक्रमादित्य, अवंतीवर्मा, ललितादित्य आदी सम्राट कधी शिकवले गेले नव्हते, तर विविध राजवंश कुठून शिकवले जाणार ? अनेक संशोधक आणि वैज्ञानिक असलेले ऋषी शिकवले गेले नव्हते. अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, युद्धशास्त्र, औषधीशास्त्र आदी अनेक प्राचीन गोष्टी कधी समोर येऊच दिल्या नाहीत. गणराज्ये असली, तरी ‘भारत हे एक राष्ट्र होते’, ही जाणीव होऊ दिली नव्हती.

४. स्वत्व आणि अस्मिता यांचे युग

नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच चित्र पालटू लागले. संसदेच्या पायरीवर मस्तक ठेवून प्रणाम करून हिंदु संस्कारांचे पालन करणारा पहिला पंतप्रधान जगाने पाहिला. उघडपणे मंदिरात जाणारा आणि पूजापाठ आदी कार्यक्रमात भाग घेणारा पंतप्रधान पाहून हिंदु जनमानस सुखावले. ‘सबका साथ, सबका विकास’, असे म्हणत आणि तसे वागत असूनही आपल्या धार्मिक आस्था उघडपणे मिरवणारा अन् जपणारा पंतप्रधान लोकांना दिसला. अनेकांना या गोष्टीचे अप्रूप वाटले, तर विरोधकांनी त्यांना ‘जातीयवादी’ असल्याचे ठरवून टाकले. ‘सनातन धर्म म्हणजेच मानवधर्म’, हे ज्यांना समजून घ्यायचे नसेल, त्यांनी केवळ कोल्हेकुई करत बसावी !

रामजन्मभूमीचा लढा हा वर्ष १५२८ पासून कैक शतके चालू आहे. स्वराज्य मिळूनही हा प्रश्न अद्याप सुटला नव्हता. न्यायालयीन लढ्यानंतर मोदींच्या कारकीर्दीत तो सुटला. तेथे उभारण्यात येणार्‍या श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसाठी स्वतः मोदी गेले होते, ही गोष्ट कोट्यवधी हिंदूंना सुखावणारी होती. जनमानसाची नस मोदींना बरोबर कळली आहे, हे विरोधकांच्या पचनी पडत नाही. पुढील वर्षारंभी जे मंदिर उभे राहील, ते मक्का आणि व्हॅटिकन यांसारखे भव्य असेल ! उद्घाटनाच्या दिवशी अयोध्येतच नव्हे, तर संपूर्ण देशात ‘राम दिवाळी’ साजरी होईल, हे नक्की !

विदेशात गेल्यावरही हा माणूस त्याच्या नेमाचे पालन करतो, हे विशेष आहे. मोदी हे नवरात्रीत अमेरिकेला गेले होते, तेव्हा आपला उपवास असल्याचे त्यांनी लपवले नाही वा त्यासाठी अन्य कोणती कारणे सांगितली नाहीत. जगातील भेटणार्‍या देशप्रमुखांना ते सहसा त्यांच्या भाषेतील अनुवाद असलेली भगवद्गीतेची प्रतच आवर्जून देतात. ‘अंदमानातील हॅवलॉक, नील आणि रॉस या बेटांची नावे पालटण्यात यावीत’, यासाठी वर्ष २०१७ पासून आम्ही समाजमाध्यमांवरून एक मोहीम चालवली. मग अनेकांनी तशी मागणी केली. वर्ष २०१९ मध्ये देहलीहून भ्रमणभाष आला आणि त्या बेटांचा इतिहास विचारण्यात आला.  हॅवलॉक आणि नील ही नावे १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील क्रूर ब्रिटीश सेनाधिकार्‍यांची होती. आम्हाला ठाऊक असलेला इतिहास तिथे पोचवला. नंतर ६ मासांनी एकदम वृत्त आले की, मोदींनी अंदमानात जाऊन त्या द्विपांची नावे पालटली. त्यांना स्वराज्य, शहीद ही सुभाषबाबूंनी पूर्वीच दिलेली नावे पुन्हा बहाल केली आणि रॉसचे नाव ‘नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप’ असे ठेवले. आता पोर्ट ब्लेअरचे ‘पोर्ट सावरकर नगर’ असे नाव केव्हा होईल, त्याची वाट बघायची !

देशाची अस्मिता आणि स्वत्व जोपासणे, हे फार महत्त्वाचे असते. तेच काम राष्ट्रहिताचा विचार सातत्याने करणारे देशाचे पंतप्रधान करत असतात आणि हेच मोदी यांच्या यशाचे गमक आहे !’

वन्दे मातरम् !

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डाेंबिवली.

(डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या फेसबुकवरून साभार)