‘अग्‍नीशमन प्रशिक्षणा’च्‍या माध्‍यमातून समष्‍टी साधना करा !

एका छोट्याशा ठिणगीपासून उद़्‍भवलेल्‍या आगीचा शेवट हा छोटाच असतो असे नाही’, या आशयाची एक इंग्रजी म्‍हण आहे. केवळ या म्‍हणीवरून आगीची दाहकता, संहारकता किंवा तिचे भीषण परिणाम यांतील गांभीर्य लक्षात येत नाही; तर आगीचा प्रत्‍यक्ष अनुभव घेतलेल्‍यांनाच त्‍याची कल्‍पना असते. ‘आग’ ही दैनंदिन जीवन-व्‍यापारातील एक अत्‍यावश्‍यक घटक असली, तरी तिच्‍या संदर्भात नियंत्रित आणि अनियंत्रित यांमधील लक्ष्मणरेषा फार महत्त्वाची असते. सर्वसाधारणतः मनुष्‍य उपयोगात आणत असलेल्‍या सर्व आगी नियंत्रित असतात; पण एखाद्या प्रसंगी आग नियंत्रणाची लक्ष्मणरेषा ओलांडू शकते. असे झाल्‍यास त्‍यावर काय उपाययोजना करायची, याचे ज्ञान ती आग हाताळणार्‍यांना असणे महत्त्वाचे असते. अग्‍नीशमनाविषयीचे प्रशिक्षण मोठमोठे कारखाने, प्रवासी नौका (जहाजे), विमाने आदींमध्‍ये दिले जाते; परंतु खेदाची गोष्‍ट म्‍हणजे सर्वसामान्‍य मनुष्‍य, तसेच दिवसातील ५-६ घंटे आगीवर स्‍वयंपाक करणारी गृहिणी आगीचे शास्‍त्र आणि अग्‍नीशमनाचे उपाय या संदर्भात पूर्णतः अनभिज्ञ असते. या अज्ञानातून कित्‍येक अपघात घडतात. अग्‍नीशमन प्रशिक्षणाचे ज्ञान आत्‍मसात करून वेळप्रसंगी त्‍याचा समाजासाठी उपयोग करणे, हा समाजऋण फेडण्‍याचाच एक भाग आहे.

मनुष्‍य जीवित राहिला, तरच पुढे तो साधना करू शकतो. या दृष्‍टीने अग्‍नीशमन प्रशिक्षण घेऊन समाजबांधवांसाठी त्‍याचा उपयोग करणे, ही काळानुसार आवश्‍यक अशी श्रेष्‍ठ समष्‍टी साधनाच आहे. ही साधना करा आणि अधिकाधिक ईश्‍वरी कृपेचा लाभ घ्‍या !