अपायकारक पेय आणि खाद्य टाळण्यासाठी गृहविभागावर परिपत्रक काढण्याची वेळ !
मुंबई – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे जाणारे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मद्य-मांस यांच्या मेजावान्या झोडतात. त्यामुळे २१ नोव्हेंबर या दिवशी गृहविभागाने परिपत्रक काढून प्रकृतीला अपायकारक खाद्य आणि पेय टाळण्याचे आवाहन शासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांना केले आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अशा मेजवान्यांमुळे प्रतिवर्षी गृहविभागावर अशा प्रकारे परिपत्रक काढण्याची नामुष्की ओढवत आहे. त्यामुळे याकडे सरकारने गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.
वर्ष २०१८ मध्ये प्रथमच नागपूर येथे पावसाळी अधिवेशन घेण्यात आले होते. या वेळी मुसळधार पावसामुळे विधीमंडळाच्या तळमजल्यात पाणी शिरले होते. या वेळी विधीमंडळाच्या आवारातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्या आढळल्या होत्या. यासह वर्ष २०२२ च्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातही मंत्र्यांच्या निवासाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्या आढळल्या होत्या. याविषयीची वृत्ते प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाली होती. तरीही याला आळा बसावा, यासाठी अद्यापही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यावर्षी ७ डिसेंबरपासून नागपूर येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर २१ नोव्हेंबर या दिवशी वरील परिपत्रक गृहविभागाकडून काढण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकामौजमस्तीकडे कल असलेले शासकीय अधिकारी कामकाज कसे करत असतील ?, याची यावरून कल्पना येते. याविषयी केवळ परिपत्रक काढून न थांबता मद्यपी अधिकार्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी ! |