मुलुंडला मुंब्य्राप्रमाणे मुसलमानबहुल बनवण्याचा डाव ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

  • ६ सहस्र ७०० कुटुंबांचे होणार पुनर्वसन !

  • बांगलादेशी नागरिकांचाही समावेश असल्याचा आरोप !

मुंबई – बैंगनवाडी, गोवंडी, शिवाजीनगर, मालाड, चेंबूर, बेहरामपाडा, देवनार चिता कँप या कुर्ला विधानसभा क्षेत्रातील नाले अन् रस्ते रुंदीकरणातील ६ सहस्र ७०० बाधित कुटुंबांचे मुलुंड (पूर्व) येथे पुनर्वसन केले जाणार आहे. यामुळे मुलुंडचे सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक महत्त्व न्यून केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प सिद्ध करण्यात आल्याचे नमूद करत तत्कालीन सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांचा मुलुंडचे मुंब्रा (ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा हा मुसलमानबहुल भाग आहे) करण्याचा डाव आहे, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. पुनर्वसन करण्यात येणार्‍या कुटुंबांमध्ये बांगलादेशी नागरिक असल्याचाही गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेने ११९ फूट, ९३ फूट, ९५ फूट, ७८ फूट अशी झोपड्यांची नोंद केली आहे. त्यांना ३०० चौरसफूट घरे दिली जाणार आहेत. एका घराचे मूल्य ५४ लाख रुपये इतके आहे. हे सगळेजण ५ ते १० वर्षांपूर्वीच्या कच्च्या झोपड्यांमध्ये राहिलेले लोक आहेत. मुलुंड (पूर्व) येथील केळकर महाविद्यालयाजवळ ७ सहस्र ४३९ सदनिका बांधण्याचे काम वेगाने चालू असून या बाधित कुटुंबियांचे तेथे पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती देत ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे कारस्थान थांबवावे’, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांच्याकडून सूची सादर !

पुनर्वसन करण्यात येत असलेल्या मानखुर्द येथील २०३ कुटुंबांची पहिली सूची सोमय्या यांनी दिली असून त्यामध्ये फिरोज अहमद, फिरोज शेख, फिरोज अहमद, युसुफ खान, हानिफ शेख, जुबेर अंसारी, रियाझउद्दीन शेख, शफीउल्लाह शेख, अमालू गौतम, रफिक शेख, इर्शाद शेख, रझाक शेख  फैजल हक, दुबेर सत्तार, फद्रू रहमान, जावेद सिद्दीकी या नावांचा समावेश आहे. पुढील सूची टप्प्याटप्प्याने देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.