पाकिस्तानने युक्रेनला विकली ३ सहस्र कोटी रुपयांची शस्त्रे ; रशियाकडून मिळवले स्वस्तात कच्च तेल !

पाकिस्तानची कूटनीती !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान रशियाविरुद्धच्या लढाईत युक्रेनला घातक शस्त्रे विकत आहे. पाकिस्तानने आतापर्यंत युक्रेनला ३ सहस्र कोटी रुपयांची शस्त्रे विकल्याचा दावा एका वृत्त अहवालात करण्यात आला आहे. त्याचवेळी पाकिस्तान रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळवत आहे. (हे आहे पाकिस्तानचे खरे स्वरूप ! – संपादक)

एका अहवालानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत ३ सहस्र टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानने वर्ष २०२१-२२ मध्ये १०७ कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची निर्यात केली, तर वर्ष २०२२-२३ मध्ये ती वाढून ती ३ सहस्र ४४७ कोटी रुपयांची झाली.

शस्त्रास्त्रांच्या निर्यातीचे वृत्त पाकने फेटाळलेे !

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा विकल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही कठोर तटस्थतेचे धोरण स्वीकारले असल्याचेही पाकने स्पष्ट केले.