परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी कॅनडाला सुनावले !
लंडन (ब्रिटन) – भारत सरकार हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येची चौकशी करण्याची आवश्यकता नाकारत नाही; मात्र कॅनडाने या हत्येमध्ये भारतीय हस्तकाची भूमिका असल्याचा आरोप केला असून या दाव्याचे समर्थन देण्यासाठी पुरावे सादर केले पाहिजेत. भारतावर आरोप करतांना त्याविषयीचे पुरावेही द्यावेत. आम्ही अन्वेषणाला नकार देत नाही, असा पुनरुच्चार भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केला. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
सौजन्य टाइम्स ऑफ इंडिया
डॉ. एस्. जयशंकर यांनी म्हटले की, आम्ही कॅनडाला याविषयी सांगितले आहे. आम्हाला वाटते की, हिंसक मार्गांसह अलिप्ततावादाचे समर्थन करणार्या आणि टोकाच्या राजकीय मतांना कॅनडाच्या राजकारणात स्थान दिले जात आहे. असे लोक कॅनडाच्या राजकारणात आहेत. त्यांना त्यांचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले, तरी ते काही दायित्वासह येते. अशा स्वातंत्र्याचा गैरवापर आणि राजकीय हेतूने दुरुपयोग केला जात असेल, तर ते सहन करणे अत्यंत चुकीचे ठरेल. तुमच्याकडे असे आरोप करण्याचे कारण असेल, तर कृपया पुरावे आमच्यासोबत ‘शेअर’ करा. आम्ही अन्वेषण करण्यास नकार देत नाही; मात्र त्यांनी तसे काहीही केलेले नाही.