नरकासुर प्रतिमादहन : नरकासुर वृत्तीचा नाश की परिपोष ?

 नरकासुर प्रतिमा

भारतीय संस्‍कृती ही मांगल्‍याचा वास असणारी अद्वैताची सुंदर संस्‍कृती ! इतर जगातील देश चंगळवादाच्‍या अशांत, बीभत्‍स आसुरी संस्‍कृतीच्‍या विळख्‍यातून सुटून शांततेचा मार्ग शोधत असतांना आज आशेचा किरण वाटणारी अशी मांगल्‍य आणि चेतना असणारी सात्त्विक संस्‍कृती असलेला देश म्‍हणजे भारत ! जगाने मांगल्‍याचा, उत्‍साहाचा, शांततेचा वारसा असलेल्‍या या देशाकडे आपला तारणहार म्‍हणून बघावे, असा लौकिक आपल्‍या भारत देशाचा आहे. आज जगातील अनेक लोक चंगळवादी संस्‍कृतीला तिलांजली देऊन भारतीय संस्‍कृतीला स्‍वीकारतांना दिसतात; मात्र आज आपल्‍या देशात ही संस्‍कृती आता कुठेतरी घसरते आहे, कुठेतरी अमांगल्‍याचा वास येऊ लागला आहे, विकृतीची कीड आता आपल्‍या देदीप्‍यमान संस्‍कृतीला पोखरत आहे, असे चित्र दिसू लागले आहे.

११ नोव्‍हेंबर २०२३ च्‍या रात्रीचा काही ठिकाणचा विचार केला, तर ही भयाण रात्र जाणवली. मृत्‍यूची जाणीव करून देणारा थरार जाणवणारी रात्र, विकृतीचे चंगळवादी दर्शन दाखवणारी रात्र ! नरकासुराची प्रतिमा जाळण्‍याची आपली प्रथा आहे, असे समजून त्‍या नरकासुराची प्रचंड मिरवणूक काढून नंगानाच करणारी हिंसक, अघोरी वृत्तीच्‍या दर्शनाची रात्र ! खरच ही अशी आपली संस्‍कृती आहे का ? नरकासुराला आपण खरच जाळतो आहे ? खरच त्‍याचा आपण संहार करतो आहे का ? आज ज्‍या विकृत पद्धतीने नरकासुराचा उदोउदो केला जात आहे, त्‍यावरून असे नक्‍की म्‍हणता येईल की, आपण नरकासुर नावाची फक्‍त प्रतिमा जाळतो; पण त्‍याला जाळत असतांना मात्र तो दरवर्षी नरकासुर वृत्तीने पुन्‍हा पुन्‍हा सहस्रो पटींनी वाढून जन्‍मास येत आहे. ११ नोव्‍हेंबरची रात्र प्रचंड तणावाची, वृद्ध आणि रुग्‍ण-आजारी व्‍यक्‍तींसाठी यमसदनी जातोय की काय, असे वाटावी अशी रात्र ! यम साक्षात्‍काराची रात्र ! होय, ही मिरवणूक अशा नालायक राक्षसाची ज्‍याने जगाला अनन्‍वित त्रास दिला. ज्‍या कृष्‍णाने त्‍या राक्षसाला मारले, त्‍याचे किंचितसुद्धा नाव नाही की त्‍याच्‍या पराक्रमाची जाणीव नाही. आज कृष्‍णाने अशा राक्षसाला मारले याची जाणीव ठेवून त्‍याचे आभार मानण्‍याचे सोडून ज्‍याने लोकांना त्रास दिला, अशा राक्षसाची आपण मिरवणूक काढून त्‍याचा गौरव करतो आहे. त्‍याला आपण प्रतिकात्‍मक रूपाने जाळत असलो, तरी आपल्‍यात आपणच नरकासुराची वृत्ती बाणवून घेत आहोत, अशी शंका निर्माण होत आहे. ‘नरकासुर प्रतिकात्‍मक जाळून आपल्‍यातील नरकासुरी वृत्तीचे दुर्गुण जाळावेत’, अशी कल्‍पना किंवा मान्‍यता आपल्‍या संस्‍कृतीत आहे; परंतु नरकासुर जाळणे यापेक्षा त्‍याची मिरवणूक काढून नंगानाच करणे, विकृतीने वागणे यातच धन्‍यता मानण्‍याकडे तरुणांचा कल दिसतो आहे. या मिरवणुकीच्‍या निमित्ताने डी.जे. किंवा प्रचंड ध्‍वनीप्रदूषण करणारी साधने वापरून बीभत्‍स चाळे करत त्‍यात आनंद मानणार्‍यांच्‍या वृत्तीला काय म्‍हणावे ? या मिरवणुकीत विकृत पद्धतीने सहभागी होणार्‍यांचा विचार केला, तर तो केवळ निव्‍वळ आसुरी आनंद उपभोगण्‍यासाठी चंगळवादी विचारांनी एकत्र आलेला एक वर्गच म्‍हणावा लागेल.

११ नोव्‍हेंबरची रात्र खूपच भयानक होती. अनेक आजारी आणि वृद्ध लोकांना त्रासदायक अशी रात्र होती. कमकुवत हृदय असणार्‍या लोकांना साक्षात यम कवटाळायला यावा, अशाच भासाची ती रात्र ! डि.जे.चा हृदय हलवून टाकणारा प्रचंड आवाज ! या आवाजाने वृद्ध आणि आजारी रुग्‍णांना पुष्‍कळ त्रास झाला. माझ्‍या वैयक्‍तिक अनुभवावरून हे मला लिहावेसे वाटले. अशा मिरवणुकीला आपण पाठिंबा देण्‍याची आवश्‍यकता आहे का ? अशा विकृतीकरणाला आपण खतपाणी का घालतो ? मांगल्‍याची आपली अद्वितीय संस्‍कृती असतांना अशी विकृती का ? या अशा घातक विकृतीला पाठबळ देणार्‍या समाजातील शक्‍ती आपणच आता समूळ नष्‍ट करण्‍याची आवश्‍यकता आहे. नरकासुर मिरवणुकीसाठी होणारा अवाजवी खर्च समाजाच्‍या उद्धारासाठी वापरण्‍याची बुद्धी का होऊ नये ? आज आपल्‍याला ठिकठिकाणी संस्‍कार वर्ग चालू करण्‍याची आवश्‍यकता आहे. समाजातील ज्‍या दानशूर व्‍यक्‍ती अशा विकृत कार्यक्रमांना उत्तेजन देतात, आर्थिक पाठबळ देतात, तेच लोक आपल्‍या संस्‍कृतीची ओळख करून देणारे आणि उत्तम नागरिक होण्‍यासाठी संस्‍कार वर्गाचे आयोजन का करू शकत नाहीत ?

आपली मंगल आणि अद्वितीय संस्‍कृती, जर टिकवायची असेल आणि नरकासुरी वृत्तीचा नायनाट करायचा असेल, तर समाजातील सर्व लोकांनी याचा विचार करणे आवश्‍यक आहे. शांतता, प्रेम, मांगल्‍य आणि चैतन्‍य आपल्‍याला प्रस्‍थापित करायचे असेल, तर आज संस्‍कार वर्गांची आवश्‍यकता आहे ना की नरकासुर मिरवणुकीची ! नरकासुर आपण जाळतो आहे कि नरकासुरी वृत्तींचा परिपोष करतोय याचा गांभीर्याने विचार करण्‍याची ही वेळ आहे.

दिवाळी हा सण मंगलमय, चैतन्‍यमय, प्रकाशमय आहे. समाजात शांतता प्रस्‍थापित करण्‍याचा, स्नेहभाव वृद्धिंगत तथा दृढ करण्‍याचा हा सण आहे. आपल्‍या सगळ्‍यांच्‍या जीवनात प्रेम, स्नेह, मांगल्‍य, शांतता, आरोग्‍य मिळो, या भावनेने आपणा सर्वांना दीपावलीच्‍या हार्दिक शुभेच्‍छा !

– श्री. प्रभूदास आजगावकर, वायरी, मालवण, सिंधुदुर्ग.

टीप : या लेखातून कुणाच्‍या भावना दुखावण्‍याचा हेतू नाही. केवळ वास्‍तव मांडून एक मंगल विचार आपण आपल्‍या मनात रुजवून तो प्रत्‍यक्ष कृतीत आणण्‍यासाठी आपण काय करू शकतो ? यासाठी केलेला हा लेखप्रपंच. कळत नकळत कुणाच्‍या भावना दुखावल्‍या असतील, तर क्षमस्‍व ! या लेखात लेखकाच्‍या इच्‍छेनुसार मांडणीमध्‍ये आणि व्‍याकरणदृष्‍ट्या कोणताही पालट केलेला नाही.