उत्तरकाशीच्या बोगद्यातील खोदकाम अंतिम टप्प्यात !

  • ४१ मजूर बाहेर यायला १४ ते १६ घंटे लागणार !

  • १८ मीटरचे खोदकाम शेष !

उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथील बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत. उत्तराखंड सरकारमधील अधिकारी भास्कर खुल्बे यांच्या म्हणण्यानुसार १२ ते १४ तासांत कामगारांपर्यंत पोचणे शक्य होणार आहे. या वेळी १८ मीटर खोदकाम शेष असल्याचेही त्यांनी सांगितले. ६-६ मीटरचे ३ पाईप टाकायचे काम शेष आहे. एक पाईप टाकण्यासाठी अनुमाने ४ घंटे लागतात. १८ मीटर खोदल्यानंतरच बचावकार्य चालू होईल.

अशी करण्यात आली आहे बचावकार्याची व्यवस्था !

१. ‘ड्रिलिंग’ म्हणजेच खोदकाम पूर्ण झाल्यावर ‘एन्.डी.आर्.एफ्.’च्या १५ सदस्यांची तुकडी शिरस्त्राण, ‘ऑक्सिजन सिलिंडर‘ आणि ‘गॅस कटर’सह ८०० मिलीमीटर पाइपलाइनमधून आत जाईल.

२. कामगार अशक्त वाटत असल्यास त्यांना ‘स्केट्स’ बसवलेल्या तात्पुरत्या ट्रॉलीद्वारे पाइपलाईनमधून बाहेर काढले जाईल.

३. यानंतर सर्व मजुरांना रुग्णवाहिकेतून ‘चिल्यानसौर सामुदायिक आरोग्य केंद्रा’त नेले जाईल. येथे ४१ खाटांचे रुग्णालय सिद्ध आहे. आवश्यकता भासल्यास कामगारांना विमानाने ‘ऋषिकेश एम्स’मध्ये नेले जाईल.