‘ताप असतांना हलका आहार घ्‍यावा’, असे का सांगतात ?

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २५०

‘आपल्‍याला चूल पेटवायची असेल, तर आधी चुलीतील राख काढून चूल स्‍वच्‍छ करावी लागते. त्‍यानंतर आपण एखादा कागद ठेवून आगपेटीच्‍या काडीने तो पेटवतो. कागद लगेच पेट घेतो. त्‍यावर आपण सहजपणे जळणारे वाळलेले गवत, सुकी पाने इत्‍यादी अगदी लहान सरपण ठेवतो. ते पेटले की, मग त्‍याहून जरा मोठे लाकूड, त्‍याच्‍यानंतर त्‍याहून मोठा ओंडका अशा क्रमाने आपण अग्‍नी वाढवतो. शरिरातील अग्‍नीचेही (पचनशक्‍तीचेही) असेच असते. तापासारख्‍या विकारांमध्‍ये शरिरातील अग्‍नी (पचनशक्‍ती) मंद होतो तेव्‍हा पेजेसारख्‍या (टीप १) अगदी हलक्‍या आहारापासून चालू करून चांगली भूक लागू लागली की, क्रमाक्रमाने मुगाचे कढण (टीप २), वरणभात असे तुलनेने आधीच्‍या पेक्षा जास्‍त शक्‍तीदायक असे पदार्थ खाऊन शरिरातील अग्‍नी (पचनशक्‍ती) क्रमाने वाढवला जातो.’

टीप १ – ‘पेज’, म्‍हणजे तांदूळ शिजल्‍यावर शिल्लक राहिलेले भाताचे पाणी.

टीप २ – ‘कढण’, म्‍हणजे मूगडाळ शिजवून तिच्‍यात चवीपुरते मीठ आणि गूळ घालून केलेला पातळ पदार्थ.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१०.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan