संवेदनाशून्‍य देहली !

पियुष पाल

देशाची राजधानी देहली नेहमीच चर्चेत असते. माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना येथे नुकतीच उजेडात आली. येथील मृतवत् समाजाने आणखी एका निष्‍पापाचा मृत्‍यू पाहिला आहे ! लघुचित्रपट निर्माता ३० वर्षीय पियुष पालचा भर रस्‍त्‍यात तडफडून मृत्‍यू झाला. मोटारसायकलवरून जातांना मागून आलेल्‍या एका मोटारसायकलने पियुषच्‍या गाडीला धक्‍का दिला. गाडीवरून कोसळल्‍याने त्‍याला गंभीर दुखापत झाली. त्‍याही अवस्‍थेत अर्धा घंटा तो लोकांकडे साहाय्‍यासाठी याचना करत होता; मात्र कुणीही त्‍याला साहाय्‍य केले नाही; उलट काही जण ‘व्‍हिडिओ’ बनवत राहिले ! त्‍याच्‍या असाहाय्‍यतेचा अपलाभ घेऊन चोरट्यांनी त्‍याचा भ्रमणसंगणक आणि भ्रमणभाष चोरला. चोराने पियुषचा भ्रमणभाष हिसकावला, तेव्‍हा पियुषच्‍या घरातून त्‍याच्‍यासाठी संपर्क झाला होता; मात्र चोरट्याने तो बंद करून तो पळून गेला. त्‍या वेळी संपर्क झाला असता, तर कदाचित् आज चित्र वेगळे असते; मात्र स्‍वार्थापुढे भावना मेलेल्‍यांना त्‍याचे सुवेरसुतक ते काय असणार ? शेवटी बर्‍याच वेळाने पंकज जैन नावाच्‍या एका इसमाने अन्‍य ३-४ जणांच्‍या साहाय्‍याने पियुषला रुग्‍णालयात नेले. त्‍याच्‍या शरिरातून बराच रक्‍तस्राव झाल्‍याने त्‍याला रुग्‍णालयात नेण्‍यापूर्वीच त्‍याची प्राणज्‍योत मालवली. मृतवत समाजाचे दर्शन घडवणारी ५ मासांच्‍या कालावधीत येथे घडलेली ही दुसरी घटना आहे.

२८ मे २०२३ या दिवशी येथील शहाबाद डेअरीच्‍या परिसरात जिवाचा थरकाप उडवणारी आणि मानवतेला कलंकित करणारी घटना घडली होती. एका १६ वर्षीय मुलीची साहील या धर्मांध तरुणाने रहदारीच्‍या परिसरात चाकूने अनेकदा भोसकून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्‍या केली. ही घटना घडतांना बाजूने अनेक जण ये-जा करत होते; मात्र त्‍यांपैकी कुणीही तिला साहाय्‍य केले नाही. ती साहाय्‍यासाठी जिवाच्‍या आकांताने विव्‍हळत होती; मात्र बाजूने जाणारे लोक तिच्‍याकडे बघून न बघितल्‍यासारखे करत पुढे जात होते, हे सार्‍या देशाने सीसीटीव्‍हीत पाहिले. त्‍यांपैकी २-४ जण जरी तिच्‍या साहाय्‍याला धावून गेले असते, तरी कदाचित् ती आज जिवंत असती ! ‘पोलीस, न्‍यायालय यांपेक्षा त्‍याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे’, या विचारावर विवेकाला मात करताच आली नाही ! पीडितांना साहाय्‍य करण्‍याऐवजी  चित्रीकरण करून ते स्‍टेटसला ठेवण्‍यात आणि इतरांना पाठवण्‍यात धन्‍यता मानली जात आहे. देहलीकरांची ही संकुचित वृत्ती ‘आपणही समाजाचा एक अविभाज्‍य घटक आहोत, उद्या ही वेळ स्‍वतःवरही येऊ शकते’, हे विसरला आहे !

– श्री. जगन घाणेकर, मुंबई